अनघा खेकाळे, फोटोग्राफरकेवळ पुरूषांसाठीच म्हणून ओळखले जाणारे जे काही व्यवसाय होते, त्यात काही वर्षांपर्यंत फोटोग्राफीही असायची. फोटोग्राफर आहे म्हणजे तो पुरूषच असणार, इतकं ते लोकांच्या डोक्यात भिनलेलं होतं. पण महिलांनी या क्षेत्रात काही काळापुर्वी पाऊल ठेवलं आणि आज महिला फोटोग्राफरची वाढती संख्या पाहूून निश्चितच असं म्हणता येईल की महिला आता या क्षेत्रात भक्कम पाय रोवून उभ्या राहिल्या आहेत.
photo credit : Anagha Khekale
मी जेव्हा या क्षेत्रात आले तेव्हा सुरूवातीच्या काळात मलाही खूप अडचणींचा सामना करावा लागला. एका लहान गावातून माझी फोटोग्राफीची सुरूवात झाली. फोटोग्राफी हा माझ्या सासरचा व्यवसाय. घरात तीन उत्तम फोटोग्राफर. यात माझा निभाव कसा लागणार, असं मला नेहमीच वाटायचं. पण जिद्द आणि आवड असली की सगळं काही आपोआप होतं.
photo credit : Anagha Khekale
मी फोटोग्राफर म्हणून कामाला सुरूवात केली तेव्हा एक बाई साधा पासपोर्ट फोटोही काढू शकत नाही, असं समजणारी काही लोकं होती. मला स्वत:लाच असा अनुभव आला आणि मी बाई असल्याने मला फोटो काढता येईल की नाही, असे वाटून चक्क एका काकुंनीच माझ्या हातून साधा पासपोर्ट फोटो काढण्यासही नकार दिला होता. काळानुसार हे सगळे बदलत गेले आणि आज माझ्यासकट अनेक महिलांना फोटोग्राफर म्हणून समाजाने स्विकारले आहे.
photo credit : Anagha Khekale
आज पारंपरिक पद्धतीने चालत आलेले सगळे फोटोशूट तर करतेच पण डिलेव्हरी शुट हा एक नवा कन्सेप्ट मी शोधून काढला आहे. अगदी हॉस्पिटलची रूम ते ऑपरेशन थिएटर, असा एक नवीन फोटोशूटचा प्रकार डॉक्टरांच्या परवानगीने करता येतो आणि त्या सुखद क्षणांच्या आठवणीही फोटो रूपाने आपल्याकडे कायम राहतात. भारतात हा प्रकार नवा असला तरी तो रूजतोय. मी एक स्त्री असल्याने मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या स्त्रीच्या भावना अगदी सहज समजून घेता येतात आणि मला असे डिलेव्हरी शूट करण्याची संधी मिळते. महिला फोटोग्राफर असण्याचा हा एक मोठा फायदाच तर आहे. शेवटी काय स्त्री फोटोग्राफर असो किंवा पुरूष फोटोग्राफर.. प्रत्येकाच्या सुखद आठवणींचा ठेवा जपून ठेवणे, हेच तर आमचे प्रथम कर्तव्य आहे.
(लेखिका अनघा खेकाळे या औरंगाबाद येथे फोटोग्राफर असून गुरूकृपा स्टुडियोच्या संचालिका आहेत.)