Join us  

रक्ताचा कॅन्सर झालेल्या १२ वर्षांच्या मुलीनं प्राण गमावले, पण इतरांना शिकवलं कॅन्सरसह आनंदानं कसं जगायचं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 7:46 PM

world rose day 2022 : मेलिंडा रोज. (Melinda Rose) १२ वर्षेच ती जगली पण कॅन्सर रुग्णांना जगण्याची उमेद देण्याचं काम त्या जीवानं शेवटच्या क्षणापर्यंत केलं.

ठळक मुद्देजगाचा निरोप घेताना तिनं जगायचं कसं हे इतरांना शिकवलं. 

वर्ल्ड रोज डे. (world rose day 2022) खरंतर या ‘रोज’चा गुलाबाशी काहीही संबंध नाही. कॅन्सरसह जगणाऱ्या व्यक्तींना आनंद, उमेद देणं त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून सोबतीनं चालण्याचा हा दिवस. कॅन्सरसंदर्भात जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. २२ सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड रोज डे म्हणून साजरा केला जातो. मात्र ही गोष्ट सुरु झाली ती वेगळ्या रोजपासून. अवघी १२ वर्षांची मुलगी. मेलिंडा रोज. (Melinda Rose) कॅनडाची. या मुलीला जगातल्या दुर्मिळ कॅन्सरपैकी एक रक्ताचा कॅन्सर झाला होता. मात्र जेवढं आयुष्य तिच्या वाट्याला आलं ती ते उमेदीनं तर जगलीच. पण त्या लहानशा वयात तिनं शेकडो कॅन्सर पेशंटला जगण्याचं बळ वाटेल, इच्छा होईल म्हणूनही काम केलं..

(Image : google)

१९९४ ची ही गोष्ट. कॅनडातली ही लहानशी मेलिंडा रोज. डॉक्टरांनी निदान केलं की तिला ब्लड कॅन्सर आहे. तो ही अतिशय गंभीर. औषधोपचार सुरु असताना मेलिंडा शाळेत जायची. मैत्रिणींसोबत रहायची. त्याकाळात तिनं कॅन्सर पेशंटला पत्र लिहायला सुरुवात केली. काही इमेल्सही लिहिल्या. आपले अनुभव तर शेअर केलेच, पण आपल्याला कॅन्सर झाला म्हणजे संपलं असं न मानता आयुष्य कसं आनंदात जगता येतं हे सांगत राहिली. तशी स्वत:ही जगली. १९९६ उजाडता उजाडता डॉक्टरांनी सांगून टाकलं की मेलिंडाकडे आता फार दिवस नाहीत. पण म्हणून तिनं तिचं जगणं थांबवलं नाही. उत्साहानं एका कॅम्पलाही गेली. सोबत नर्सही. तिनं अनेकांना कॅन्सरशी झुंजायचं, बरं होण्याचं बळ दिलं. १५ सप्टेंबर १९९६ मेलिंडा रोज गेली..पण जगाचा निरोप घेताना तिनं जगायचं कसं हे इतरांना शिकवलं. कॅन्सरसह जगणारे रुग्ण, त्यांचे जीवलग यासाऱ्यांनी तिनं उमेद दिली की हा आजार तर बरा होतोच. पण तो सोबत असताना आपण आनंदानं जगणं सोडू नका. आपलं जगणं जास्त अनमोल आहे.त्याच रोजच्या नावानं वर्ल्ड रोज डे साजरा होतो. आपल्या भोवताली कुणी कॅन्सरसह जगत असेल तर त्याला जगण्याचं बळ देताना जगण्याचा आनंद, उमेद आपसात वाटून घेणं हेच या दिवसाचं गमक आहे.

टॅग्स :कर्करोगप्रेरणादायक गोष्टी