Join us  

5 Habits Improve Memory : सतत काही ना काही विसरता, घोळ घालता? ५ सोपे उपाय, विसरभोळेपणा विसरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2022 3:55 PM

5 Habits Improve Memory : तुम्हालाही छोट्या-मोठ्या गोष्टी विसरल्याने अडचणींचा सामना करावा लागत असेल तर हे उपाय नक्की करुन बघा

ठळक मुद्देस्मरणशक्ती ही आपल्याला मिळालेली देण असल्याने थोडेफार विसरलो तरी चिंता करण्याचे कारण नाही.  सारखंच विसराळूपणा होत असेल तर त्यावर काय करावं असं वाटत असेल तर हे उपाय ट्राय करा

विसरभोळेपणा हा अनेकदा आपल्या पाचवीला पुजलेला असतो. आपण लहान सहान गोष्टी इतक्या पटकन विसरतो की त्यामुळे कामाच्या ठिकाणी, घरात किंवा नातेसंबंधात गोंधळ होऊ शकतो. यामध्ये वस्तू विसरणे, एखादे काम विसरणे, एखादी महत्त्वाची गोष्ट कोणाला सांगायची विसरणे असे अनेक प्रकार असतात. या विसरभोळेपणामुळे आपले काही वेळा नुकसानही होऊ शकते. पण ही समस्या कमी व्हावी म्हणून नेमके काय करायचे हे काही केल्या आपल्याला कळत नाही. वय झालं की व्यक्तींचा विसरभोळेपणा वाढतो असा आपला समज आहे पण तरुण वयातही तारीख-वार आणि महिनाही विसरणारे अनेक जण आपल्या आजुबाजूला असतात (5 Habits Improve Memory). आता या विसरभोळेपणावर आपण असे काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपला विसराळूपणा कमी व्हायला नक्कीच मदत होऊ शकते. 

(Image : Google)

१. उलटे चाला 

उलटे चालणे हा विसरभोळेपणावरील एक उत्तम उपाय ठरु शकतो. आता यामागचे नेमके कारण काय ते अद्याप न्यूरोसायन्सचा अभ्यास कऱणाऱ्यांनाही सापडलेले नाही. पण लंडनमधील एका विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनानपसार उलटे चालल्यामुळे व्यक्तींचा विसरभोळेपणा कमी होतो हे सिद्ध करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. या अभ्यासात उलटे चालणाऱ्या व्यक्तींना पूर्वी पाहिलेले चित्रपट, चित्रे, शब्द जास्त चांगले आठवत असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. 

२. भाज्या आणि फळांचे प्रमाण आहारात वाढवा

हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, आपला आहार आणि आपली स्मरणशक्ती यांचा एकमेकांशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. जास्त प्रमाणात भाज्या आणि फळे खाल्ल्यास विसरभोळेपणा कमी होण्यास त्याचा उपयोग होतो. यामध्ये हिरव्या, लाल, केशरी अशा सगळ्या रंगांची फळे असायला हवीत. तसेच सॅलेड, पालेभाज्या, फळभाज्या अशा सगळ्या भाज्यांचाही समावेश होतो. हे सगळे उतारवयात तर खायला हवे पण तरुण वयात याचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असायला हवा. 

३. प्रकाशात काम करणे 

अनेकदा आपण कमी प्रकाशात राहतो आणि काम करतो, पण याचा आपल्या स्मरणशक्तीवर विपरित परिणाम होऊ शकतो. मिशीगन विद्यापीठात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार प्रकाशात काम केलेल्या लोकांची स्मरणशक्ती अंधारात राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्यांपेक्षा कमी असते. प्रकाशाचा आपल्या मेंदूच्या ठेवणीवर थेट परिणाम होत असल्याने चांगल्या स्मरणशक्तीसाठी प्रकाशात राहणे केव्हाही चांगले.

(Image : Google)

४. इंटरमिटंट फास्टींग

सतत जास्त प्रमाणात खाल्ल्याने मेंदूला चालना मिळण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे लहानसहान गोष्टी विसरण्याचे प्रमाण वाढते. लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार काही विशिष्ट प्रकारचे उपवास केले तर स्मरणशक्ती चांगली राहते. त्यामुळे ज्यांना सतत विसरण्याचा त्रास आहे त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त खाण्यापेक्षा थोडे कमी खावे आणि ठराविका काळाने झेपतील तेवढे उपवास अवश्य करावे. 

५. काळजी करु नका

विसरणे हे आपला मेंदू जागृत असण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्हाला विसरभोळेपणाचा त्रास असेल तर अजिबात काळजी करु नका. विसरणे म्हणजे तुमचे वय झाले किंवा तुम्हाला मेमरी लॉस झाला असे नाही. माणसाचा मेंदू हे शास्त्रज्ञांसाठी आजही कोडे आहे आणि त्यातील स्मरणशक्ती ही आपल्याला मिळालेली देण असल्याने थोडेफार विसरलो तरी चिंता करण्याचे कारण नाही.  

टॅग्स :मानसिक आरोग्य