काही माणसं इतकी आनंदी असतात की त्यांच्याकडे पाहून वाटतं , यांना आनंद हा जन्मजातच मिळाला आहे की काय? पण आनंद असा अनुवांशिक असतो का? असा प्रश्नही लगोलग पडतो. या प्रश्नाचं उत्तर ४० टक्के हो आहे. कारण कॅलिफोर्निया येथे झालेलं एक संशोधन हेच सांगतं की आनंदी होण्यासाठीची ४० टक्के क्षमता ही आपल्याला आपल्या जनुकांकडून मिळालेली असते. पण उर्वरित साठ टक्के आनंदी होण्याची क्षमता ही आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी आणि प्रयत्नांनी कमवावी लागते.
आपल्यात जर आनंदी होण्याचे जनुकं नसतील तर आपण आनंदी होणारच नाही का? यावर हे संशोधन म्हणतं की मग आपण आनंदी होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपल्या मेंदूला आनंदी व्हायला शिकवता येतं. हा आनंद आपल्याला आपल्या जीवनशैलीतून, वातावरण आणि पर्यावरणातून मिळतो.
आपल्या आयुष्याबाबतचं समाधान, आपण करत असलेलं काम, नात्यातील गुंतवणूक आणि अर्थपूर्ण आयुष्य या गोष्टी आपला आनंद निर्धारित करत असतात. आयुष्याबाबतचं समाधान हे प्रामुख्यानं सकारात्मक भावनांवर अवलंबून असतं. पण या भावना भूतकाळात काय घडलं यावर अवलंबून असतात. जर भूतकाळात काही दु:खद घटना घडल्या असतील तर आयुष्याबाबत असमाधानाची भावना निर्माण होते.ही भावना आनंदी होऊ देत नाही.
कामात, नात्यातील माणसांत, आपल्या छंदात, आपल्या माणसांसोबत आनंदी क्षणात आपण गुंतलेलो असलो तर आयुष्यात आनंद निर्माण होतो.
आपली ध्येयं, आपली स्वप्नं, महत्त्वाकांक्षा या आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवतात. ही अर्थपूर्णता आपल्या आयुष्यात आनंद पेरते.
संशोधन सांगतं की आशावाद, स्व प्रतिमा आणि आनंद हे अनुवांशिकतेतून येतं. पण आपल्याला आनंदी करण्यात याचा वाटा केवळ ४० टक्के आहे. ६० टक्के प्रयत्न आपल्या हातात आहे. म्हणून प्रयत्नपूर्वक आनंदी होता येतं. जसं आपण काय घालावं? काय खावं? या गोष्टी आपण ठरवू शकतो तसंच आपल्याला आनंदी राहायचं आहे तर काय करायला हवं याचे पर्यायही आपण निवडू शकतो.
आनंदी व्हायचं असेल तर
प्रयत्नपूर्वक आनंदी होण्यासाठी काय करायला हवं याचा मार्गही मानसशास्त्रज्ञ दाखवतात.- आपलं काम चोख करा. जे काम करतो आहोत त्यात १०० टक्के देण्याचा प्रयत्न करा. काय होईल याचा विचार न करत जे करत आहोत त्यावर लक्ष केंद्रित केलं, ते काम चोख करण्याचा प्रयत्न केला तर या कामातून आनंद मिळतो.
- मदत करा. केवळ स्वत:साठी न जगता इतरांची मदत करण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या कामातून , प्रयत्नातून ही मदत करता येते. मदतीतून निर्माण होणारी भावना मनाला समाधान देते. शांतता देते.
- व्यायाम करा. नियमित व्यायाम हा शरीराप्रमाणेच मनासाठीही आवश्यक असतो. शारीरिक हालचालीतून डोपामाइन हे रसायन स्त्रवतं जे आपल्याला ‘फील गूड’ची जाणीव देतं. आठवड्यातून किमान १५० मिनिटं मध्यम स्वरुपाचा व्यायाम आवश्यक असतो. आनंद निर्माण करण्यात व्यायामाचा वाटा मोठा असतो.
- पौष्टिक खा. आरोग्यदायी आहारामूळे आपलं आरोग्य चांगलं राहातं, आपला आत्मविश्वास वाढतो. आणि यातून आनंदी जगण्याला बळ मिळतं.
- निसर्गाच्या सान्निध्यात राहा. निसर्ग आपल्याला नम्र व्हायला शिकवतो. आपला ताण कमी करतो. आपल्याला वास्तवाशी, स्वत:शी , इतर माणसांशी आणि जगाशी जोडून ठेवण्याचं काम निसर्ग करतो. त्यामुळे रोज काही काळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवावा.
- कृतज्ञतेची भावना जोपासा. जे कोणी आपली मदत करत आहे, आपल्या जगण्याला हातभार लावत आहे त्यांच्याबाबत, त्या प्रत्येक छोट्या मोठ्या घटकांबाबत, माणसांबाबत कृतज्ञता व्यक्त करायला शिकलं की मनाला शांतता वाटते. मनात करुणा निर्माण होते. ही शांतता आणि करुणा आपल्याला आनंदी ठेवते.
- हसा आणि हसवा. सतत गंभीर चेहेरा करुन जगण्यानं आनंद मिळत नाही आणि कोणाला आनंद देताही येत नाही. यासाठी सतत हसा. हसण्याची छोटी छोटी कारणं शोधा, निर्माण करा.
- ध्यान आणि अध्यात्माची कास धरा. सजगता ठेवणं, सजग ध्यान करणं यामुळे मनाला शांती लाभते. जगण्याचं केंद्र सापडतं. आयुष्याला उद्देश प्राप्त होतो.