तणाव हा आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाला आहे. पण तणाव नीट हाताळला नाही, तणाव व्यवस्थापन (stress management) जर जमलं नाही तर या तणावाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. तणावानं रात्रीची झोप उडते, कामात लक्ष लागत नाही, चिडचिड, गोंधळ , भीती असे मानसिक त्रास होतात. तणाव आणि तणावाशी निगडित परिणाम टाळण्यासाठी विशिष्ट पध्दतीनं श्वास घेण्याची पध्दत मदत करु शकते. अनुलोम विलोम (anulom vilom) प्राणायामानं तणाव कमी होते. तसेच तणावाचा झोपवेर आणि शारीरिक- मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम दूर होतात. अनुलोम विलोम प्राणायामाचा तणाव घालवण्यासाठी (benefits of doing anulom vilom) कसा उपयोग होतो, हा प्राणायाम (how to do anulom vilom pranayam) कसा करावा याबाबत जिंदल नेचरक्युअर इन्स्टिट्यूटचे मुख्य योग अधिकारी राजीव राजेश यांनी मार्गदर्शन केलं आहे.
Image:Google
राजीव राजेश म्हणतात की आपल्या शरीरातील पेशींना काम करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. हा ऑक्सिजन श्वासावाटे शरीरात पोहोचवला जातो. या ऑक्सिजनवर शरीरात होणाऱ्या प्रक्रियेमुळे कार्बन डाय ऑक्साइड निर्माण होतो. श्वासाच्या माध्यमातूनच हा कार्बन डाय ऑक्साइड शरीराच्या बाहेर टाकला जातो. शरीरात कार्बन डाय ऑक्साइड थोडा जरी राहिला तर त्याचा परिणाम पेशींवर होतो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे शरीरातला कार्बन डायऑक्साइड पूर्णपणे बाहेर काढणं आवश्यक असतं. हा कार्बन डायऑक्साइड बाहेर काढण्यासाठी अनुलोम विलोम या प्राणायामाची मदत होते. अनुलोम विलोमच्या सहाय्यानं शरीरातील जास्तीचा कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो.
Image: Google
अनुलोम विलोम म्हणजे?
अनुलोम विलोम प्राणायाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. या प्राणायामला नाडी शोधक प्राणायाम म्हटलं जातं. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणीही अनुलोम विलोम हा प्राणायाम करु शकतं. आपल्या शरीरात 72 हजार नाडी असतात. अनुलोम विलोम हा प्राणायाम रोज केल्यास सर्व नाडींचं आरोग्य जपलं जातं.
Image: Google
अनुलोम विलोम करण्याचे फायदे
1. कामाचा दबाव वाढला की चिडचिडेपणाही वाढतो. अशा परिस्थितीला रोज सामोरं जावं लागत असल्यास रोज सकाळी 15 मिनिट आणि काम समंपल्यानंतर संध्याकाळी 15 मिनिटं अनुलोम विलोम प्राणायाम केल्यास सर्व तणाव निघून जातो.
2. कामावर लक्ष केंद्रित करणं अवघड जात असल्यास अनुलोम विलोम प्राणायामाचा फायदा होतो. यामुळे एकाग्रता वाढते. मेंदूच्या कामात संमतोल निर्माण होतो.
3. रात्री लवकर झोप येत नसल्यास अनुलोम विलोम केल्यानं फायदा होतो. बेडवर झोपून किंवा बसून 10-15 मिनिटं अनुलोम विलोमचा सराव केल्यास मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. झोप येते. मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. अनुलोम विलोमच्या सरावानं केवळ मेंदूचाच नाही तर संपूर्ण शरीराचा ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो.
4. अनुलोम विलोमचा सराव रोज केल्यास नैराश्य, शरीराचा अशक्तपणा या समस्या कमी होतात. शरीराला ऊर्जा मिळते. मन हलकं फुलकं होतं. मनावरचा सर्व ताण निघून जातो. हे लाभ मिळवण्यासाठी रोज अनुलोम विलोमचा सराव करणं आवश्यक आहे.
Image: Google
अनुलोम विलोम कसा करावा?
अनुलोम विलोम करण्यासाठी आधी पद्मासनात बसावं. आधी डाव्या हाताच्या अंगठ्यानं डावी नाकपुडी बंद करावी. उजव्या नाकपुडीनं हळूहळू श्वास घ्यावा. फुप्फुसं भरले जातील एवढा श्वास घ्यावा. श्वास घेऊन झाला की डाव्या नाकपुडीवरचा अंगठा काढून घ्यावा. उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजवी नाकपुडी दाबून बंद करावी आणि डाव्या नाकपुडीनं श्वास पूर्णपणे सोडावा. उजव्या नाकपुडीवर अंगठा दाबून ठेवून डाव्या नाकपुडीनं श्वास घ्यावा. आणि मग डाव्या हाताच्या अंगठ्यानं डावी नाकपुडी दाबून ठेवून उजव्या नाकपुडीनं श्वास सोडावा. या चक्रालाच अनुलोम विलोम म्हणतात. अनुलोम विलोमचे परिणाम जाणवण्यासाठी हे चक्र 15-20 मिनिटं सुरु ठेवावं.