Join us  

World Nurse Day 2024 : नर्स ही आईच असते! परिचारिका अंजली कुलथे सांगतात २६/११चा थरार आणि...

By भाग्यश्री कांबळे | Published: May 12, 2024 4:45 PM

World Nurse Day 2024 : 26/11 horror: The nurse who saved 20 pregnant women from terrorists! : अंजली कुलथेंनी सांगितलं 'त्या' रात्रीतले काही थरारक किस्से..

भाग्यश्री कांबळे

२६/११/२००८ (Terrorist Attack) ही तारीख फक्त महाराष्ट्र नसून, संपूर्ण भारत विसरू शकणार नाही. रक्ताची थारोळी, अंधाधुंद गोळीबार, या दिवशी प्रत्येक मुंबईकर जीव मुठीत घेऊन जगत होता. 'त्या' रात्री नराधम अतिरेकी अजमल कसाबने (Terrorist Ajmal Kasab) त्याच्या सहकाऱ्यासोबत दक्षिण मुंबईतील आठ ठिकाणी हल्ले केले होते. ज्यात 'कामा हॉस्पिटल'चा देखील समावेश होता. एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्या ठिकाणी सगळं काही घडत होतं. अतिरेकी कसाब त्याच्या एका सहकाऱ्यासोबत कामा हॉस्पिटलमध्ये (Cama Hospital) शिरला आणि, होत्याचं नव्हतं केलं.

अशा प्रसंगी नर्स अंजली कुलथे (Anjali Kulthe) यांनी प्रसंगावधान दाखवत, २० गर्भवती महिलांसाठी आणि त्यांच्या पोटात वाढणाऱ्या मुलांसाठी ढाल बनून उभ्या राहिले. कसा होता त्या रात्रीचा थरार? नर्सची जबाबदारी पाडताना कोणत्या आव्हानात्मक गोष्टी घडल्या? याची माहिती लोकमत सखीशी बोलताना कामा हॉस्पिटलच्या नर्स अंजली कुलथे यांनी दिले आहे(World Nurse Day 2024 : 26/11 horror: The nurse who saved 20 pregnant women from terrorists!).

१) २६/११चा जीवघेणा हल्ला आणि २० गर्भवती महिलांसह त्यांच्या पोटात वाढणाऱ्या जीवाचे रक्षण.. मागे वळून पाहताना त्यावेळी मिळालेलं बळ आणि अनुभव कसा होता?

'२६/११ हा अचानक घडलेला प्रसंग होता. अशावेळी डॉक्टर असो किंवा इतर कर्मचारी, सगळ्यांनी प्रसंगावधान दाखवून, न घाबरता रुग्णांचे रक्षण केले. २६/ ११ असो किंवा वैश्विक महामारी कोरोना. जेव्हा आम्ही शपथ घेतो, तेव्हा आम्ही आमचे कर्तव्य बजावणार ही शपथ घेतो. त्यामुळे आम्ही प्रत्येक जण रुग्णांसाठी स्वतःला झोकून देतो. आणि कोणतेही संकट आले, तर त्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य ठेवतो. आणि ही शक्ती आम्हाला युनिफॉर्ममधून मिळते. मागे वळून पाहताना निश्चितच या सगळ्या गोष्टी आठवतात. पण या सगळ्या गोष्टी युनिफॉर्मने दिलेल्या जबाबदारीमुळे शक्य झालं असं मी म्हणेन.'

२) बाहेर बंदुकीच्या फायरिंगचे आवाज आणि आत गर्भवती महिलांची धडधड.. अशावेळी तुम्ही त्यांना कसा धीर दिला?

'२६/ ११ रोजी माझी नाईट शिफ्ट होती. पहिल्या मजल्यावरून भयानक दृश्य डोळ्यासमोर घडत होते. त्यावेळी मी 'प्रसूती कक्षाची इन-चार्ज' होते. माझ्या वार्डमध्ये २० गर्भवती महिल्या होत्या. २ अतिरेकी वार्डाच्या दिशेने येत असताना पाहिलं. मी दरवाजा, लावून घेतला आणि गर्भवती महिलांना पॅन्ट्रीच्या खोलीत हलवलं. त्यावेळी त्यांच्यासोबत नातेवाईक नव्हते. सगळ्या महिला माझ्या भरवश्यावर होत्या. पण मला घाबरून चालणार नव्हतं. मी त्यावेळी प्रत्येक महिलेशी बोलून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.'

Mother's Day Special : गुलाबी साडी आणि लालीलाल..अवघ्या ५०० रुपयात आईसाठी घ्या ट्रेण्डी सुंदर गुलाबी साडी!

३) गर्भवती महिलांना शारीरिक, मानसिक स्वास्थ्य जपणं खूप महत्त्वाचं असतं. अशा नाजूक प्रसंगी त्यांच्या आरोग्याची काळजी तुम्ही कशी घेतली?

पॅन्ट्रीच्या खोलीत शिफ्ट केल्यानंतर, गर्भवती महिलांना धीर देण्यासोबत त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं होतं. बऱ्याचदा गर्भवती महिलांना स्ट्रेसमध्ये लेबर पेन सुरु होतात. त्यावेळी मी त्यांना माझ्या शब्दातून मनोबल देण्याचा प्रयत्न केला. मी नॉर्मल डिलिव्हरी करू शकते. परंतु. जर हायपरटेन्शन असणाऱ्या महिलेला लेबर पेन सुरु झाल्या तर, अशावेळी डॉक्टरांसह बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची उपस्थिती लागतेच. कारण अशा बहुतांश महिलांची प्रसूती सिझेरिअनद्वारे होते. अशावेळी महिला आणि नवजात बालक या दोघांनाही धोका असतो. त्यामुळे त्यांची काळजी घेत धीर देण्याचा प्रयत्न केला. 

४) गर्भवती महिलांना जेव्हा तुम्ही वॉर्डातील एका छोट्या पॅन्ट्रीच्या जागेत नेलं, तेव्हा कुणा महिलेला प्रसूती वेदनांचा त्रास झाला होता का?

'२६/११च्या त्या थरारक रात्री २ महिलांची प्रसूती झाली. त्यातल्या एका महिलेला लेबर वार्डमध्ये घेऊन जाण्याची वेळ आली होती. गर्भवती महिला पॅन्ट्रीच्या खोलीत होती. तिला हायपरटेन्शनचा त्रास होता. शिवाय लेबर पेन देखील होत होतं. अशावेळी मी त्वरित डॉक्टरांना फोन लावला. बाहेर प्रचंड गोळीबार सुरु असल्याकारणाने त्यांनी पॅन्ट्रीच्या खोलीत येण्यास नकार दिला. अशावेळी महिलेला शब्दातून मनोबल देत, पायऱ्यांवरून जात भिंतीचा आधार घेत तिला लेबर वार्डमध्ये शिफ्ट केलं, आणि मी पुन्हा पॅन्ट्रीच्या खोलीत आले. सुरुवातीला गर्भवती महिला घाबरली, पण तिला शिफ्ट करणं हे युनिफॉर्मने दिलेली जबादारी होती, आणि ती मी पार पाडली.'

५) जोखमीचं काम केल्यानंतर तुम्हाला याचा काही मानसिक त्रास झाला का? २६/११ च्या थरारक रात्रीतून तुम्ही कधी यातून बाहेर पडलात?

'२६/११ च्या त्या थरारक रात्रीनंतर कामा हॉस्पिटलमधल्या प्रत्येक व्यक्तीला त्रास झाला होता. महिनाभर तरी आम्ही कोणीच यातून बाहेर पडलो नव्हतो. अशावेळी आमच्या वरिष्ठांनी मेन्टली सपोर्ट दिला. आमच्या इथे ३ शिफ्ट असतात. आम्ही त्या घटनेतून बाहेर येऊ शकत नव्हतो, म्हणून त्यांनी आमची एकच शिफ्ट लावली होती. शिवाय घरच्यांनी देखील आम्हाला सांभाळून घेतलं होतं.'

६) मृत्यूच्या जबड्यात पोहोचलेल्या गर्भवती महिलांसह वीस नवजात बालकांचे प्राण वाचवले. आज त्या मुलांना कदाचित ठाऊक असेल नसेल, पण या गर्भवती महिलांपैकी आत्ता कोणी आपल्या मुलांना घेऊन तुम्हाला भेटायला येतं का? किंवा भेट होते का?

'मध्यंतरी मी टाईम्स ऑफ इंडियाच्या प्रोग्रामला गेले होते, तेव्हा तिथे एक फॅमिली देखील आली होती. त्यातील एका महिलेची २६/११ रोजी प्रसूती झाली होती. घटनेची आठवण म्हणून त्यांनी आपल्या मुलीचे नाव 'गोली' असं ठेवलं होतं. त्यावेळी भेटून त्यांनी आभार मानले.

लेक रात्रभर जागवते, झोपच पूर्ण होत नाही कारण..! प्रियांका चोप्रा सांगते आई झाल्यानंतर बदललेलं झोपेचं चक्र

शिवाय २६/ ११ ही घटना जेव्हा घडली, त्यावेळी जेव्हा पोलिसांनी येऊन 'आता तुम्ही सर्वजण सुरक्षित आहात' असं सांगितलं. तेव्हा प्रत्येक रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात येऊन आम्हा सर्वांचे आभार मानत होते. तेव्हा मला माझ्या वडिलांची आठवण झाली. माझे वडील आज हयात नाहीत. पण मला ही गोष्ट करण्यासाठी त्यांच्याकडून बळ मिळालं असं मी म्हणेन. ते देखील धाडसी होते.'

८) तुम्हाला युनिफॉर्ममुळे बळ मिळालं, युनिफॉर्ममधली अंजली आणि ड्युटी संपल्यानंतरची अंजली यात काय फरक आहे?

'नर्सची जबाबदारी पार पाडण्यासाठी युनिफॉर्म बळ देते. कर्तव्य बजावत असताना मी, फक्त पेशण्टसाठी आणि पेशण्टपुरतीच मर्यादित असते. त्यांची काळजी घेणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. पण ड्युटी संपल्यानंतर मी आई आणि बायकोची जबाबदारी सांभाळते. चूल आणि मुल कुणालाच चुकलेलं नाही. घरातही आई आणि हॉस्पिटलमध्येही मी आईचं कर्तव्य पार पाडत असते. नर्स ही एक आईच असते. फरक एवढाच आई जन्म देते, आणि नर्स आईप्रमाणे सेवा, सरंक्षण, रुग्णांची काळजी घेत असते.'

टॅग्स :26/11 दहशतवादी हल्लामुंबईदहशतवादी हल्लादहशतवादीप्रेरणादायक गोष्टी