Join us  

World Environment day : आपलं घर आहे, की वस्तूंना आलेला पूर? एवढ्या वस्तू साठवून त्यांचं करता काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2024 4:48 PM

World Environment day : आपल्या घरात आपण किती वस्तू साठवतो, किती कचरा-किती केमिकल्स, त्यावर उपाय शोधून तर पाहा?

ठळक मुद्देआधी घरातल्या सगळ्या वस्तूंचे आणि वस्तू जमा करणाऱ्या आपल्या सवयीचे ऑडिट तरी करू, सुरुवात तर करू!

प्राची पाठक

पर्यावरण रक्षण म्हणजे हातात झेंडे घेऊन घोषणा देणं याच्यापलीकडे आणि आपल्या आवाक्यातलं असं बरंच काही असतं. नुसत्या वीज वाचवा आणि पाणी वाचवा अशा घोषणा देऊन काहीही फरक पडत नाही. त्यापेक्षा आपल्या घरापासूनच पर्यावरण सजग होता येईल. आपल्या घरात कळत-नकळत कितीतरी केमिकल्स येऊन पडतात. घराची स्वच्छता करण्यासाठी लागणारे केमिकल्स तर भरमसाठ असतात. किती केमिकल्स त्या निमित्ताने आपल्या घरात महिन्याच्या महिन्याला येतात? त्यांच्यावर होणारा खर्च, अतिरेकी स्वच्छतेसाठी वाया जाणारे पाणी आणि मुळात म्हणजे इतकी साफसफाई करूनदेखील नेमकी स्वच्छता होते का? केवळ वरवर फरशा चकाचक आणि कानाकोपऱ्यात जाळी जळमटी तशीच, असे चित्र आहे?घरात आपण किती कचरा साठवतो?

१. घरातल्या एकेकाचे कपडे, शूज, मेकअप किट्स, लोशन्स, ॲक्सेसरीज, मॅचिंग सेट्स, सेल्फ केअरवाल्या तमाम गोष्टी, आवडीनिवडीचे सामान असे किती काय काय सर्वत्र पडलेले असते. नव्याचे नऊ दिवस सरले की वस्तू फक्त साचत जातात. जितक्या हौशीने वस्तू खरेदी केल्या जातात तितक्या हौशीने आणि सातत्याने त्या वापरल्या जात नाहीत. त्यांचा पुरेसा आस्वाद न घेताच त्या एकतर खराब होतात किंवा टाकून द्याव्या लागतात, कुठेतरी पडून राहतात.२. आजकाल अनेक घरांमध्ये चार्जर्स, हेडफोन्स, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणारे नवे-जुने सेल, जुने मोबाइल, खराब झालेले गॅजेट्स वायरींचा गुंता होऊन पडलेले असतात.३. ओला कचरा आणि सुका कचरा हेच अजून अनेक लोकांना नीटसे अंगवळणी पडलेले नसतांना या घरात साचत जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे करायचे काय, आपण जाणून घेतलं आहे का? वस्तू दुरुस्त करून वापरायच्या कोणी फारसे फंद्यात पडत नाहीत.

४. घरातली कपाटं आणि वेगवेगळे कप्पे सामानाने ओसंडून वाहत आहेत, असे चित्र अनेक घरी सहजच दिसते. खरोखर इतक्या सामानाची आपल्याला गरज असते का? आणलेल्या सामानातले आपण काय आणि किती वापरत असतो नेमके? सात्यत्याने ‘हे लागेल कधीतरी’ म्हणत जपून ठेवले जातेय का? जपून ठेवले तरी वर्षा-सहा महिन्यांत किमान एकदा तरी ते आपण वापरत आहोत का? कधी तरी लागेल म्हणजे नेमके कधी ते आपण वापरणार आहोत? काही गोष्टी लगेच कामास येणाऱ्या नसतात. पण ‘कधीतरी लागेल’ या गटात कधीतरी अगदी योग्य जागी वापरता येतातसुद्धा. जसे की काही स्पेअरपार्ट्स. ते कसे आणि कुठे सांभाळून ठेवायचे मग? ते सांभाळायचे नसतील आणि कोणालाही वापरायला देण्यासारखे नसतील, तर त्यांची थोडीफार किंमत मिळून ते विकता येतील का?

५. घरातल्या अनेक जुन्या वस्तू केवळ जुन्या झालेल्या असतात; पण चांगल्या दर्जाच्या असतात. त्यांचे काय करायचे? त्यांच्यामुळे अडणारी जागा आपल्याला स्वस्थ बसू देत नसते आणि त्यांना काही किंमत येणार नाही, म्हणून त्या सहजच टाकून/ फेकूनदेखील देता येणार नसतात. अशा सगळ्या वस्तूंचा विचार करू आणि अनावश्यक-वस्तू-मुक्त होऊ!६. स्वयंपाकघरातला फ्रीज हे तर साफसफाईचे मैदान असते. अनेक वस्तू कोणीतरी कधीतरी वापरेल म्हणून त्यात आपली वाट बघत पडलेल्या असतात. कितीतरी औषधे घरात उगाच येऊन पडतात आणि मग साचत जातात. त्यांची एक्स्पायरी डेट उलटून जाते, तरी घरात पडून असतात.

७. ऑनलाइन खरेदी आणि त्या सोबत येणारे पॅकिंग हाही एक विषय असतो. ‘डोंगर पोखरून उंदीर काढणे’ ही म्हण शिकवायचे प्रात्यक्षिकच जणू हे जास्तीचे आणि बरेचदा अनावश्यक असलेले पॅकिंग आपल्याला देत असते. करायचे काय त्या सामानाचे?

८. हा आणि घरात साचत जाणारा एकूणच कचरा कसा हाताळतो आपण? त्याचं वर्गीकरण करून तो विकतादेखील येईल. घरासाठी लागणारी वीज, अन्न शिजवायला वापरला जाणारा गॅस आणि एकूणच विविध गोष्टींसाठी लागणारे पाणी यांचा डोळस वापर आपण करतोय का? पर्यावरणस्नेही राहणीमान साध्या साध्या गोष्टींमधून आपण अंगीकारू शकतो.९. त्यामुळे आधी घरातल्या सगळ्या वस्तूंचे आणि वस्तू जमा करणाऱ्या आपल्या सवयीचे ऑडिट तरी करू, सुरुवात तर करू!prachi333@hotmail.com(लेखिका पर्यावरण आणि शाश्वत विकास यांच्या अभ्यासक आहेत)

टॅग्स :World Environment Dayपर्यावरणसुंदर गृहनियोजनलहान मुलंआरोग्य