- डॉ. अंजली मुळके
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, प्रत्येक गोष्टीला काही ना काही स्थान असतेच. त्या गोष्टी भावनिक असो वा मग रोजच्या जीवनातील भौतिक गोष्टी. असेच अनन्यसाधारण स्थान आपल्या आयुष्यात 'अपेक्षे' लाही आहे..! ज्यामुळे, आपल्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव पडतो!आपल्या आयुष्यात जगतांना अनेक नाती निर्माण होतात. काही जन्माने लाभलेली तर काही आयुष्याच्या प्रवासात मिळालेली, अशा या नात्यांमध्ये, आपोआप 'ही' (अपेक्षा) आपली स्वतःची जागा निर्माण करतेच. आई, वडील, भाऊ, मित्र, पती, पत्नी, मुलं, सासू, सासरे अशी कित्येक नाती आपल्याला असतात. तारेवरची कसरत करत आपण त्यांच्या अपेक्षा, मर्जी सांभाळत असतो. नोकरी, व्यवसाय सांभाळणाऱ्यांना तर ती बाहेरची आगाऊची व्यावसायिक नाती देखील सांभाळावी लागतात. सर्वांच्या सर्वच अपेक्षांना आपण पुरेपडावे, याचा जीवतोड प्रयत्न आपला चाललेला असतो. पण यातली आपली सर्व नाती आपल्या किंवा इतरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतातच, असे नाही.
पण आपल्यापैकी काहीजण मात्र आपल्या नात्यांतील सर्व अपेक्षा 'पूर्ण' करण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतात. 'पूर्ण' साठी '_' हे चिन्ह वापरण्याचं कारण म्हणजे त्या 'पूर्ण' कधीच होत नसतात! हे असं करणं स्वतःला 'झेपतेय का' याचाही विचार स्वतःकडून व इतरांकडून केला जात नाही. असे विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत बऱ्याचदा घडतांना दिसते! ( काही मोजक्या ठिकाणी पुरुषही असतात.)
(Image :google)
पहा, काय होतं की, कित्येक नाती तुटू नये, आपल्यामुळे कोणाला त्रास न होता, नाती टिकावीत, यासाठी आपण सतत जीवाचा आटापिटा करत असतो. निरंतर, या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आपण गुरफटत जातो आणि त्या गुंत्यात इतके अडकतो, की त्यातून सुटका करून घेणे, म्हणजे या नात्यांचा रोष ओढवून घेणे, ही भीती कायम होते. बऱ्याचदा, आपली काही मंडळी, काम साधून घेण्यासाठी आपली खोटी स्तुती करतात ते आपल्याला फार सुखावह वाटते. आणि आपण तेवढ्या चार शब्दांच्या कौतुक सुमनांच्या सुगंधाने भारावून जाऊन लगेच अजून स्तुती मिळवण्याच्या प्रयत्नात पुन्हा सर्वांच्या सर्व मर्जी राखण्यात व्यस्त होतो..
कुठे कुठे अशी स्तुती खरी असेलही पण ही स्तुती मिळवण्याच्या नादात, स्वतःचे कौतुक ऐकण्याचे आपल्याला नकळत एक व्यसन जडते!
आपल्यावर अशा कौतुकांच्या फेरी झडत राहिल्या पाहिजे, 'खरंच मी आहे म्हणून हे झालं', असा काहीसा आपल्या अंगी भंपक मोठेपणा येतो.
तर काही ठिकाणी कौतुकाऐवजी 'हेटाळणी' ही मिळते आपल्याला. कुठलं काम व्यवस्थित झालं नाही, की उद्धार. त्यामुळे, घरच्यांकडून कोणत्या बाबतीत हेटाळणी होऊ नये, याचीही सतत काळजी आपण वाहवत असतो..
(Image :google)
पण, या 'कौतुकाच्या व्यसनापायी' किंवा 'हेटाळणीच्या भीतीपायी', बऱ्याचदा अपेक्षांच्या पूर्तीचा हळूहळू एक मोठा 'डोंगर'च आपल्या स्वतः कडूनच उभा केला जातो! कधी कधी हा डोंगर एवढा मोठा होतो, की, या आपणच तयार केलेल्या डोंगर आपणच पार करू शकत नाही..
जसजसं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत जाऊ, तसतसं त्यांच्या अपेक्षा वाढतच जात असतात..!
जसजशी या अपेक्षापूर्तीच्या डोंगराची चढाई करत जाऊ, तसतसं याचं शिखर अजूनच उंच-उंच सरकत जातं. जीव मेटाकुटीला आला तरीही हे शिखर काही केल्या खाली येत तर नाहीच, उलट जितके हिरीरीने चढू, तितकी तितकी त्याची उंची वाढतच जाते.!
माणसाला कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे. अन्यथा अपेक्षापूर्तीची ही चढाई आयुष्यभर चढतच जावं लागेल.
कारण, आपण कितीही झिजत गेलो, तरीही, सर्वांच्या सर्वच अपेक्षा आपण पूर्ण करूच शकत नाहीत!
आपल्या ह्या माणुसकीला मूर्खपणा ठरवला जाऊ नये म्हणून, थांबा.
प्रयत्नपूर्वक स्वतःला थांबवा. सर्वच गोष्टींना अंत असतो, मर्यादा असतात. येथेही आहेत..!
आपण आत्तापर्यंत बराच 'डोंगर' चढलोय याचे भान ठेवा.
अर्थातच, विरोध नाही करायचा, पण आत्मविश्वास जागवा.
उंच पर्वतावर प्राणवायू कमी-कमी होऊन श्वास गुदमरतो, अगदी तसाच, जितका उंच हा अपेक्षांचा डोंगर सर करण्याचा प्रयत्न करत जाल, तितका तुमचा मानसिक श्वास, पर्यायाने शारीरिक श्वासही गुदमरेल. मानसिक आणि शारीरिकरित्या तुम्ही थकत जाल, ज्याची पर्वा आपल्याकडून अपेक्षा पूर्ण करून घेणाऱ्यांना सहसा नसतेच.
म्हणून आता थांबा..!
(Image :google)
मात्र अपेक्षा पूर्ण करणं थांबवलं किंवा कमी केलं, की आपल्याच लोकांकडून आपली हेटाळणी सुरू होईल.
'शाब्दिक, भावनिक, गैरसमज'रूपी दगड, धोंडे, माती, तुमच्यावर घरंगळत येतांना दिसतील. तर येऊ देत.
ज्या लोकांच्या आपण आयुष्यभर मर्जी सांभाळत आलेलो असतो, त्यांनी आपल्याला सतत गृहीत धरलेलं असतं आणि याच लोकांना आता आपलं विश्रांती देखील घेणं रुचत नाही. आपणच वाढवलेल्या डोंगराचा तो परिपाक आहे, हे ध्यानात घ्या. या घसरत येणाऱ्या शाब्दिक दगड-धोंड्यांपासून स्वतःला कसोशीने वाचवा. धीराने रहा. अन्यथा, या नात्यांच्या जंगलात, या धोंड्यांनी घायाळ होऊन तुमचे जगणे असह्य होईल, सुपर वूमन/मॅन होता कामा नये. तसंच पूअर वूमन किंवा मॅनही होता कामा नये.
या शाब्दिक धुळीचे लोट तुमचा मानसिक श्वास गुदमरू पाहील. सचोटीने त्या धुळीला "झटकून" टाका. ही वेळही निघून जाईल..
काही काळात या नात्यांनाही आपल्या झिजण्याची किंमत कळेल.. आणि कळाली नाही, तरी बेहत्तर..
पण, आपल्या आयुष्याची किंमत ओळखा.
पूर्णत्वाचा हव्यास सोडा..
कोणाच्याही अपेक्षा कधीही पूर्णत्वास जात नसतात..! म्हणून,अवाजवी अपेक्षांचं भूत आपल्या मानगुटी बसू देऊ नका..!
परंतु, दुसऱ्या बाजूला, माफक अपेक्षा जीवनाला, नात्याला अर्थही देतात आणि सौंदर्यही..!
फक्त त्या एकतर्फी नसाव्यात. आपल्याही छोटया माफक अपेक्षांना कधीतरी पूर्णत्वाचा योग येण्याचं भाग्य लाभावं..
अपेक्षांशिवाय जीवन अपूर्ण आणि उदासीन आहे..!
पण अर्थातच, त्या मर्यादेत असाव्यात..!
सहज आणि सुंदर जीवन जगण्याचा अधिकार इतरांप्रमाणे आपल्यालाही आहे..!
केवळ आयुष्य अपेक्षांपूर्तीच्या ओझ्याखाली दबून जाता कामा नये..
आपण किती ओझं वाहू शकतो, याची मर्यादा वेळीच ओळखायला हवी..
स्वच्छंदपणे साथ देणं आणि जोखडात बांधून घेणं यातील फरक ओळखा..
पुरेपूर जगा, पुरेपूर जगू द्या.