आपल्या प्रत्येकाला रोजच्या आयुष्यात काही ना काही चिंता, ताण असतातच. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळींपर्यंत वयाच्या प्रत्येक टप्प्यावर सगळेच विविध प्रकारच्या ताणांचा सामना करत असतात. शालेय वयात अभ्यास, परीक्षा मग करिअर, नातेसंबंध, आर्थिक गणिते, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आरोग्य अशा अनेक गोष्टींशी दोन हात करत आपण पुढच्या टप्प्यावर जात असतो. मन ही अशी गोष्ट आहे की ती कधीच स्थिर नसते आणि या मनात सतत आंदोलने सुरू असतात. कितीही जागेवर आणायचं म्हटलं तरी भरकटणारं हे मन म्हणजे अस्थिरतेचं एक उदाहरणच असते ( 1 Simple trick to be fresh, Happy in new year with new Energy).
या सततच्या विचारांनी आपल्याला कायम ताणात असल्यासारखं वाटतं. समोरुन आपण तसं दाखवत नसू किंवा चेहऱ्यावर तसं दिसत नसेल तरी अनेकदा आपल्या मनाच्या तळाशी हा ताण साचलेला असतो. नवीन वर्ष म्हणजे नवी आव्हानं, नव्या संधी यांचं मोकळं अवकाश. याच निमित्ताने आपल्याला मनातून मोकळं व्हायचं असेल, नव्याने आयुष्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायला हवेत. आपल्या मनाचा थांगपत्ता दुसऱ्या कोणापेक्षा आपल्याला जास्त चांगला लागलेला असतो आणि त्यात असलेला गुंता किंवा ताण मोकळा करायचा असेल तर काही किमान प्रयत्न केल्यास नक्कीच फायदा होतो. आज आपण असा एक सोपा उपाय पाहणार आहोत जो केल्याने तुम्हाला मनातून मोकळं व्हायला नक्कीच मदत होईल.
उपाय काय?
तुम्हाला जब वी मेट सिनेमा आठवतो. त्यामध्ये गीत म्हणजे करीना आदित्य म्हणजेच शाहिद कपूरला आपल्या जुन्या आठवणी, फोटो जाळून टॉयलेटमध्ये फ्लश करायला सांगते. ही एक साधी कृती वाटत असली तरी मनातून मोकळे होण्यासाठी ती अतिशय महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे एक कागद घ्यायचा आणि आपल्या मनातील सगळे विचार, भावना त्यावर आपल्याला जसे वाटते तसे लिहून काढायचे. आपल्या मनात असलेला राग, भिती, नकारात्मकता, अपयश अशा सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना या निमित्ताने कागदावर किंवा मूर्त रुपात येतात. अनेकदा या भावना मनात खोलवर असतात आणि कधी कधी विचारांच्या माध्यमातून त्या वर येत असतात. पण लिहील्याने त्या बाहेर येण्यास मदत होते. असे लिहीता लिहीता आपले बरेच कागद भरु शकतात.पण त्याची चिंता न करता मन मोकळं करणं हा मुख्य उद्देश असल्याने आपल्या डोक्यातला सगळा गुंता कागदावर उतरतो. त्यामुळे तुम्हाला आतून मोकळं आणि हलकं वाटण्यासाठी हा प्रयोग एकदा नक्की करुन पाहा.