मनाली बागुल
तरुण मुलं, त्यातही मिलेनिअल्स आणि योगाभ्यास हे कॉम्बिनेशन जरा गडबड वाटतंच. जरी अनेक सेलिब्रिटी योग करत असले तरी तरुण मुलंमुली जिम मारण्याला जास्त महत्त्व देतात. त्यात एक ग्लॅमर आहे असं अनेकांना वाटतं. जिमबडी ते जिम ॲक्सेसरी आणि आपली टोन्ड बॉडी यांची चर्चा असते इन्स्टाच्या जगात. पण त्याच वयातली एक तरुणी योगाभ्यास करता करता इतकी लोकप्रिय होते की तिचे क्लासेसच नाही तर व्हिडिओ पाहून अनेक तरुणी-तरुणींनाही तिच्या फ्लेक्झिबल आणि कमाल फिट बॉडीचं कौतुक वाटतं. तिचं नाव श्रुती शिंदे.
डोंबिवलीची श्रुती शिंदे ही निष्णांत योग प्रशिक्षक आहे. वयाच्या दहाव्या वर्षी तिने डोंबिवलीतील सुहासिनी योग केंद्रातून योगाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली, वय जेमतेम १२ ही नव्हतं तर ती इतरांना योग शिकवू लागली. या मुलीचे नैपूण्य पाहून अनेकांना कमाल वाटत असे. तिनं योगाचं संपूर्ण शिक्षण तिचे गुरू प्रवीण बांदकर यांच्याकडून घेतलं. आता गेल्या आठ वर्षांपासून प्रशिक्षणाचं काम ती करत आहे. समवयस्कांसोबत तिचे राज्यभर दौरे सुरू असतात.
अंध, अपंग आणि विशेष मुलांनाही ती योगाची साधी, सोपी आसने शिकवते. श्रृतीच्या योगसाधनेला आधात्मिकतेची जोडही आहे. याशिवाय अष्टांग योग, ऋषीमुनींचं तत्वज्ञान सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ती करतेय. गुरूंकडून प्रेरणा घेत तिनं बर्फाच्या थंडगार लाद्यांवरचा योग, दीप योग असे वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरूवात केली.
जिम, झुंबा हे व्यायाम प्रकार असताना योगाकडे का वळावं?
हाच प्रश्न श्रुतीला विचारला तर ती सांगते, आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक स्वास्थ्य नाही. सध्याचे आजार, धावपळ यांमुळे मानसाचं मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. जीम, एरोबिक्स या गोष्टी आरोग्यासाठी उत्तम आहे पण एका मर्यादीत पातळीपर्यंत, वजन कमी करणं, फिटनेस मेटेंन करणं, आजारांपासून लांब राहणं यासाठी शारीरिक क्रिया महत्वाच्या आहेतच. पण योगासनं विशेष आहेत कारण योगासनांना पुरातन संस्कृतीचा इतिहास आहे.
त्यावर बरेच अभ्यास झालेत आहेत यातून सिद्ध होतं की योगा माणसाच्या शारीरीक तसेच बौध्दीक विकासाठी उपयोगी ठरतो. सध्याच्या तरूणाईनं इतर कोणतेही व्यायामप्रकार केले तरी योगासनंही आवर्जून करावीत. कारण योगामुळे मानसिक स्थिरता येते. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना उत्तम माणूस बनण्यासाठी योगशास्त्र महत्वाचं आहे.
कुटुंबाची प्रेमळ साथ
श्रुती सांगते, ''योगाची सुरूवात केली तेव्हा माझं वय खूपच कमी होतं. तेव्हा माझ्या आईनं पूर्णपणे पाठिंबा दिला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या गुरुपर्यंत मला माझ्या आईनं पोहोचवलं. दहावीनंतर क्रमिक उच्च शिक्षण न घेता योग विषयातच करिअर करण्याचा निर्णय जेव्हा घेतला, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. शिवाय तिच्याकडून योग प्रशिक्षणाचे धडेही गिरवले.'' आता यू ट्यूब चॅनेलवरही 'श्रुती योग' नावाने तिची प्रात्यक्षिके उपलब्ध आहेत.
फेसबुकवरही लाखो लोक श्रृतीचे व्हिडीओ पाहून आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवतात. या तरुण मुलीनं योग हे आपलं फक्त करिअर नाही तर पॅशन म्हणून आणि सतत अभ्यास म्हणून स्वीकारलं आहे.