सध्या प्रत्येकाचंच रुटीन अतिशय व्यस्त, धावपळीचं झालं आहे. त्यात आणखी भर म्हणून शिक्षण, करिअर, नोकरी, रिलेशन्स, आरोग्य असे सतत कोणते ना कोणते ताण मनावर असतातच. कशाचं तरी टेन्शन (stress and tension) असतं. मनावर ओझं घेऊन कायम त्याच तणावाखाली राहिल्याने मग चांगली होणारी कामंही बिघडून जातात. तब्येतही बिघडू लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगण्यातली मजा कमी होऊन जाते. खरंतर आपल्या समोरच्या काही अडचणी एवढा ताण घेण्याइतक्या मोठ्या नसतातही. पण तरीही मनावर दडपण येत असेल, सतत ताण जाणवत असेल तर हे काही सोपे उपाय करून बघा. हे उपाय HT शी बोलताना आहारतज्ज्ञ नेहा प्रेमजी यांनी सांगितले आहेत. (3 Ways to De-Stress)
मनावरचा ताण कमी करण्याचे उपाय१. नेमका ताण कोणता ते ओळखाअनेक लोक कायम टेन्शनमध्ये असतात. पण त्यांना नेमकं टेन्शन कशाचं आहे, हे सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी मनावर ओझं येतंय, असं जेव्हा वारंवार जाणवायला लागतं, तेव्हा ते ओझं नेमकं कशाचं याचा स्वत:शी थोडा शांतपणे विचार करा. नेमका कशाचा ताण आहे, हे एकदा कळलं की मग ताण कसा घालवायचा याचा लॉजिकली विचार करता येतो. ध्यान, मेडिटेशन, दिर्घ श्वसन असे व्यायाम प्रकार करून मन शांत करा. यामुळे मग मुड चांगला होण्यासाठीही निश्चितच मदत होते. ध्यान कसे करायचे, याची योग्य पद्धत तुम्ही इंटरनेट किंवा पुस्तकातूनही शोधून घेऊ शकता.
२. व्यायाम करानुकत्याच एका अभ्यासावरून असे लक्षात आले आहे की एकाच जागी, एकाच अवस्थेत बसून राहिल्याने आपण तोच तोच विचार करतो आणि त्यामुळे मग ताण वाढत जातो. ताण घालवायचा असेल तर एरोबिक्स किंवा झुंबा वर्कआऊट अधिक फायदेशीर ठरते. या व्यायामाचे बेसिक व्हिडिओ पाहून तुम्ही तशा पद्धतीने शारिरीक हालचाली केल्यास ताण कमी होण्यासाठी निश्चितच मदत होईल. कारण यामध्ये असणारे संगीत शरीरात हॅप्पी हार्मोन्स तयार करायला मदत करतात. यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते. हे व्यायाम आवडत नसतील तर वॉकिंग, स्विमिंग किंवा सायकलिंगसारखे व्यायामही फायदेशीर ठरू शकतात.
३. झोपेचे चक्र सुधाराताण आला की झोप कमी होते, हे अगदी साहजिक आहे. पण झोप झाली नाही, तर त्यामुळे ताण आणखी वाढतो आणि वेगवेगळे आजारही मागे लागू शकतात. त्यामुळे या काळात झोपेचे चक्र व्यवस्थित राहील याची आवर्जून काळजी घ्या. सकाळी लवकर उठा आणि रात्री लवकर झोपा. ताणामुळे झोप येत नसेल तर रात्री १० च्या सुमारास बेडरुममध्ये येऊन पुर्णपणे अंधार करा. मोबाईल बघणे कटाक्षाने टाळा. आणि डोळे लावून पडा. दोन- तीन दिवस त्रास होईल, पण त्यानंतर मात्र आपोआप त्यावेळेला झोप येऊ लागेल. शांत झोप झाली की मनावरचा बराच ताण कमी होतो आणि नवा उत्साह जाणवतो.