भावना हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. मात्र या भावना आपल्या नियंत्रणात असल्या तर ठिक आहे. आपण जास्त प्रमाणात भावनिक असलो तर त्याचा आपल्याला अनेकदा त्रास होतो. असे लोक समोरच्याच्या काही गोष्टी फक्त चांगल्या पद्धतीने ऐकतच नाहीत तर त्या फिल करतात. त्यामुळे दुसऱ्याचे दु:ख आपलेच वाटून या लोकांना फार त्रास होतो. एखादवेळी असे होणे ठिक आहे, पण तुमच्या बाबतीत सतत असे होत असेल तर तुम्हाला त्यावर वेळीच विचार करण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्या. जे लोक भावनिक असतात ते कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त प्रमाणात विचार करतात. अशा लोकांना कधी आपले विचार बंद करायचे आणि मन शांत करायचे हेच लक्षात येत नाही. किंवा लक्षात आले तरी त्यांचा त्यावर कंट्रोल राहत नाही (5 Effective Yoga Asanas For Sensitive People to Calm Mind).
असे सतत विचार केले किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता केली तर मन शांत राहत नाही. अशावेळी सतत निराशा येणे, भिती वाटणे, उदास वाटणे, ताण आल्यासारखे होणे अशाप्रकारचे मूड स्विंग्स होत राहतात. अशावेळी योगा करणे हा उत्तम उपाय ठरु शकतो. मन, शरीर स्थिर करण्यासाठी योगाचा अतिशय चांगला उपयोग होत असून श्वासावर नियंत्रण मिळवणे, हृदयाचा वेग सुधारणे, शरीर आणि मनाला आराम मिळणे अशा सगळ्यासाठी हे फायदेशीर असते. नियमितपणे योगा केल्यास स्वत:च्या आत डोकावण्यास त्याची चांगली मदत होते. इतकेच नाही तर जे खूप जास्त प्रमाणात भावनिक आहेत त्यांना याचा चांगलाच फायदा होतो. पाहूयात कोणती योगासने फायदेशीर ठरतात.
१. हस्तपादासन
पाय ताठ ठेवून कंबरेतून खाली वाकायचे. हात जमिनीला आणि डोके गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते आणि नकळत आपल्याला फ्रेश वाटायला लागते.
२. बलासन
वज्रासनात बसायचे. पोटातून खाली वाकत डोके जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही हात पायाच्या बाजूने तळव्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. यामुळे सकारात्मकता वाढण्यास नक्कीच मदत होते आणि मन शांत होण्यास त्याचा चांगला फायदा होतो.
३. उष्ट्रासन
पाठीच्या मणक्यावर आलेला ताण कमी करण्यासाठी हे आसन अतिशय उत्तम आहे. यामुळे शरीराची लवचिकता तर वाढतेच पण तुमचे काम दिवसभर बसून करायचे असेल तर बसण्यामुळे शरीरावर येणारा ताण कमी होण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो.
४. मार्जारासन
या आसनामुळे स्नायूंची हालचाल सुरळीत होण्यास मदत होते. इतकेच नाही तर शरीरातील रक्तप्रवास वाढण्यास या आसनाचा फायदा होतो. भावनिक लोक अधिक प्रमाणात विचार करतात त्यामुळे त्यांचे स्नायू आखडण्याची शक्यता असते, अशावेळी हे आसन फायदेशीर ठरते.
५. विपरीत करणी
भावनिक लोकांना अनेकदा जास्त प्रमाणात विचार केल्याने झोप येत नाही. झोप पूर्ण झाली नाही की त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे ज्यांना असा त्रास होतो त्यांनी विपरीत करणी हे आसन आवर्जून करावे.