सरोज अहिरे, (आमदार, देवळाली)
हिरकणी कक्ष ही काम करणाऱ्या कुठल्याही महिलेची/मातेची गरज आहे, हे आपण मान्य करणार का, हाच माझा पहिला प्रश्न आहे. मी आमदार आहे, माझं पाच महिन्याचं बाळ, ते तापानं फणफणलेलं होतं त्याला घेऊन मी विधिमंडळात पोहचले तर हिरकणी कक्षात साध्या सुविधा नाहीत. सगळीकडे धूळ. तिथं बाळ कसं ठेवणार, एवढाच माझा प्रश्न होता. मी माझं बाळ सांभाळून आमदार म्हणून माझं काम करत होते. पण आजारी पाच महिन्यांचं बाळ ठेवणार कुठं या काळजीनेच त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू आले.
सोपं नसतं महिलांसाठी लहान बाळ, आपलं काम सांभाळणं.
कितीतरी महिलांनी मला मेसेज करून कळवलं की, बरं झालं तुम्ही बोललात. आमच्यासमोरही असाच प्रश्न असतो.
विचार करून पाहा, लहान बाळ असताना कामावर येताना पोलिस भगिनींची काय अवस्था होत असेल? विविध सरकारी खात्यात काम करणाऱ्या महिलांसाठी हिरकणी कक्षांची सोय नको का? आणि हाच प्रश्न मोठ्या खासगी कंपन्या, मल्टिनॅशनल कंपन्या यांच्यासाठीही आहे. काम करणाऱ्या महिलांसाठी मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारीही खासगी क्षेत्रानेही घ्यायला हवी.
अनेकदा असा प्रश्न उपस्थित केला जातो की याची गरज काय?
गरज नाही कशी? महिलांनी आपले लहान बाळं, स्तनपान वयातली बाळं, आजारी बाळं घरी कुणाकडे ठेवायचे? कार्यालयात जर हिरकणी कक्ष असेल, तिथं बाळाला ठेवता येईल, अशी सुविधा असतील तर त्यांचं कामही सोपं होईल. जिथं मोठ्या संख्येनं महिला काम करतात त्या कार्यालयात, सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्थात तर तशी सोय असावीच. पण जिथं आज महिला कमी संख्येनं कार्यरत आहेत तिथंही या सोयी हव्यात, कारण आज तिथं जास्त महिला काम करत नसतील पण भविष्यात त्या क्षेत्रात अनेक महिला काम करू शकतील, त्यांच्यासाठी या सुविधा निर्माण व्हायला हव्यात आणि त्या सुविधा देणं म्हणजे त्या महिलांना मदत किंवा उपकार असं काही नाही. बाळ सांभाळून काम करणाऱ्या आईसाठी या सोयी असणं आवश्यकच आहे.
यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांनाही केली आहे.
एवढंच नाही तर या विषयात मी जाहीरपणे बोलल्यानंतर काही खात्यात आधीपासून सुरू असलेले हिरकणी कक्ष दुरुस्तीही झाले, असेही मला समजले.
महिलांसाठी या साऱ्या सुविधा असणं अत्यावश्यक आहे.
माझ्या डोळ्यात आलेलं पाणी दिसलं पण अनेक जणी अशा असतील ज्यांच्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसत नाही. त्या बाळ सांभाळत, आपलं काम करतात, त्यांची असह्य ओढाताण होते. त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष असणं, ते स्वच्छ असणं, तिथं काही आवश्यक सुविधा असणं, स्तनपान करता येणं हे काही फार जास्त मागणं नाही.
यानिमित्तानं हा महत्त्वाचा विषय चर्चेत आला, त्याची गरज लक्षात आली याचा मला आनंद आहे.
मी आई आहे आणि आमदारही.. मला माझ्या दोन्ही जबाबदाऱ्या महत्त्वाच्या वाटतात.
(शब्दांकन : प्रतिनिधी)