नवी दिल्ली : एखाद्या महिलेच्या प्रसूतीनंतर दोन्ही किडन्या निकामी होणे ही अतिशय दुर्मिळ घटना आहे. उझबेकिस्तानमधील २३ वर्षे वयाच्या महिलेवर ही गंभीर स्थित ओढविली होती. प्रसूतीनंतर ती एक वर्ष डायलिसिसवर होती. आता तिच्या आईनेच स्वत:ची एक किडनी आपल्या मुलीला दान करून जीवदान दिले आहे. ही अवघड शस्त्रक्रिया दिल्लीच्या आकाश हेल्थ केअर रुग्णालयात नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. प्रसूती झाल्यानंतर त्या महिलेची किडनी निकामी होण्याचे किंवा आतड्यांमध्ये मोठा दोष उत्पन्न होण्याच्या घटनांचे प्रमाण अवघा अर्धा किंवा एक टक्का आहे.
उझबेकिस्तानच्या महिलेमध्ये प्रसूतीनंतर कमी रक्तदाबामुळे दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे ती गेले वर्षभर डायलिसिसवर होती. तिची प्रकृती दिवसेंदिवस आणखी बिघडत चालली होती. सरतेशेवटी या महिलेच्या आईने आकाश रुग्णालयाशी ई-मेलवर संपर्क साधला व आपल्या मुलीला उपचारांसाठी उझबेकिस्तानहून दिल्लीत आणले.
प्रसूतीनंतर दोन्ही किडन्या निकामी झालेल्या व कमी रक्तदाबाचा विकार असलेल्या महिलेवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. उझबेकिस्तान मधून आलेल्या रुग्ण महिलेला तिच्या आईने (४६ वर्षे) स्वत: ची एक किडनी दान करून जीवदान दिले. या महिलेला प्रसूतीनंतर आतड्याचाही विकार जडला होता. आतड्याचा खराब झालेला भाग शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला.
अचानक किडनी खराब होण्यास कारणीभूत ठरतात १० सवयी; आजपासूनच बदला, अन्यथा...
आकाश रुग्णालयाचे संचालक डॉ. विकास अग्रवाल म्हणाले की, उझबेकिस्तान मधील महिलेवर किडनी प्रत्यारोपणाची तसेच आतड्यातील बिघाड दूर करण्याची शस्त्रक्रिया केल्याशिवाय तिचे प्राण वाचणे शक्य नव्हते. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण व तिच्या आईची प्रकृती स्थिर आहे.
कमी खर्चात शस्त्रक्रिया
उझबेकिस्तान व इतर देशांतून अनेक रुग्ण भारतात विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी येतात. या शस्त्रक्रियांकरिता भारतात इतर देशांच्या तुलनेत कमी खर्च येतो. त्यामुळे अनेक विदेशी रुग्ण भारतामध्ये दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद अशा विविध शहरांत दाखल होऊन उपचार करून घेतात. आखाती देशांतून भारतात उपचारांसाठी येणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे.