Lokmat Sakhi >Inspirational > माझे माहेर पंढरी गाणारी काश्मिरी लेक, मराठी साहित्य संमेलनात पसायदान गाणाऱ्या शमीमाची जिद्दी गोष्ट

माझे माहेर पंढरी गाणारी काश्मिरी लेक, मराठी साहित्य संमेलनात पसायदान गाणाऱ्या शमीमाची जिद्दी गोष्ट

Women's Day 2025 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आपल्या पसायदान गायनाने ‘चार चांद’ लावणारी, मूळची काश्मिरी असलेली शमीमा अख्तर आणि तिचा काश्मीर ते पुणे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2025 18:38 IST2025-03-07T18:37:54+5:302025-03-07T18:38:12+5:30

Women's Day 2025 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आपल्या पसायदान गायनाने ‘चार चांद’ लावणारी, मूळची काश्मिरी असलेली शमीमा अख्तर आणि तिचा काश्मीर ते पुणे प्रवास

women's day 2025 : shamima akhtar, Kashmir to Pune, sings Marathi songs, story of a courage and hope | माझे माहेर पंढरी गाणारी काश्मिरी लेक, मराठी साहित्य संमेलनात पसायदान गाणाऱ्या शमीमाची जिद्दी गोष्ट

माझे माहेर पंढरी गाणारी काश्मिरी लेक, मराठी साहित्य संमेलनात पसायदान गाणाऱ्या शमीमाची जिद्दी गोष्ट

भक्ती बिसुरे

काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यातलं आरागाम हे माझं जन्मगाव. फामिदा बेगम आणि मोहम्मद मकबुल कुमार हे माझे अम्मी-अब्बा! त्यांना पाच मुली आणि एक मुलगा. मी त्यांची सगळ्यात मोठी मुलगी. अम्मी अब्बांनी मुलगी म्हणून आम्हाला दुय्यम वागणूक कधीही दिली नाही. मी शाळेत उत्तम तायक्वांदो खेळायचे. कुटुंबात संगीताचा वारसा होता त्यामुळे गाणंही गात होते. हेनिवडायचं की ते अशी वेळ आली तेव्हा ‘तुला जे हवं ते कर’ असं म्हणत अम्मी अब्बा पाठीशी उभे राहिले. आजही मुलींना असा सपोर्ट मिळतोच असं नाही, पण आम्हाला तो मिळाला. आज मागे वळून बघते तेव्हा ही मला सगळ्यात मौल्यवान गोष्ट वाटते. नुकतंच देशाच्या राजधानीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आपल्या पसायदान गायनाने ‘चार चांद’ लावणारी, मूळची काश्मिरी असलेली शमीमा अख्तर तिचा काश्मीर ते पुणे हा प्रवास सांगत असते.

नाना-नानी शायर... दादाजी पीर बाबाचे मुरिद... त्यामुळे घरी सुफी गाण्यांच्या मैफली अगदी नित्याच्या. वडिलांना चांगलं गाणं ऐकण्याचा शौक. आईला लाभलेला गोड गळा अशा वातावरणात जन्मलेली शमीमा आणि तिची भावंडं सगळेच गाणारे! शाळेत शिक्षकांकडून गाण्याचा आग्रह व्हायचा. तायक्वांदोच्या क्लासला गेले तरी मला तिथे सगळे गाणं म्हणायला सांगायचे, हे तिला आठवतं. आज शमीमा संगीत विशारद आहे. तिचा नवरा मजहर सिद्दिकी स्वतः शास्त्रीय गायक, कीबोर्ड वादक, गीतकार, संगीतकार आहे. त्यांच्या दोघांच्या युट्यूब चॅनलला लाखोंचे व्ह्यूज मिळतात. पण याच शमीमाला ‘सा-रे-ग-म’ ची ओळख व्हायला मात्र बरीच वाट बघायला लागली.

 

बांदिपोरा सारख्या भागात संगीत शिक्षक नव्हतेच. संगीत ही शिकायची गोष्ट आहे हे माहितीच नाही तिथे कुणाला. पण माझी मावशी श्रीनगर आकाशवाणीत जायची. तिच्यामुळे माझं संगीताचं शिक्षण सुरु झालं. पुढे लखनौला जाऊन तिने संगीत शिकणं सुरु ठेवलं. २०१७ मध्ये पुण्याच्या 'सरहद' ने आयोजित केलेल्या एका काश्मीर फेस्टिव्हलला ती आली आणि जणू इथलीच झाली.



 

शमीमा सांगते, सरहद हे नाव काश्मीरींसाठी नवं नाही. मी दुसरीत असताना आमच्या भागातील काही मुलं सरहदमध्ये आली होती. तेव्हा मलाही यायचं होतं पण मी लहान होते आणि दौरा फक्त मुलांचा होता त्यामुळे मला येता आलं नाही. पण सरहदला येणं माझ्या नशिबात लिहिलेलं होतं. ते काश्मीर फेस्टिव्हलच्या निमित्ताने तो योग आला. नहार सर, मॅडम यांना भेटले आणि मला 'होम अवे फ्रॉम होम' सापडल्यासारखं वाटलं. सूफी संतांच्या रचना मी नेहमी गात असे. एकदा नहार मॅडमनी मला 'पसायदान' ऐकवलं. त्याचा अर्थ कळला नाही पण मी भारावून गेले लता दीदींच्या आवाजाने... हे काय आहे असं मी मॅडमना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या ही संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली विश्वशांतीची प्रार्थना आहे. सुफी संतांनीही केलेल्या प्रार्थना विश्वशांतीसाठीच केलेल्या आहेत. त्या मी नेहमी गात असे. त्यामुळे पसायदान शिकायचंच असं मी ठरवलं. ते अर्थात सोपं नव्हतं. कारण मी उर्दू माध्यमाच्या शाळेत शिकले. मला हिंदीही फारसं बरं येत नाही. पसायदानातले शब्द माझ्यासाठी खूप अवघड होते. पण किती तरी वेळा ऐकलं. उर्दूमध्ये लिहून काढलं. खूप खूप रियाज केला आणि मला जमलं... म्हणजे पर्फेक्ट जमलं असा दावा नाही पण प्रयत्न तरी जमला! मग मी ‘माझे माहेर पंढरी’ गायले. त्यालाही खूप प्रतिसाद मिळाला. मिळतो. महाराष्ट्राने, मराठीने मला खूप प्रेम दिलं. मला सांभाळून घेतलं. त्याबद्दल मला नेहमी ‘शुक्रगुजार’ वाटतं. मला आता भारतातल्या प्रत्येक भाषेत गायचं आहे. पण हे सगळं कुणामुळे असा विचार करते तेव्हा मुलगी म्हणून मला कमी न लेखणारे माझे अम्मी अब्बाच माझ्या डोळ्यांसमोर येतात. स्टेजवर नेहमी स्वतः मागे राहून मला पुढे राहाण्याचं प्रोत्साहन देणारा माझा नवरा मजहरही मला आठवतो. आमच्या दीड वर्षांच्या मुलीला वाढवताना अम्मी अब्बांचा आदर्शच डोळ्यांसमोर ठेवायचा हे मनात पक्क होतं मग! अम्मीअब्बांनी आमच्यासाठी खूप केलं, आता मला त्यांच्यासाठी काही तरी करायचंय…’

हे सारं सांगताना शमीमाचे डोळे एकाच वेळी चमकत असतात आणि गळा दाटलेला असतो.
मुलगी नको किंवा एक तरी मुलगा हवाच असं म्हणणारे किती तरी लोक आजही आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांच्या गर्दीत काश्मीर सारख्या भागातल्या फामिदा बेगम आणि मोहंमद मकबुल कुमार या आईबाबांचं आणि शमीमा नावाच्या लेकीचं वेगळेपण सुखावणारं आहे. अगदी तिच्या गोड गाण्यासारखं..
 

Web Title: women's day 2025 : shamima akhtar, Kashmir to Pune, sings Marathi songs, story of a courage and hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.