Join us  

नोकरी करणाऱ्या सासूमुळे सुनेला मिळते नोकरीची संधी; रिसर्चचा दावा- सासूबाईंची कृपा असेल तरच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 2:48 PM

Working Moms-in-Law Lift Female Employment in India : सासू नोकरदार असेल तर नव्या सुनेला घराबाहेर पडून काम करणं सोपं जातं, संशोधक सांगतात..

महिलांनी नोकरी करणे हे काही आता फार वेगळे राहीलेले नाही. महिलांनी शिक्षण, करिअर, नोकरी हे सगळे करणे सामान्य झाले असले तरी लग्न, मूल या सगळ्या गोष्टींमुळे महिलांना अनेकदा नोकरी सोडावी लागते. मात्र सासू नोकरी करणारी किंवा घराबाहेर पडून काम करणारी असेल तर घरात नव्याने लग्न करुन येणारी सून नोकरी करण्याची शक्यता जास्त असते. अझिम प्रेमजी विद्यापीठातर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार हे निरीक्षण मांडण्यात आले आहे. शहरी भागात सासू नोकरी करत असेल तर सुनेने नोकरी करण्याचे प्रमाण साधारण ७० टक्के असते तर ग्रामीण भागात हेच प्रमाण ५० टक्के असते असे यामध्ये नोंदवण्यात आले आहे (Working Moms-in-Law Lift Female Employment in India). 

म्हणजेच घरात जर महिला घराबाहेर पडण्याचे, तिला आर्थिक स्वातंत्र्य असण्याची परंपरा असेल तर ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. अन्यथा सासू घरात असेल तर नव्याने घरात येणाऱ्या सुनेने घराबाहेर न पडता घरातील जबाबदाऱ्या घ्याव्यात आणि घरी राहून घरातील गोष्टींकडे लक्ष द्यावे अशीच मानसिकता असल्याचे यावरुन दिसून येते. मात्र सासू घराबाहेर पडणारी असेल तर सुनेने आपले करिअर, नोकरी यांकडे लक्ष देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही गोष्ट काही प्रमाणात तरी सोपी होते. नाहीतर आपल्याला काय गरज आहे, आधी घरात लक्ष दे, दिडदमडीसाठी घराकडे दुर्लक्ष नको अशाप्रकारचे टोमणे नव्याने घरी आलेल्या सुनेला ऐकवले जातात आणि तिला नोकरी करण्यापासून परावृत्त केले जाते.

(Image : Google)

कोरोना महामारीनंतर महिला मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगाराकडे वळल्या. कोविडपूर्वी साधारण ५० टक्के महिला स्वत:चे उद्योग करत असतील तर आता ते प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत गेले आहे. असे असले तरी महिलांच्या कमाईत मात्र घट झाल्याचे चित्र आहे. मात्र भारतात गेल्या काही वर्षात महिलांनी नोकऱ्या करण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सहयोगी प्राध्यापक अमित बेसोल यांच्या नेतृत्त्वाखाली काम करत असलेल्या लेखकांचे म्हणणे आहे. कोविडच्या काळात एकूणच आर्थिक परिस्थिती खालावली त्यामध्ये महिलांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीमहिला