आपल्या जीवनामध्ये एकाग्रतेचे महत्त्व खूप जास्त आहे. कोणतेही काम करताना तुमचे सारखे लक्ष विचलित होते. वेळेवर काम पूर्ण होत नाही किंवा मेंदू एका जागेवर स्थिर राहात नाही. अशा समस्या उद्भवत असतील तर तुमची एकाग्रता शक्ती कमी झाल्याची शक्यता असू शकते. यासाठी मनाची एकाग्रता वाढविणे आवश्यक आहे. आपल्यासोबत बऱ्याचदा असं होत की, एखाद महत्वाचं काम करताना आपलं मन वेगळ्याच दिशेनं धावत असत. त्यामुळे खूप प्रयत्न करूनसुद्धा करत असलेल्या कामामध्ये मन लागत नाही. अशावेळी आपल्या हातात असलेलं काम तर होत नाहीच शिवाय चीड - चीड सुद्धा होते. हाती घेतलेलं काम पूर्ण होण्यासाठी एकाग्रता खूप महत्वाची आहे. एकाग्रता वाढविण्यासाठी काय करायचे याबाबत काही सोपे उपाय समजून घेऊयात (6 Easy Way To Improve Concentration Skills).
काय - काय करता येऊ शकत ?
१. कामांची यादी तयार करा - दिवसभरात तुम्हाला एकूण किती काम करायची आहेत त्याची एक यादी तयार करा. नेमून दिलेल्या वेळेत प्रत्येक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. असं केल्यास तुमच्या कामाचा वेग आणि एकाग्रता वाढेल.
२. पुरेशी झोप घ्या - झोपेचा अभाव हे एकाग्रता न होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जर एकाग्रता वाढवायची असेल तर पुरेशी झोप घ्या.
३. बौद्धिक खेळ खेळणे - आपल्या एकाग्रता क्षमतेत वाढ करण्याचा महत्वाचा उपाय म्हणजे बौदधिक खेळ खेळणे. कारण बौद्धिक खेळ खेळल्याने आपली बुद्धी अधिक तल्लख बनते.तसेच बौद्धिक क्षमतेतपण वाढ होते. सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळ,सुडोकु,कोडे सोडवणे असे बुद्धीला ताण देणारे विचार करायला लावणारे खेळ जर आपण रोज खेळले तर याने आपली एकाग्रता वाढते.
४. एका जागी बसण्याचा प्रयत्न करा - एका जागी बसण्याचा प्रयत्न करा हे बोलायला जितके सोपे तितके करायला अवघड आहे. स्वतःशी ठरवून दिवसातील १५ मिनिट एका शांत जागी बसण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमची एकाग्रता वाढण्यास मदत होईल.
५. नवीन आणि आव्हानात्मक गोष्टी शिका - तुमची एकाग्रता शक्ती वाढविण्यासाठी नवनवीन आणि आव्हानात्मक गोष्टी शिका. नवनवीन आणि आव्हानात्मक गोष्टी शिकताना तुमच्या मेंदूला चालना मिळेल. यामुळे तुमची एकाग्रता शक्ती वाढण्यास मदत होईल.
६. वाचन करा - वाचन केल्यामुळे देखील मेंदूला चालना मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे शक्य असेल तेवढा वेळ वाचनासाठी द्या. वाचनामुळे तुम्हाला प्रश्न पडतात. त्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी तुम्ही मेंदूचा वापर करता. त्यामुळे तुमची एकाग्रता शक्ती वाढते.