डॉ. यश वेलणकर
आजकाल एक शब्द कायम कानावर येतो. इक्यू अर्थात इमोशनल इंटिलिजन्स पाहिजे. सॉफ्ट स्किल्स पाहिजे तरच करिअरमध्ये स्कोप आहे. पण हे इक्यू अर्थात भावनिक बुद्धिमत्ता आपण कमवायची कशी? थोडक्यात भावनाशील असणं ही कमतरता मानली जाण्याचा काळ मागे पडला आणि इमोशन्स आपली ताकद ठरु लागल्या आहेत. इमोशनल फुल न होता आपली ताकद कशी वाढवायची आणि ओळखायची?स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखता येणे ही हुशारीच नव्हे तर आपली ताकद आहे हे मान्य केलं तर अनेक गोष्टी सोप्या होतील.
आपण इमोशनल आहोत का?
आपल्या बऱ्याच भावना भावनिक मेंदूची प्रतिक्रिया म्हणून निर्माण होत असतात. हा भावनिक मेंदू वैचारिक मेंदूपेक्षा खूप अधिक वेगाने काम करतो. त्याचमुळे बुध्दीला पटत असले तरी त्रासदायक भावनांची प्रतिक्रिया थांबवता येत नाही. कळते पण वळत नाही अशी स्थिती होते. एखादीला समोर उभे राहून बोलण्याची भीती असते. यात घाबरण्यासारखे काही नाही असे बुद्धीला पटवले तरी प्रत्यक्ष वेळ आली की छातीत धडधडू लागते,हातपाय कापू लागतात.मेंदूत भावना कशा निर्माण होतात याचे संशोधन अनेक शास्त्रज्ञ करीत आहेत. त्यांच्या मते आपल्या मेंदूत एकाचवेळी अनेक फाईल्स ओपन असतात.
(Image : google)
मेंदू पाच ज्ञानेंद्रिये वापरून परिसराची माहिती आणि तीन पद्धतीने शरीराची माहिती घेत असतो आणि त्याचा अर्थ लावत असतो. त्याच वेळी भूतकाळातील स्मृती आणि भविष्यातील शक्यता यावर देखील काम होत असते. या सर्व फाईल्स एकाच वेळी सक्रीय असल्या तरी त्या साऱ्या आपल्या जागृत मनाला जाणवत नसतात, त्यातील जी फाईल प्रबल होते तो विचार आपल्याला जाणवतो. त्या दृष्टीने सुप्त मन जागृत मनापेक्षा खूप मोठे आहे असे म्हटले तर योग्य ठरेल.
एका खोलीत दहा माणसे बसून आपापले काम करीत असावेत तसे मेंदूत अनेक भाग आपले काम करीत असतात. त्यामधूनच विचार जन्माला येतात. खोलीत बसलेल्या दहातील एखाद्याला ‘मला जे समजले आहे, ते खूप महत्त्वाचे आहे आणि त्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणे आवश्यक आहे’ असे वाटते त्यावेळी तो मोठ्याने बोलू लागतो, ओरडू लागतो. मेंदूत देखील असेच घडते, त्यावेळी सक्रिय असलेल्या अनेक फाईल्सपैकी एक खूपच प्रबल होते, तेच ते विचार मनात येऊ लागतात. तिलाच आपण भावना म्हणतो. त्यावेळी अन्य सर्व फाईल्स जणू आपले काम मंद करतात. म्हणूनच भीती वाटते, किंवा राग येतो त्यावेळी त्याच घटनेचे विचार खूप मोठ्या संख्येने आणि वेगाने निर्माण होतात, अन्य गोष्टींचे भान राहत नाही. राग,उदासी,वासना अशा भावना खूप तीव्र असतील तर सैराट कृती घडून जाते ती याचमुळे.
सैराट कृती होतात याचे कारण आपला भावनिक मेंदू खूप वेगाने काम करतो.समजा मला झुरळाची भीती वाटते. माझ्या बुध्दीला हे पटत असते की झुरळात घाबरण्यासारखे काहीही नाही पण झुरळ समोर येते त्यावेळी हे पटत असूनही भीती वाटते. कळते पण वळत नाही यालाच म्हणतात. बुध्दीला समजण्यापूर्वीच भीती निर्माण झालेली असते. कळते पण वळत नाही कारण कळण्याच्या आधीच प्रतिक्रिया झालेली असते.माइन्डफूलनेसच्या सरावाने ही तत्काळ अंध प्रतिक्रिया करण्याची भावनिक मेंदूची सवय बदलते. हा मेंदू शरीरात काय घडते आहे ते जाणून त्यालाही सतत प्रतिक्रिया करीत असतो. माइन्डफूल राहायचे म्हणजे स्वतःच्या शरीरावर लक्ष नेऊन जे काही जाणवते आहे त्याला प्रतिक्रिया न करता त्याचा स्वीकार करायचा.हेच भावनिक बुध्दी साठी आवश्यक आहे. त्यामुळे ती विकसित करण्यासाठी असा नियमित सराव आवश्यक आहे.