दहावी आणि बारावीचे बोर्ड परीक्षा जवळ येत आहे. विद्यार्थी बेस्ट देण्यासाठी अभ्यासाची जोरदार तयारी करत आहे. अशा स्थितीत त्यांच्या मनात हुरहूर, ताणतणाव, चिंता वाढणे सामान्य आहे. अभ्यास पूर्ण करण्याचं टेन्शन त्यांच्या मनात घोंघावत राहते. या तणावाच्या प्रेशरमुळे लहान मुलं एक्झाम अंझायटीचे शिकार बनतात. आपला अभ्यास वेळेवर पूर्ण होणार की नाही, पेपर नीट सोडवायला जमणार की नाही, मार्क्स कमी पडल्यावर काय करावे? असे अनेक प्रश्न या काळात विद्यार्थांच्या मनात उद्भवतात. ज्यामुळे त्यांच्या मेंटल हेल्थवर परिणाम होतो.
यासंदर्भात लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक आणि मानसोपचार तज्ज्ञ, डॉ. प्रेरणा कुक्रेती म्हणतात, '''किशोरवयीन मुलांमध्ये परीक्षेचा ताण येणे सामान्य बाब आहे. परंतु काही किशोरवयीन मुले गंभीर चिंतेचे बळी ठरतात. त्यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. यासोबतच त्यांची परीक्षेतील कामगिरीही खराब होते. काही मुलांना जास्त चिंता आणि अस्वस्थतेमुळे पॅनिक अटॅक देखील येतात. काही गोष्टींची काळजी घेतली तर या सर्व समस्या टाळता येतील.''
एक्झाम अंझायटी म्हणजे काय?
डॉ. प्रेरणा कुक्रेती यांच्या मते, '''परीक्षेच्या काही दिवसा आधी किशोरवयीन मुलांमध्ये परीक्षेबाबत अस्वस्थता निर्माण होते. ज्याला एक्झाम अंझायटी असे म्हणतात. ज्याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर होतो. अभ्यास करूनही पेपर लिहिण्याच्या वेळी अडचणी निर्माण होतात. यासाठी मनामधून चिंता काढून परीक्षेत चांगली कामगिरी करणे आवश्यक.''
५ टिप्स - चिंता होईल दूर
सर्वप्रथम परीक्षेची चांगली तयारी करा, वेळापत्रक बनवून अभ्यासाला सुरुवात करा. जर परीक्षेची तयारी चांगली असेल तर चिंतेची समस्या टाळता येईल.
अभ्यास करताना छोटे ब्रेक घ्या. यामुळे ताण कमी होईल, व चांगल्या पद्धतीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल.
रात्रभर बसून वाचन केल्याने झोप पूर्ण होत नाही. ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. यासाठी दिवसभर अभ्यास करा. ८ तासांची झोप आवश्यक.
या काळात खाण्यापिण्याची काळजी घ्या, सकस आहार घ्या. पुरेसे पाणी प्या व हायड्रेटेड राहा. यामुळे शरीराला आवश्यक पौष्टीक घटक मिळतील. यासह दररोज व्यायाम करा.
स्वतःला सकारात्मक ठेवा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा. निराश होण्याची गरज नाही. परीक्षेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, पॅनीक मोडमध्ये जाणे टाळा.