अश्विनी बर्वे
आपल्याला सगळ्यांना कोणती ना कोणती कला अवगत असते. काहींच्या ती लक्षात येते काहींच्या कधीच नाही. मुळात आपण जे काम करतो त्याला कला म्हणतात, म्हणावं का? आपलं जगणं हीदेखील एक कला आहे हे तरी आपल्या लक्षात येतं का? आपण आखून घेतो आपल्याभोवतीच चौकटी आणि अमूक असं म्हणजे असं, तसं म्हणजे तसं म्हणत बांधून घालतो स्वत:लाच, त्यानं आपली वाढ थांबते हे तर कधी कुठं लक्षात येतं?आता हेच पाहा अंधार झाला की सगळेजण झोपतात आणि कलाकार मात्र जागा राहतो. खऱ्या अर्थाने जागा, निरनिराळी पात्रं त्याच्या वस्तीला येतात आणि म्हणतात,” चल थोडं फिरून येवू, तो ही हलक्या पावलांनी उठतो आणि निघतो. त्यावेळी दारावरची चौकट त्याला अडवत नाही. कारण तिला तो दिसतंच नाही. कशी गंमत केली एका चौकटीची ? असं म्हणत तो स्वतःशीच हसतो. निरनिराळी पात्र,आकार,चित्रं त्याच्या भोवती नुसता गोंधळ करतात, तर कधी कधी फक्त परिस्थिती, घटना समोर असतात आणि पात्र मात्र गायब . हो हो अगदी आज सगळीकडे दिसतं आहे ना तसंच होतं. घटना घडतात पण सूत्रधार सापडत नाही. पण त्याला दिसणाऱ्या पात्रांना आणि त्यांच्या सुत्रधाराला या तीरावरून त्या तीरावर न्यायचे म्हटले की, किती कष्ट पडतात. हे त्याने काहीवेळा अनुभवलेलं असतं. तर काहीवेळा दुर्लक्ष केलेलं असतं. पण प्रत्येकवेळी तो दुर्लक्ष करू शकत नाही, कारण तसं केलं तर ते त्याला सुखाने काहीच करू देत नाही. मग तो ही ठरवतो एकदा येवूच समोरासमोर, आणि लिहून टाकू त्यांच्याबद्दल, चित्रित करू समोर दिसतं आहे ते. पण सकाळ होताच ही मंडळी सगळी गायब. म्हणजे दाराच्या चौकटी ओलांडून काहीच फायदा होत नाही तर. बिचारा मनात खट्टू होतो.
(Image : google)
चौकटी मोडायला हव्यात असं आपण सहजतेने म्हणतो पण मला वाटतं चौकटी आपण मोडत नाही तर त्या विस्तारतो. विस्तारलेल्या, व्यापक अशा गोष्टींना सुद्धा एक चौकट असते. फक्त तेवढं मनाचं मोठेपण आपल्याकडे हवं. बघा ना अथांग समुद्र काढला तरी त्याला चौकटीत बसवावेच लागते आणि प्रत्येक समुद्राला कुठे ना कुठे किनारा असतोच. अर्थात त्या चौकटींचा, किनाऱ्याचा उपयोग एकमेकांना जिवंत ठेवण्यासाठी, जीवनाचा आस्वाद एकमेकांच्या साथीने आणि सोबतीने घेण्यासाठी हवा. पण आपण मात्र अगदी उलटं करत आहोत. कोण कसं चुकलं आणि कशा आमच्या भावना दुखावल्या यासाठी आम्ही चौकटीचे रक्षण करतो. मग त्यात माणूस मेला तरी चालेल पण त्या निर्जीव चौकटी हव्यातच. बंदिस्तपणे आपण इतकं काही आवळून धरलं आहे की, जरा मोकळी हवा लागली, वेगळ्या विचारांची एखादी झुळूक सुद्धा आपल्याला उद्वस्त करते. बघा ना आपण मनाने किती कमकुवत झालो आहोत का?
(Image : google)
मोडलेल्या गोष्टींकडे रडत बघण्यापेक्षा दोन्ही बाहू पसरून खूप काही कवेत कसं घेता येईल हे बघायला हवं आपण. मनात येईल तेवढं आपल्याला व्यापक, उदार होता येतं. फक्त इच्छा पाहिजे. चला एकदा समुद्राकडे निरखून बघू या. म्हणजे तो त्याची चौकट विस्तारतांना आपल्याला दिसेल. मग आपणही स्वतःला विस्तारत नेऊ..झुगारुन देऊ आपणच आपल्याभोवती बांधलेल्या चौकटी आणि त्यांचे नियम.
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)