माधुरी पाचपांडे
आज ३ जून २०२४. म्हणजेच आज जागतिक सायकल दिन. (world bicycle day) मी पण एक सायकलिस्ट आहे. माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक सायकलिस्ट मैत्रिणींच्या आयुष्यात सायकलमुळे अनेक सकारात्मक बदल घडले. प्रत्येकीच्या जीवनात सायकल आली आणि ती आता आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग ठरली. सायकलने आमचं आयुष्य बदललं. त्या प्रिय सायकलला आजच्या दिवशी आम्हा सर्वांकडून मानाचा मुजरा.खरंतर आम्ही सर्वजणी सामान्य गृहिणी आहोत. तिशी ओलांडली की चाळिशीला घाबरून मग पन्नाशीत हतबल होऊन साठीत फक्त आपले आजार गोंजारत बसणाऱ्या अनेक सर्वसामान्य गृहिणींच्या घोळक्यातल्याच आम्ही आहोत, बरं का ! फक्त या घोळक्यात न रमता स्वतःची बुरसटलेली बंधनं तोडून मुक्तपणे जगण्याचा आनंद देणारी एक खास मैत्रीण आमच्या आयुष्यात आली ती म्हणजे आमची सायकल.
अतिशयोक्तीवाटते ना?आमच्यातल्या प्रत्येकीचा किस्सा ऐकलात ना तर तुमचा पण विश्वास बसेल. पुण्यातून दरवर्षी इंडो ऍथलेटिक सोसायटी ही संस्था पुणे पंढरपूर या एक दिवसीय सायकलवारीचे आयोजन करते. एका दिवसात जवळजवळ २३० किलोमीटरचा टप्पा सायकलवर पार करून विठ्ठल चरणी आम्ही आमची सायकलवारी अर्पण करतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून या वारीमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला होता. गेल्या वर्षी ३ जून या जागतिक सायकल दिनाच्या दिवशीच पुणे ते पंढरपूर ही सायकलवारी आयोजित केली होती. योगायोगाने त्यादिवशी वटपौर्णिमा ही होती. शंभर पेक्षा जास्त महिलांनी ही सायकलवारी यशस्वीरित्या पूर्ण केली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. प्रत्येकी सोबत जल्लोष साजरा करताना, त्यांचे अनुभव ऐकताना जाणवलं की या प्रत्येकीकडे एक भन्नाट संघर्षकथा आहे. सायकल घेतली, चालवली आणि वारी पूर्ण केली इतकं सोपं तर नव्हतं ना काही.आमच्यातल्या काही या सायकलप्रेमी महिलांनी त्यादिवशी वटपौर्णिमा असल्यामुळे पुणे पंढरपूर प्रवासात वडाचे झाड शोधून सायकलनेच त्या वडाला सात फेऱ्या मारून ऐतिहासिक वटपौर्णिमाही साजरी केली . सायकलवर वडाला प्रदक्षिणा मारणाऱ्या आणि तितक्याच जिद्दीने २३० किलोमीटरची सायकलवारी एका दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केली.यात कुणी डॉक्टर, कोणी शिक्षिका, कोणी आयटी प्रोफेशनल असे वेगवेगळे प्रोफेशन, घर ,मुलं ,कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सर्व सांभाळून या सर्वांनी स्वतःसाठी वेळ द्यायचा ठरवलं. यातील बऱ्याचजणींनी तर कधीच सायकल चालवली नव्हती. सायकल शिकण्यापासून ते घरच्यांना पटवून देऊन स्वतःची सायकल मिळवण्यापर्यंतचा प्रवास फारच कौतुकास्पद आहे.
सायकलने तोडलेलं चक्रमी ही वयाच्या चाळिशीच्या टप्प्यावर शारीरिक, मानसिक संघर्षातून माझ्या सायकलमुळेच बाहेर पडू शकले. माझ्या मुलांनी आणि घरच्यांनी आणि माझ्या सायकल ने मला खूपच साथ दिली. पुणे ते पंढरपूर ही सायकल वारी मी तीन वेळा पूर्ण केली. आपल्या छोट्या छोट्या अनुभवामुळे खूप जणींना मदत होते. आपल्याकडे बघून खूप जणींना प्रोत्साहन मिळते हे जेव्हा लक्षात आले. तेव्हाच ठरवले जेवढं शक्य होईल तेवढ्या जणींचा अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत खास करून स्त्रियांपर्यंत पोहोचवायचाच. न जाणे कोणाला कोणाची गोष्ट आपली वाटेल आणि सायकल चालवायला प्रोत्साहन मिळेल.जेवढे शक्य होईल तेवढ्या मैत्रिणींचा अनुभव रेकॉर्ड करून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी "अनुभवांची गाथा" या उपक्रमाची मी सुरुवात केली.माझ्या दोन्ही मुलांनी यासाठी मला खूपच मदत केली. आज अनुभवांची गाथा या उपक्रमात सायकल चालवणाऱ्या प्रत्येकीचे अनुभव मला लोकांपर्यंत पोहोचवता आले. लहानपणी सायकल चालवणे आणि आत्ता सायकल चालवणे यात जमीन आसमानाचा फरक आहे.आताचे सायकलचे विश्व पूर्णच बदलले आहे. सध्या वेगवेगळ्या हँडल बारच्या, वेगवेगळ्या साईजेस च्या वेगवेगळ्या गेअर्सच्या सायकल आपल्याला बघायला मिळतात. ही आपल्याला चालवता येईल की नाही अशी भीती सुरुवातीला प्रत्येकीच्याच मनात असते पण मला येणारच नाही असं न म्हणता हळूहळू शिकत गेले आणि योग्य मार्गदर्शन मिळाले की ही आताची ऍडव्हान्स वाटणारी सायकल आपली जिवलग मैत्रीण कधी बनते हे समजतच नाही.नुसतं सायकल शिकून उपयोग नसतो त्यासाठी आपली शारीरिक क्षमता, स्नायूंची ताकद वाढवली पाहिजे हे समजते .घरच्यांची,कुटुंबाची ,मुलांची काळजी घेता घेता आपण आपली पण काळजी घेतली पाहिजे, मुलांना पौष्टिक खाऊ घालता घालता आपण आत्तापर्यंत स्वतःकडे किती दुर्लक्ष केले आहे हे जाणवते. आता स्वतःसाठी आहाराचा योग्य व्यायामाचा आराखडा आखला पाहिजे आणि आपण त्यावर योग्य रीतीने काम केलं पाहिजे हे समजायला लागते. रोजचा व्यायाम शरीर आणि मनाला उभारी देतोच पण पुढील अशक्य वाटणाऱ्या सायकल राईड करण्यासाठी मनाची हिम्मतही वाढवतो.
त्यांनी ठरवलं आणि..आमच्या ग्रुप मधल्या सोनाली रायकर हिने दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा २३० किलोमीटरची पुणे पंढरपूर वारी पूर्ण करताना मनात एकच ठरवले होते की घाबरायचे नाही, ही काही स्पर्धा नाही. ही वारी आहे. वारी समजून सुरुवात केली की ती आपोआप पूर्ण होतेच आणि मनातली भीतीही निघून जाते. तिच्या या सकारात्मक विचारांनी तिने तर वारी यशस्वीरित्या पूर्ण केलीच पण पुढच्या वर्षी अनेकांना तिच्या अनुभवांनी प्रोत्साहन दिले.संगीता लुनावत, सायली निंबाळकर, रश्मी परांजपे यांना तिच्या अनुभवांचा इतका फायदा झाला की प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा या तिघींनी यशस्वीरित्या २३० किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून दाखविला.रश्मी परांजपे यांना सायटिका आणि पाठीचे दुखणे यामुळे गेली तीन वर्ष सायकलला हात लावता आला नव्हता. पण वारी पूर्ण करण्याची इच्छा जबरदस्त होती. सोनालीने दिलेल्या हिमतीने, प्रोत्साहनाने रश्मीने घर ऑफिस शरीराचे दुखणे या सगळ्यातून मार्ग काढत पुणे पंढरपूर वारी पूर्ण केली. तिचा आनंद शब्दात व्यक्त करणे अशक्य. संगीता आणि सायली यांचा प्रवास सुद्धा खूप प्रेरणादायी आहे.
होतं काय?
कित्येक वर्ष एक उत्तम गृहिणी म्हणून सर्वांकडून कौतुक करण्याची सवय लागते. मग घराबाहेर पडून आपणही काही करू शकतो, आपलेही कौतुक होऊ शकते, आपल्यालाही मेडल मिळू शकते, आपण आपल्यासाठी एक सेलिब्रेटी बनतो या सर्वातून पुन्हा नवीन काहीतरी करण्याची जिद्द मनात येते.कुटुंबातील सर्वांना ही खरंच काहीतरी करू शकते याचा विश्वास वाटतो. आणि तेही तुमच्या पुढील कार्यासाठी प्रोत्साहन द्यायला सुरुवात करतात.असा सर्व अनुभव आम्ही सर्वांनी घेतला.सायलीने सासू-सासऱ्यांची जबाबदारी सांभाळत, मुलांच्या परीक्षा, नंतर सुट्ट्या असंख्य कौटुंबिक कार्यक्रम या सगळ्यातून मार्ग काढत खचून न जाता जमेल तेव्हा प्रॅक्टिस राईड चालू ठेवली. संगीताने सुद्धा घराच्या सर्व व्यापातून मार्ग काढत आयुष्यात पहिल्यांदाच २३० किलोमीटरचा सर्वात मोठा टप्पा पूर्ण करून घरच्यांना आश्चर्याचा धक्का दिला.एका दिवसात २३० किलोमीटर पूर्ण करून पुणे पंढरपूर सायकलवारी पूर्ण केली. असंख्य अडचणीतून मार्ग काढत वयाच्या एखाद्या विशिष्ट टप्प्यानंतर स्वतःच्या शरीराकडून आणि मनाकडून काही अपेक्षा करणे हा विचारच एका स्त्रीसाठी खूप कठीण असतो.सुरुवातीला प्रत्येकजण वेडी आहेस का तू? काय गरज आहे या वयात सायकल चालवायची? बरं, चालवायची असेल तर इथल्या इथे थोडं अंतर चालव, जास्त लांब जाण्याची गरज काय? झेपणार आहे का तुला? काही इंज्युरी झाली तर काय करणार?या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देता देता जेव्हा तुम्ही पुणे ते पंढरपूर २३० किलोमीटरचा प्रवास सायकलने एका दिवसात करणार आहात असे सांगता ना, तेव्हा तर प्रत्येकीच्या घरात एक वेगळंच नाटक घडतं.या वयात सायकल चालवताय? वेड्या आहात तुम्ही?एका दिवसात २३० किलोमीटर वारी पूर्ण करायचे? शरीराला त्रास द्यायची काय गरज आहे. काही झाले तर ?अशा असंख्य प्रश्नांचा गोळीबार चहुबाजूनी सुरू असतो. हे सर्व ऐकून घेऊन सुद्धा जी मनातून खंबीर राहते आणि जिद्दीने तिच्या सायकल ची साथ सोडत नाही तिला मिळालेल्या यशानंतर जग जिंकल्याच्याच भावना येणार ना!खरंच सांगते आपलं पूर्ण विश्वच बदलतं. आपण पूर्ण नवीन बाहेर पडतो. आजूबाजूला आपल्यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीतून वारी पूर्ण केलेल्या मैत्रिणींकडे बघून नवीन उत्साह येतो. आता अशक्य काही नसते. शरीर आणि मन खंबीर बनते स्वतःचा आत्मविश्वास पुन्हा जागृत होतो. आपलंही या वयात इतकं कौतुक होऊ शकते हे बघून प्रचंड उत्साह वाढतो. मेडल घेताना आपण आपल्यासाठी काहीतरी करू शकलो याचा आनंद आणि गर्व होतो. आपल्या या संघर्षातून मिळालेल्या यशामुळे आज आपण अजून चार जणांना प्रोत्साहित करू शकतो ही भावनाच किती छान आहे.आपली मुलं जेव्हा आपले कौतुक करतात आपला आदर्श घेतात तेव्हा खरंच जग जिंकल्यासारखंच वाटतं.आता आज या सायकल विश्वातल्या आम्ही सेलिब्रेटी आहोत. तुम्हालाही व्हायचय का आमच्या सायकल विश्वातल्या सेलिब्रिटी?चला मग, घ्या सायकल करा एक छोटीसी राईड. या सायकलच्या साथीने पहाटे सूर्योदयाच्या दर्शनाने स्वतः चे आयुष्य कसे उजळून निघते याची प्रचिती नक्की येईल!
(लेखिका होम बेकर असून युट्यूबर आहेत. त्या Cyclist Madhuri Pachpande नावाचे युट्यूब चॅनल चालवतात.)