Join us  

आमिर खानची मुलगी इरा खान डिप्रेशनच्या "बॅड डेज" विषयी सांगते; भयानक राग येतो तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2021 3:02 PM

डिप्रेशन, प्रचंड राग याविषयी बोलणाऱ्या इरा खानची हिमतीची लढाई; मानसिक आरोग्याविषयी ती जाहीर बोलते आहे.

ठळक मुद्देआपल्याला हवे तसे काहीच घडत नाही असे आपल्याला वाटत राहतेनैराश्यात असणाऱ्या व्यक्तीला वेळीच योग्य ते मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.पुरेशी झोप, कुटुंबातील वातावरण, सोशल मिडियाचा कमीत कमी वापर, शारीरिक व्यायाम, योगा अशा गोष्टींनी या समस्येपासून काही प्रमाणात आराम मिळण्यास मदत होते.

एकाएकी खूप राग येणे, चिडचिड होणे असे आपल्या बाबतीतही होते. कधी याला एखादे नेमके कारण असते तर कधी कोणतेही कारण नसताना असे होते. आता हे असे का होते, मनाची अशी कोणती अवस्था असते जेव्हा आपण त्यावर ताबा मिळवू शकत नाही, डिप्रेशन, प्रचंड राग येणे असे होते तेव्हा नेमके काय करायचे असे प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतात. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याची मुलग इरा खान हिलाही हे प्रश्न पडले. नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड केला आहे, यामध्ये मागचे काही दिवस आपण खूप डिप्रेस असल्याचे ती सांगते. तसेच मला सध्या सतत खूप राग येत आहे. हा माझा स्वभाव नसून सामान्यपणे मला राग येत नाही. पण आता कोणतीही गोष्ट करताना मला राग येतोय आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नेमके काय करायला हवे हे आपल्याला समजत नसल्याचे ती सांगते.

दहा मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये इरा म्हणते की माझी अशाप्रकारे चिडचिड होत असल्याने मी फुटबॉल खेळायला म्हणून घराबाहेर पडले. मात्र त्यानंतरही मी माझ्या रागावर ताबा मिळवू शकले नाही, उलट हा राग वाढतच चालला होता. त्यावेळी आपण स्वत: गाडी चालवत होतो आणि इतक्या रागात स्वत: वाहन चालवणे योग्य नसल्याने मी गाडी बाजूला लावली आणि कोणाला घ्यायला बोलावले, त्यानंतर मी फक्त रडत होते असे ती सांगते.  त्यानंतर मी माझ्या आवडीच्या बऱ्याच गोष्टी करायचा प्रयत्न केला पण कशातच माझे मन रमले नाही. अखेर मी एक गाणे ऐकले आणि मग माझ्या चेहऱ्यावर थोडे हसू आले. इरा मागील ४ वर्षांपासून डिप्रेशनमध्ये असून त्यावर ती वैद्यकीय उपचारही घेत आहे. इरा ही आमिर खानची पहिली पत्नी रीना हिची मुलगी आहे.

कमी अधिक फरकाने आपणही अशा परिस्थितीत फसतो आणि नेमके काय करावे हे आपल्याला कळत नाही. आजुबाजूची परिस्थिती, लोक कोणीच आपल्याला समजून घेत नाही. आपल्याला हवे तसे काहीच घडत नाही असे आपल्याला वाटत राहते. या किंवा अशा अन्य कारणांमुळे आपल्याला मानसिक ताण येतो आणि आपण नकळत नैराश्यात जातो. अशावेळी आपल्या आवडीच्या गोष्टी केल्या तरीही आपले मन त्यात काही केल्या रमत नाही. अशावेळी आपल्याला स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे हे वेळीच ओळखा. या परिस्थितीत कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रमंडळी यांचा सहभागही महत्त्वाची भूमिका बजावतो. नैराश्य या समस्येकडे दुर्लक्ष न करता, त्यावर वेळीच उपाययोजना होणे आवश्यक आहे.

( Image : Google)

याबाबत बोलताना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निश्चल रावल म्हणाले, नैराश्य अशाप्रकारचे नैराश्य आणि त्यामुळे राग येण्याची अनेक कारणे असू शकतात. नैराश्य ही मनाची अवस्था असून राग येणे हे त्याचे एक लक्षण आहे. ते म्हणतात, सतत राग येत असेल तर काही नेमके कारण आहे का याचा वेळीच शोध घ्यायला हवा. अशाप्रकारे नैराश्यात असणाऱ्या व्यक्तीला वेळीच योग्य ते मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. पुरेशी झोप, कुटुंबातील वातावरण, सोशल मिडियाचा कमीत कमी वापर, शारीरिक व्यायाम, योगा अशा गोष्टींनी या समस्येपासून काही प्रमाणात आराम मिळण्यास मदत होते. त्याशिवाय कॉग्निटीव्ह बिहेविअर थेरपीच्या माध्यमातून आम्ही नेमकी अडचण समजून घेतो आणि त्याप्रमाणे उपचार देतो. सध्या करीयर, सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक अडचणी, आरोग्याच्या समस्या, व्यसनाधिनता यांमुळे अशाप्रकारच्या तक्रारी तरुणांमध्ये वाढल्याचे दिसते. मात्र या विषयाबाबत खुलेपणाने चर्चा होणे आवश्यक असून अशा व्यक्तींना यातून बाहेर येण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. व्यक्तीची नेमकी अडचण समजल्यानंतर यातून बाहेर येण्यासाठी साधारण ६ ते ८ सेशन लागतात मात्र समस्येचे स्वरुप जास्त गंभीर असल्यास याहून जास्त कालावधी लागू शकतो.

 

टॅग्स :इरा खानआमिर खानमानसिक आरोग्य