माधुरी पाचपांडे
मी एक सायकलिस्ट. वय वर्ष ४६. हा लेख लिहून मी आज तिसऱ्यांदा पुणे - पंढरपूर अशी जवळपास २२० किलोमीटरची सायकल वारी एका दिवसात करायला निघाले आहे. आपली सायकल वारी पंढरपुरी विठ्ठल चरणी अर्पण करण्याचा योग हे आम्हा सायकल स्वारांचे भाग्यच. ३ जून हा वर्ल्ड सायकल डे. हा जागतिक सायकल दिवस साजरा करता येणे हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. मी त्याबाबतीत खरंच खूप भाग्यवान आहे. चार वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात सायकल आली आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलूनच गेला. तेव्हाची शरीराची, मनाची आणि सायकलची प्राथमिक अवस्था आणि आज चार वर्षांनी रेकॉर्ड झालेल्या राईडचे आकडे हे सारं पाहिलं की स्वतःचा नवीन जन्म झाल्यासारखं वाटतं. नवीन ओळख, मिळालेला प्रचंड आत्मविश्वास आणि बदललेले मी हे सारं म्हणजे माझ्यातलाच जमीन आसमानाचा फरक आहे.
शालेय दिवसात आपल्यापैकी प्रत्येकानेच सायकल चालवली असेलच. त्यावेळी सायकल ही प्रत्येकाची गरज होती. त्यावेळी सायकल चालवण्यामुळे नकळत आपला फिटनेस राखला जात होता पण हे आपल्या लक्षात येत नव्हते.आधुनिकीकरणाच्या नादात सायकल अडगळीत गेली आणि टू व्हीलर आणि कारची प्रत्येकालाच चटक लागली. आता कोण सायकलवर घाम गाळणार?
माझंही तेच झालं होतं. म्हणता म्हणता वयाची चाळीशी आली. चाळीशी नंतर ‘संपतं हो सगळं विश्व’ असा समज आम्हा स्त्रियांमध्ये इतका रुजवला गेला आहे की सायकल वगैरे चालवणं म्हणजे महामूर्खपणा आहे हे पटवून देणारे माझ्याही अवतीभवती होतेच. मात्र सुरुवातीपासूनच एखादी गोष्ट पटली आणि आवडली तर त्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याचा माझा स्वभाव असल्याने मला सुदैवानं त्या चाळीशी पुराणातून बाहेर पडणे शक्य झाले. अतिशयोक्ति वाटेल, पण बघा ना आपल्या आजूबाजूच्या चाळीशी उलटलेल्या स्त्रिया, किती निगेटिव्हिटी घेऊन जगतात. शरीराच्या कुरबुरी सोबत मनाच्याही कुरबुरी सुरू झालेल्या असतात, हार्मोन बदलांमुळे आपण आता काही करू शकत नाही हा न्यूनगंड येतो ,नवरा,मुलं त्यांच्या कामात व्यस्त झाल्यामुळे माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही, माझी कोणाला गरज नाही असे भयानक विचार सोबतीला असतातच.
अशाच अवस्थेत असताना एकदा मी जात असलेल्या वेलनेस सेंटर मधल्या सायकल ग्रुपने आम्हा दोघी तिघींना सायकल चालवण्याचा आग्रह केला. वजन कमी करण्याच्या धडपडीतच जीव जात होता, सांधे दुखत होते, चालतानाच धाप लागत होती, घरातली काम पूर्ण करणे हेच मोठे दिव्य वाटत होते असे असताना सायकल चालवणे वगैरे विचार स्वप्नात पण येत नव्हते. पण संगतीचा परिणाम होतोच म्हणून संगत फार महत्त्वाची म्हणतात ते उगीच नाही. सायकल चालवणाऱ्या मित्र परिवाराने चिकाटी सोडली नाही आणि एक दिवस मी मुलाची जुनी सायकल घेऊन त्यांच्यासोबत दहा किलोमीटर राईड करण्याचा निर्णय घेतला. मुलाची सायकल खूप महिने चालवली नव्हती. मी फक्त टायर मध्ये हवा भरून राईड ला निघाले. सकाळी थंडी वाजेल म्हणून भरपूर जाड कपडे, स्कार्फ असा सगळा पुरेपूर बंदोबस्त करून सायकलवर टांग मारण्याचा प्रयत्न केला. सर्वजण खूप उत्साह वाढवत होते पण न वापरलेल्या सायकलचे पार्ट जसे जाम झाले होते तसेच माझ्याही शरीराचे पार्ट किती जाम झाले आहेत याचा साक्षात्कार झाला. किती गृहीत धरतो ना आपण शरीराला. घरातल्या वाहनांच्या रेग्युलर सर्विसिंगच्या तारखा आपण विसरत नाही, त्याला रेग्युलर ऑइलिंग करतो,निर्जीव आहे ते तरीही. आणि आपल्याला देवाने दिलेल्या हे मशीन किती दुर्लक्षित असते!
सायकलच्या जाम झालेल्या चेन च्या आवाजासोबत माझ्या शरीरातल्या जाम झालेल्या सांध्यांनीही आवाज दिला. योग्य व्यायाम आणि योग्य आहार याची किती गरज आहे हे जाणवून दिले. असाच आवाज करत जाम होऊन कुडत बसायचं की शरीराची, मनाची योग्य काळजी घेऊन जगण्यातला आनंद घ्यायचा हा विचार माझ्या मनात आला.
पहिली राइड
त्या दिवशीच्या एकाच राइडने मला सायकलींचे वेड लावले. निसर्गाशी पुन्हा संवाद साधता यावा म्हणून आता सायकलिंगच करायचं हे मनाशी पक्कं ठरवलं. कुठलीही गोष्ट सुरु करताना त्या विषयी पूर्ण माहिती घेऊन त्यासाठीची पूर्वतयारी करून मगच ती सुरू करायची हा पहिल्यापासून स्वभाव. एकाच अनुभवावरून शरीरासाठी फिटनेस किती महत्त्वाचा आहे हे लक्षात आले होते. सायकलिंग हा असा प्रकार आहे की ज्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारचे व्यायाम करणे आवश्यक असते. शरीरातील स्नायूंना बळकटी देण्याबरोबरच श्वासावर तुमचे योग्य ते नियंत्रण असावे लागते. योगासनं, प्राणायाम, एरोबिक्स, झुंबा, रनिंग अशा सगळ्या प्रकारच्या व्यायामाची सायकलींसाठी आवश्यकता असते असे मला वाटते.
व्यायामा सोबतच योग्य आहार आणि पुरेशी झोप आपल्याला फायदा देते. सर्वांकडून टिप्स घेऊन योग्य पद्धतीने शरीर बळकट करण्यास सुरुवात केली प्राणायाम आणि मेडिटेशन मुळे श्वास मोकळा झाला आणि मनाची मरगळ सुद्धा निघून गेली.
पण त्यातही पहाटे निघाल्यावर मिळणारी शुद्ध हवा, निसर्गाच्या सुंदर छटा, एकमेकांना एनर्जी देणारा सायकल ग्रुप या सगळ्यांनी नक्कीच मोहात टाकले आणि ठरवलं, योग्य व्यायाम, योग्य आहार यांच्या सोबतीने व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन सायकलिंग सुरू करायचेच. आमच्या वेलनेस सेंटरचे मुख्य महेश निंबाळकर यांच्यामुळे खरंतर सायकल माझ्या आयुष्यात आली आणि त्यांच्याच योग्य त्या व्यायाम आणि आहाराच्या मार्गदर्शनामुळे मला माझा फिटनेस पुन्हा मिळवता आला.
सायकल तर चालवायची पण..
सायकलिंग करायचं हा निर्णय तर घेतला होता पण हे इतकं सोपं नव्हतं माझ्यासाठी. लहान मुलगा आर्यन,त्याची शाळा, त्याला सकाळी उठवणे, त्याची तयारी,त्याचा डबा या सर्व गोष्टी सकाळी वेळेत होणे अपेक्षित होते. आणि सात नंतर राईडला गेले की ट्राफिक आणि उन्हाचा त्रास होणार हे नक्की होतं, माझी अवस्था समजून घेऊन माझ्या मुलाने मला हिम्मत दिली. आई तू फक्त डब्बा बनवून जा, बाकी मी माझी तयारी स्वतः करून शाळेत जाईन. पण तू आता सायकलिंग प्रॅक्टिस बंद करू नकोस. या वयात आई काहीतरी करायला धडपडते तिला साथ द्यायला हवी ही समज असणारी मुलं असणे म्हणजे खरंच भाग्य आहे.
ठरलं मग, मी पहाटे तीन वाजता उठून मुलाचे डबे आणि नाश्ता बनवून, माझी तयारी करून पहाटे पाच वाजता ग्रुप सोबत प्रॅक्टिस राईड सुरू केली. मोठा मुलगा अमेय, स्पोर्ट पर्सन असल्यामुळे त्यानेसुद्धा सायकलिंगमध्ये खूप मदत केली. योग्य ते सायकलिंगचे कपडे वापरणे, सायकलिंग नंतरचा योग्य व्यायाम, दिवसभरचे रुटीन याकडे त्याचे बारीक लक्ष असायचे. कितीही अवघड राइड असली तरीही नेहमी माझी मुलं माझा आत्मविश्वास वाढवत राहायची. आई तू करू शकतेस,अशक्य काही नाही हे माझी मुलं मला रोज सांगायचे.
मग मी स्वतःसाठी सगळ्यात बेस्ट अशी montra ही हायब्रिड सायकल विकत घेतली आणि त्यावरच स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. छोट्या छोट्या राइड मधून रोज काहीतरी शिकायला मिळत होते. होणाऱ्या चुका सुधारून पुढची राइड उत्तम कशी होईल याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.
हळूहळू बदललेल्या रुटीनचा परिणाम शरीरावर आणि मनावर दिसू लागला. सायकलिंग मधल्या एकेक गोष्टी शिकून त्यातही खूप प्रगती झाली. दोन महिन्यांनरत 17 नोव्हेंबर 2019 ला इंडो ऍथलेटिक सोसायटी या नावाजलेल्या सायकलिंग ग्रुपने आयोजित केलेली आयुष्यातली पहिली पन्नास किलोमीटरची सायकलोथोन मी पूर्ण केली.जग जिंकल्याचे फिलिंग होत ते! पहिली लोंग राईड सायकलिंग,पाहिलं मेडल हे सर्व नवीन होते माझ्यासाठी .
या सायकलोथोन मुळे सायकलींग चे अजून नवीन विश्व मला पाहायला मिळाले . वय वर्ष दहा ते वय वर्ष 80 पर्यंत सगळे उत्साही सायकलिस्ट बघून अशक्य काहीच नाही याची पुन्हा एकदा जाणीव झाली, आपल्याला उशीर झाला नाही आपण अजूनही खूप काही करू शकतो हा पुन्हा एकदा विश्वास मिळाला.
सायकल नावाची सोबती..
नियमित सरावामुळे हळूहळू मोठ्या राइड करायला सुरुवात केली. पन्नास किलोमीटर अंतराची राईड सोपी वाटायला लागली. मग तयारी सुरु केली मोठ्या राइडची. शंभरीच्या राईड नंतरसुद्धा एका दिवसात दोनशे किलोमीटर करण्याची तयारी सुरू केली. माझ्या परीने घराच्या आणि मुलांच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून मी निसर्गाच्या सानिध्यात फक्त सायकलिंग मुळे रमू शकत होते. सर्वांचे रुटीन सुरू होण्याअगोदर पहाटे सूर्योदयाचा आनंद घेऊन वाऱ्यायाबरोबर हितगुज करून झाडाझुडपांची गप्पा मारून घरी आल्यावर नवीन ऊर्जा मिळत होती. आज थोडेथोडे करत ६००० किलोमीटरचा टप्पा माझ्या सायकल सोबत पार केला. स्वतःच्या आनंदासाठी केलेली प्रत्येक सायकल राईड ही माझ्यासाठी कायम आनंद आणि समाधान देणारी होती.
सुरुवातीच्या प्रवासात खूप मानसिक त्रासातून जावे लागले. एखादी स्त्री आपल्यासारखं दुखण्याचं रडगाणं न गाता पहाटे उठून पुरुषांच्या सोबतीने सायकलिंग शिकायला जाते याचा त्रास खूप जणांना झालाच.
किती कष्ट घेऊन सर्व घर घरातली काम सर्व जबाबदाऱ्या पार पाडून स्वतःसाठी एखादी स्त्री मेहनत घेते त्यावेळी तिला हिम्मत देणे तर दूर ती पुन्हा घरात कशी बसेल याचीच तयारी करताना काही लोक दिसतात, मी त्याला अपवाद नाही. काही क्षण माझ्याही आयुष्यात असे आणले लोकांनी की पुन्हा सायकलिंग कधीच करू नये असे वाटले. पण माझे आई-बाबा माझी मुलं, माझा परिवार यांनी पुन्हा एकदा हिम्मत देऊन या सर्वातून बाहेर पडण्यास माझी मदत केली. घरच्यांची जबरदस्त साथ असली की आपण कुठलीही लढाई जिंकू शकतो हे मी अनुभवले .
पुन्हा नवीन जोमाने सायकलिंग सुरू करून आज एक सायकलिस्ट म्हणून ओळख निर्माण केली.
स्त्रियांनी सायकलिंग करणे किती आवश्यक आहे यावर तर मी पूर्ण पुस्तक लिहू शकते इतके फायदे मी स्वतः अनुभवले आहेत, फक्त योग्य पद्धतीने सुरुवात करून चिकाटीने प्रवास पूर्ण करायची जिद्द हवी. या दोन वर्षात स्वतःमध्ये जास्तीत जास्त सकारात्मक बदल करता आला.
पुणे ते शिर्डी, पुणे ते पंढरपूर, पुणे लोणावळा पुणे अशा छोट्या मोठ्या राईड करून सहा हजार तीनशे किलोमीटरचा टप्पा मला पार करता आला .
पुणे ते गेटवे ऑफ इंडिया अशी नाईट राईड दोन वेळेस करण्याचा योग आला. खूप दिग्गज सायकलिस्ट व्यक्तींसोबत राईड करता आली. त्यांच्याकडून शिकता आले. सर्वात प्रथम श्रेय जाते ते आमचा इंडो ऍथलेटिक्स सोसायटी या सायकलिंग ग्रुपला. या ग्रुप ने सर्वात प्रथम मला हिम्मत दिली. माझी ओळख निर्माण झाली. अनेक जणांमध्ये आवर्जून नाव घेण्यासारखे असे अविनाश पाटील सर आणि सुरेश माने काका हे आदर्श आहेत. सनरायझर्स ग्रुप मुळे पुणे मुंबई नाईट राईड दोन वेळा करण्याची हिम्मत मिळाली. आता आमचा खूप मोठा परिवार आहे.
मैत्रिणींनो माझ्या अनुभवातून स्वतःच कौतुक करून घेण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त तुमच्या शरीर आणि मनाच्या सायकलला गंज चढायची वाट बघू नका. वय हा फक्त आकडा असतो. तुमची तयारी असेल तर काहीही साध्य करू शकता.अशक्य काहीही नाही. मारा पेडल, फिरू द्या स्वप्नांची चाकं मुक्त मनाच्या वाटेवर. बघा स्वतःचा नवीन जन्म होतो की नाही.
मग येताय ना आमच्या सायकलिंग च्या विश्वात..वाट बघते..
(लेखिका बेकर आणि सायकलिस्ट आहेत.)