योगिनी मगर
अगं घर म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच एवढं काय मनाला लावून घेतेस. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतल्यावर,आयुष्यात अजून किती संकट असतात त्यांना कशी धिराने सामोरी जाणार तू..
रडून रडून डोळे लाल झालेली नेहा आईचं शांतपणे ऐकत होती. तिची शुन्यातली नजर आईचे शब्द ऐकत होते. पण मनात कुठेतरी खोलवर ती विचारात गुंतलेली हाेती. आनंदाची, सुखाची स्वप्न बघत काही दिवसांपुर्वीच नेहा बोहल्यावर चढली होती. चांगली उच्चशिक्षित असलेली समजूतदारपणा तिच्या स्वभावातच होता. पण गेले सहा महिने अगदी उदास निराश झाली होती. खरं तर लग्नानंतरचे काही दिवस नवलाईचे कोड कौतुकाचे, पण नेहा सासूबरोबर सतत वाद होतात म्हणून रडायची उपाशी राहायची अबोला धरायची. याचा सगळा परिणाम तिच्या वैवाहिक आयुष्यावर पण होत होता.
खरंतर प्रत्येकच नातं समजून घ्यायला थोडा वेळ द्यावा लागतो त्यात सासू सुनेचं नातं तर जगजाहीरपणे विरोधी पक्षासारखे "आतापर्यंत मी या घराची मालकीण होते ".पण मुलाच्या लग्नानंतर भीतीने की काय आपली सत्ता जाईल म्हणून सासूबाई हक्क दाखवायला लागतात. खरं तर जेव्हा त्यांना मुलगा झाला तेव्हाच त्यांच्या मनात सासू या नात्याने जन्म घेतलेला असतो. कारण आपल्या पुरुषप्रधान समाजामध्ये मुलगा असणं म्हणजे वारस चालवणारा. या कल्पनेतूनच मग आपल्याकडे एक मोठी सत्ता आहे ही भावना स्त्रीच्या मनात येते. खरं बघायला गेलं तर सत्ता ही सासू काय आणि सून काय या दोघींच्या कडेही कधीच नव्हती. परंपरेने चालत आलेल्या पुरुष प्रधान समाजाची सत्ता झुगारण्याचं धाडस ना सुनेमध्ये आहे ना सासू मध्ये आहे.
प्रत्येक स्त्रीला लहानपणापासून वडील भाऊ पती यांच्या आधारानं चालावं लागतं अगदी स्वत च्या विचारापासून वर्तनापर्यंत सतत पुरुषप्रधान समाजाची करडी नजर असते. ती गर्भात असल्यापासून ते मरेपर्यंत तिच्या आयुष्यात काय घडेल हे सगळं पुरूषच ठरवणार. अजूनही ठरवतात.
शिक्षण घेऊन स्त्रिया आर्थिक सबला बनली तरी तिच्या पैशावर तिचाच अधिकार राहील याची गॅरेंटी नाही.अजूनही मोठे निर्णय पुरुषच घेतात.
मात्र त्याचे ताण दोन स्त्रियांच्या नात्यात दिसतात.
खरंतर सासू आणि सून दोघेही स्त्रियाच निसर्गानं दोघींनाही प्रेम वात्सल्य,माया ,ममता,दिलेली आहे .पण फक्त नातं बदलल्यामुळं आपले विचार बदलतात भावना बदलतात आणि वर्तनही बदलतं. त्याच वयाच्या असणाऱ्या आपल्या मुलीवर आपण प्रेम करतो. पण त्याच वयाची सून आपल्याला हक्क दाखवायची जागा वाटते. इतकंच काय पण जिव्हाळ्यानं जितक्या प्रेमानं आपण आपल्या आईशी शेअरिंग करत असत। इतक्या प्रेमानं आपण आपल्या सासूची बोलत सुद्धा नाही.
या सगळ्यामध्ये दोघींची खूप मानसिक कुचंबणा होत असते पण कोणीही आपला हक्क सोडायला तयार नसते.
घरात आलेल्या सुनेला नवीन नात्यामध्ये रुळायला मिसळायला तिच्या मनात ही नाती स्वीकारायला ,आपल्यालाही मनापासून तिला साथ द्यायला हवी!
पण परंपरेने चालत आलेल्या रुढी जाता जात नाहीत.
"आम्हीसुद्धा सगळं हे केलेला आहे तुला पण हे करावं लागेल.",
नाहीतर तो चांगली सून नाहीस.
कर्तव्याच्या नावाखाली सतत तिला एका जोखडाखाली जुंपून ठेवणं. जरा कुठं कामात कसूर झाली तर तिला लगेचच शिक्के बसणार!
" हट्टी आहे ऐकत नाही नवऱ्याची काही किंमत नाही तिला"
"आम्ही किती गोष्टी सहन केल्या पण या कानाचं त्या कानाला कळत नव्हतं."
आईवडिलांच्या संस्काराचा उद्धार होत असतो. आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते ही सांगतात,
"काही नाही गं एवढं तेवढं सहन करावं लागत. होईल नीट सगळं नको काळजी करू "
या सगळ्यामध्ये आपण विसरत जातो स्त्री ही कोणत्याही रूपात असलेली मुलगी पत्नी आई बहीण सासू मैत्रीण पण ती एक माणूस आहे.
तिला ही मन आहे तिलाही आनंदी राहण्याचा हक्क आहे. निसर्गानं तिला मातृत्वाचे वरदान दिलेलं आहे.म्हणूनच तिला स्वत च्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. मुलाला जन्म देणं वाढवणं त्यांना चांगले संस्कार देवुन त्यांना एक चांगलं सुजाण नागरिक बनवणं या सगळ्यामध्ये स्त्रियांची खूप ताकद व काैशल्य खर्ची लागत असते
या सगळ्यांमध्ये तिला गरज असते आजुबाजुच्या लोकांकडून सहकार्याची ,प्रेमाची ,आधाराची' आपुलकीची मायेची .पण या समाजात तिला दुय्यम स्थानावर ठेवलं आहे. खरंतर पुरुषांपेक्षा कितीतरी जास्त कौशल्य स्त्रीनं विकसित केली आहे. शंभर वर्षांपूर्वी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बाईची ताकद ओळखली आणि स्त्रियांना शिक्षण देण्याचा निर्धार केला. कारण इतकी कौशल्य असणारा स्त्रियांचा मेंदू फक्त चूल आणि मूल या चौकटीत न बसवता.
स्त्रियांनी हे स्वत च्या कौशल्यांचा वापर करून स्वतःसाठी व कुटुंबासाठी समाजासाठी तिचा उपयोग व्हायला हवा.
सासू आणि सून या दोघींच्या भांडणामध्ये खरं दोघिंच्याही शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. नात्यामध्ये ताण निर्माण होत असतो. वैफल्य येत असतं कुटुंबांमध्ये कलह वाढत असतो. आणि या सगळ्यांमध्ये आपली खुपशी ताकद खर्ची जात असते. कुटुंबातील नाती बिघडण्यामध्ये काही ठिकाणी सुनेच्याही अवास्तव अपेक्षा कारणीभूत असु शकतात. लग्नानंतर नविन कुटुंबात जुळवुन घेता येत नाही. नवरा फक्त आपलाच आहे. त्याने आपलच ऐकावं असं वाटतं. बऱ्याचदा मुलींच्या मनात सासरचे लोक याविषयी पुर्वदुषित ग्रह असु शकतो. त्याच नजरेतुन ती सासूकडे बघत असते. मुलींना एकत्र कुटुंबात रहायला आवडत नाही. आईने एखादी सुचना केली तर चालते पण तेच सासूने सांगितले तर राग येतो. खरं तर आरोग्यदायी नात निर्माण करण्यासाठी सूनेचीही भुमिका खुप महत्वाची आहे.
दोघींचंही एकमेकींच्या वर्तनामुळे खच्चीकरण होत असते.
आता आपणच एकमेकींना समजून घ्यायला हवं, ही भूमिका असायला हवी.
पण प्रश्न येतो तो केवळ विचारांचा ,भावनांचा नात्यांचा अपेक्षांचा. दोघींनी ठरवायला हवं विवेकी विचारांनी एकमेकींना समजुन घ्यायला हव
एखादी गोष्ट पटली नाही तर ती योग्य प्रकारे सांगता आली पाहिजे
मनात वाटणाऱ्या भावना योग्य प्रकारे व्यक्त केल्या पाहिजेत.
एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा न ठेवता रास्त अपेक्षा ठेवल्या पाहिजेत
सासू आणि सून या दोघींमध्ये एका पिढीचे अंतर असल्यामुळे जुन्या विचारांना स्वीकारणं व नवीन येणाऱ्या विचारांचे स्वागत करणं हे दोघींकडेही असलं पाहिजे. भावनांना योग्य वाट मोकळी करून देऊन नात्याला आदर, विश्वास, प्रेम याची जोड देऊन नात्यांमधील आनंद स्वीकारला पाहिजे. तर आपण आपला आनंद मिळवू शकतो, जगू शकतो.
(मानसमैत्रीण परिवर्तन संस्था)
मनोबल आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन – 7412040300
WWW.parivartantrust .in