पैसे कमावणाऱ्यांपैकी किमान ६० टक्के जनता ही कोणत्या ना कोणत्या ऑफीसमध्ये काम करत असते. मग ते कोणती सर्व्हीस देणाऱ्या कंपनीचे ऑफीस असो किंवा एखादी बँक, सरकारी कार्यालय, आयटी कंपनी असे काहीही. ऑफीसमध्ये काम करायचे म्हटल्यावर ऑफीसच्या वेळा, नियम, कामाचे स्वरुप हे सगळे लक्षात घेऊन आपल्याला वागावे लागते. आपण एखाद्या कंपनीचे कर्मचारी असल्याने आपल्याला हे सगळे पाळणे भागच असते. बहुतांश जणांना ऑफीसमध्ये अमुक काम तमुक कालावधीत पूर्ण व्हायला हवे असे टार्गेट असते. ते काम वेळेत झाले नाही तर वरीष्ठ आपल्याला त्याचा जाब विचारु शकतात (3 Tips to complete office work in time).
कामाचे स्वरुप, आपली काम करण्याची पद्धत आणि इतक काही कारणांनी आपले काम वेळेत होत नाही आणि मग आपल्याला ऑफीसच्या ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ थांबून काम पूर्ण करावे लागते. असे सतत व्हायला लागले तर वर्क-लाईफ बॅलन्स होत नाही आणि मग आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते. पण हेच काम वेळेत झाले तर आपल्याला ताणही येत नाही आणि आपण वेळेत ऑफीसमधून घरी जाऊ शकतो. असे होण्यासाठी कामाचे, वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते. हे नियोजन कसे करायचे पाहूया...
१. कामाच्या वेळा
आपल्या हातात दिवसभरात असलेली कामं आणि त्यांना लागणारा वेळ यांचे योग्य ते गणित मांडणे आवश्यक असते. त्यामुळे आपल्याला कामांचा आणि वेळेचा नीट अंदाज येतो. विशिष्ट कामाला किती वेळ लागणार आहे त्यानुसार आपल्या ऑफीसमधल्या वेळाचे व्यवस्थित प्लॅनिंग केले तर काम वेळेत संपण्यास मदत होते.
२. नियोजन योग्य हवे
आपल्याला कामांचे प्राधान्य माहित असते. त्यानुसार आपले वरीष्ठ आणि इतर सहकारी यांच्याशी चर्चा करुन त्या त्या दिवसाच्या कामांचे योग्य नियोजन करायला हवे. तसे केल्याने अमुक दिवशी ही कामे पूर्ण करायची आहेत याची ब्लू प्रिंट आपल्यासमोर राहते आणि त्यानुसार कामे करणे सोपे होते. पण नियोजनच नसेल आणि आपण जमेल तशी कामं करत राहिलो तर कोणतेच काम नीट पूर्ण होत नाही.
३. फोकस महत्त्वाचा
काम कोणतेही असो त्यासाठी फोकस अतिशय महत्त्वाचा असतो. आपण करत असलेल्या कामावर आपला नीट फोकस असला तर ते ठरलेल्या वेळेपेक्षा कमी वेळात पूर्ण होणे शक्य असते. पण नीट फोकस नसला तर मात्र त्याच कामासाठी कित्येक तासही लागू शकतात. ऑफीसमध्येही आपले लक्ष वेधतील अशा बऱ्याच गोष्टी आपल्या आजुबाजूला असतात. त्याकडे योग्य वेळी दुर्लक्ष करुन वेळच्या वेळी नीट काम करणे फायदेशीर ठरते.