Lokmat Sakhi >Inspirational > शून्य कचरा घर असू शकतं? वाचा कचराच नसलेल्या घराची भन्नाट गोष्ट, तुम्हालाही सहज जमावी अशी युक्ती

शून्य कचरा घर असू शकतं? वाचा कचराच नसलेल्या घराची भन्नाट गोष्ट, तुम्हालाही सहज जमावी अशी युक्ती

world environment day 2024 : ५ जून : जागतिक पर्यावरण दिन : पर्यावरणवादी नाही, पर्यावरणस्नेही जगण्याची सुंदर - शाश्वत पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2024 04:17 PM2024-06-04T16:17:43+5:302024-06-04T16:23:15+5:30

world environment day 2024 : ५ जून : जागतिक पर्यावरण दिन : पर्यावरणवादी नाही, पर्यावरणस्नेही जगण्याची सुंदर - शाश्वत पर्याय!

world environment day 2024: how to make your home zero waste, environment day- tips to use home waste for better environment | शून्य कचरा घर असू शकतं? वाचा कचराच नसलेल्या घराची भन्नाट गोष्ट, तुम्हालाही सहज जमावी अशी युक्ती

शून्य कचरा घर असू शकतं? वाचा कचराच नसलेल्या घराची भन्नाट गोष्ट, तुम्हालाही सहज जमावी अशी युक्ती

Highlightsआम्ही पर्यावरणवादी मुळीच नाही. पर्यावरणस्नेही नक्कीच आहोत. आत्तापर्यंत २५ एक टन कचरा आम्ही लँडफिलला जाण्यापासून वाचवला याचंच खूप समाधान आहे.

अंजना देवस्थळे
(लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)

१९९०च्या दशकात पुण्याच्या ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये असताना शेणखत, सोनखत, हिरवळीचे खत याखेरीज आणखी एका नव्या जमान्याच्या खताची ओळख झाली. ते म्हणजे गांडूळ खत. शेणखतापेक्षा अव्वल, जास्ती गुणधर्म असलेलं खत. डॉक्टर हेमांगी जांभेकर ते विकतात हे कळल्यावर त्यांच्याकडून ते पहिल्यांदा घेतलं आणि खरोखरच अगदी एकसारखं, रवाळ, काळंभोर खत हाती लागलं. त्यात झाडांची वाढ चांगली झाली. तणही उगवत नव्हते आणि त्याची चटकच लागली. पुढे लग्न होऊन ठाण्याला आले. मग, पुण्याहून बरेच सोपस्कार करून एसटी पार्सलने ते खत पोहचायचं. एकदा परिचयातल्या हेमांगीताई सरळ म्हणाल्या "किती दिवस लोकांचा कचरा विकत घेणार ग, स्वतः का नाही तयार करत खत?"

तोवर खत तयार करण्याची कल्पना डोक्यातही आली नव्हती, कसं करायचं, याचा पत्ताच नव्हता.
योगायोगाने म्हणा किंवा नशिबाने, अशा अनेक घटना घडत गेल्या, की मार्ग आपोआप मिळत गेले आणि त्यामुळेच गेली २२ वर्षे आम्ही शून्य कचरा घर आणि ऑफीस झालो आहोत. पहिल्यांदा ठाण्याचे कौस्तुभ ताम्हणकर भेटले. त्यांनी ओला कचराच नव्हे तर घरातल्या प्लास्टिकची विल्हेवाट खुबिनी लावली होती. ते आमचे प्रेरणास्रोत. त्याच दरम्यान मी पर्यावरण दक्षता मंचसाठी काम सुरू केलं. घरच्या घरी कचऱ्यापासून खत बनवण्यासाठी "जादुची बादली" अशा एक साध्या सोप्या तंत्राचा आम्ही प्रचार आणि प्रसार करत होतो. शाळांमध्ये, सोसायटीत, कार्यालयात जाऊन घरच्या ओल्या कचऱ्याचं उत्तम खतात रुपांतर करण्याची ही बिन झंजटीची, बिन दुर्गंधीची चमत्कारी खरोखरच जादुई बादली आणि त्यासोबत असलेली औषधी माती.

आम्ही केलं काय?

१. आम्ही दोन बादल्या एकाच वेळी वापरत असू. घर तळमजल्यावर, अंगण असल्याने बादल्या ठेवायची उत्तम सोय झाली. एकदा कंपोस्ट जमायला लागलं ना, की त्याचं व्यसनच लागतं. जी काही विघटनशिल टाकाऊ वस्तू दिसेल ती कम्पोस्टिंगला टाकलीच म्हणून समजा! ओळखीतल्या लोकांचे निर्माल्यही नियमितपणे आमच्या घरी येऊ लागले.
२. पुढे तळमजल्यावरचे घर बदलले. दहाव्या मजल्यावर गेलो. तिथे ना अंगण, ना गच्ची, ना बाल्कनी. नवरा म्हणाला, कंपोस्टिंग बंद करायचं नाही. आपल्या बेडरूमच्या खिडकीत जादुची बादली ठेवूया. तोवर आम्ही कचऱ्याचं वेगवेगळ्या पद्धतीने रुपांतर करण्यात माहीर झालो होतो. दहाव्या मजल्याच्या प्रत्येक खिडकीत असंख्य प्रकारची झाडे लावली. तीही मातीविरहीत. पालापाचोळा, नारळाचा शेंड्या, रसवंतीचा उसाचा चोथा आणि घरगुती कंपोस्ट असा पोषक मातीविरहीत माध्यम वापरल्याने झाडांची वाढ उत्तम झाली आणि आमच्या खिडक्या जिवंत झाल्या. फुलपाखरं, पक्षी, खारुताई, चतुर, भुंगे येऊ लागले.
३. झाडांसाठी नळाचं पाणी न वापरता स्वयंपाक घरातलं टाकाऊ पाणी वापरायला लागलो. तांदूळ धुताना त्याचे कितीतरी विटॅमिन्स वाहून जातात. दही दुधाची पातेली विसाळलेले, इडली डोशाच्या पिठाचे विसळलेले पाणी, कडधान्य भिजवून ठेवलेलं पाणी, असं सगळं गोळा करून फक्त तेच पाणी वापरायचं आम्ही कटाक्षाने पाळलं.


४. याच दरम्यान आम्ही आमचे लहानसे फार्म संपूर्ण नैसर्गिक तत्त्वावर डेव्हलप करायला सुरू केलं. त्यासाठी आमचा घरगुती कचरा आणि लोकांचे निर्माल्य पुरणार नव्हते. खूप मोठ्या प्रमाणावर कचरा लागणार होता. देवळातल्या नारळाच्या शेंड्या आणि निर्माल्य, सार्वजनिक गणपती मंडळाची फुलं, दुकानांची तोरणं, एवढेच नव्हे तर फळवाल्यांची नासकी फळं, रसवंतीच्या उसाचे चिपाड, चहावाल्यांचा चोथा असं सगळं घेऊन आमची सीएनजीवर चालणारी गाडी म्हणजे खरंतर "स्वतःची घंटागाडी" घेऊन आम्ही फॉर्मवर जातो.
५. असं म्हणतात तिसरं महायुद्ध कचऱ्यावरून होईल. आमच्याकडे ते आत्ताच सुरू झाला आहे. ओल्या कचऱ्यावर हक्क कोणाचा? मला खत बनवायचं असतं तर माझ्या नवऱ्याला त्यापासून बायो एन्जाईम. म्हणजे फळाच्या भाज्यांच्या साली, गूळ, पाणी घालून फर्मेंट केलेलं द्रव्य. हे बायो एन्जाईम. झाडांसाठी तरी उत्तम असतंच पण त्याचबरोबर फरशी पुसणं, बाथरूम धुवायलासुद्धा केमिकलविरहीत उत्तम पर्याय आहे.
६. म्हणजे कीटकनाशक, फिनाइल, फ्लोअर क्लीनरसारखे विषारी रासायनिक पदार्थ वापरण्याची आमची गरज संपली. वेगवेगळ्या फळांपासून तयार केलेले असल्यामुळे याचा वासही सुंदर येतो, अगदी फ्रुटी फ्रॅगनन्स.


७. प्लास्टिक, वर्तमानपत्र, दुधाच्या पिशव्या हे तर आपण भंगारवाल्याला देतोच. आम्ही सगळा सुका कचरा व्यवस्थित गोळा करून तो थेट आमच्या परिसरातली कचरावेचक मावशींना नेऊन देतो.
८. जे रिसायकल करताच येत नाही ते घरात कटाक्षाने आणायचं टाळतो.
९. अगदी हल्लीच सोलर मॅन ऑफ इंडिया म्हणजेच प्रोफेसर सोळंकी यांच्यापासून प्रेरणा घेऊन वीज वाचवायच्या उद्देशाने जिथे जमेल तिथे इस्त्री न केलेले कपडे वापरतो.
१०. आम्ही पर्यावरणवादी मुळीच नाही. पर्यावरणस्नेही नक्कीच आहोत. आत्तापर्यंत २५ एक टन कचरा आम्ही लँडफिलला जाण्यापासून वाचवला याचंच खूप समाधान आहे.

anjanahorticulture@gmail.com

Web Title: world environment day 2024: how to make your home zero waste, environment day- tips to use home waste for better environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.