कोणतेही रेकॉर्ड मोडणे आपल्याला वाटते तितके सोपे नसते. पण कष्ट आणि जिद्द याच्या जोरावर स्वत:च्या कामगिरीवर विश्वास ठेवत काम करत राहिलो तर ते तितके अवघडही नसते. महिला टीम इंडियाच्या (Women's Team India) झूलन गोस्वामीने (Jhulan Goswami) आपल्या उत्कृष्ट अशा खेळीने नुकतेच हे सिद्ध करुन दाखवले. झुलनने आपल्या अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत (Women’s World Cup 2022) इतिहास रचला आहे. त्यामुळे तिच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद होणार आहे.
झुलनने आतापर्यंत झालेल्या वर्ल्ड कप सामन्यांमध्ये विकेट घेतल्या होत्या. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत विंडिज विरुद्धच्या सामन्यात तिने एक विकेट घेतली. तिने विंडिजच्या अनिसा मोहम्मदला (Anisa Mohammed) विकेट घेत बाद केले. या विकेटमुळे झुलनने ऑस्ट्रेलियाची माजी गोलंदाज लिन फुलस्टोनच्या (Lyn Fullston) विकेटचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. झुलनची वर्ल्ड कपमधील ही ४० वी विकेट ठरली आहे. विशेष म्हणजे झुलनने अवघ्या ३१ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. याआधी लिनने अवघ्या २० सामन्यात ३९ फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. लिननं १९८२ ते १९८८ दरम्यान विश्वचषकात ३९ विकेट घेतल्या होत्या. झुलनने घेतलेल्या ४० विकेटमुळे तिने लीनचा विक्रम मोडला असून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला क्रिकेटपटू म्हणून तिच्या नावावर रेकॉर्डची नोंद होणार आहे.
झूलन गोस्वामी २००५ पासून वर्ल्डकप संघाचा भाग होती. आताची तिची ही पाचवी स्पर्धा आहे. महिला वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर इंग्लडीच कॅरोल होजस आहे. तिने २४ सामन्यांत ३७ विकेट घेतल्या आहेत. इंग्लडची क्लेर टेलर २६ सामन्यांमध्ये ३६ विकेटसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची कॅथरीन फिट्जपॅट्रिक २५ सामन्यांत ३३ विकेटसह या यादीत चौथ्या स्थानावर आहे. भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीने आतापर्यंत १९७ सामन्यांत २४८ विकेट घेतल्या आहेत. झुलनने आपल्या कारकिर्दीत १२ कसोटी, १९७ एकदिवसीय आणि ६८ टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. तिने कसोटी सामन्यात ४४ आणि एकदिवसीय सामन्यात २४८ विकेट्स घेतल्या आहेत. तर, टी-ट्वेंटीमध्ये ५६ विकेट्स घेतल्या आहेत.