शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याची काळजी घेणं आवश्यक. कोरोना या वैश्विक महामारीत अनेक लोकांना मानसिक आरोग्याच्या निगडीत समस्यांना सामोरे जावे लागले. लोकं डिप्रेशनमध्ये जात होती. डिप्रेशन माणसांमध्ये एवढा वाढत गेला की, लोकांमध्ये डिप्रेशनबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे. डिप्रेशन व्यतिरिक्त आणखी असे काही मानसिक आजार आहेत ज्यांच्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक. यातील एक प्रकार म्हणजे 'गॅसलायटिंग'. गॅसलायटिंग म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याची दिशाभूल करणं. अनेकदा आपल्या ओळखीचे लोक आपल्याला गॅसलायटिंगचा बळी बनवतात. गॅसलायटिंगला बळी पडलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर खूप परिणाम होतो. गॅसलायटिंगचा आपल्यावर काय परिणाम होतो आणि ते कसं ओळखायचं याची माहिती असणं आवश्यक आहे.
यासंदर्भात डिजिटल क्रिएटर उपेन वर्मा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी गॅसलायटिंग कोण कसे करते याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी गॅसलायटिंग करणाऱ्या व्यक्तींपासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हंटलं की, ''गॅसलायटिंग करणारे व्यक्ती इमोशनली त्रास देतात. समोरचा व्यक्ती आपण जे विचार करत आहोत अथवा आपले जे मत आहे ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे दर्शवतात. आपल्या मनाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करतात. असे व्यक्ती आपल्या मनात आपण चुकीचे आहोत व आपले विचार देखील चुकीचे आहेत हे सिद्ध करतात. अशा लोकांपासून चार हात लांब राहणे केव्हाही उत्तम.''
आपण गॅसलायटिंगचे बळी ठरत आहात, हे कसं शोधाल?
आपण गॅसलायटिंगचा बळी ठरत आहोत अथवा आपल्याला त्यांच्या जाळ्यात ओढले जात आहे, याच्या बद्दल सतर्क राहणे गरजेचं. आपल्याला बळी बनवणाऱ्या व्यक्तींना कसं ओळखायचं, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं. जी व्यक्ती तुम्हाला गॅसलायटिंगचा बळी बनवतात, ती प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला जबाबदार धरते. याचे थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होते. त्यामुळे आपले विचार आणि आपले मत गॅसलायटिंग करणाऱ्या लोकांपासून लांब ठेवा.
गॅसलायटिंगचे परिणाम
आपल्याला स्वतःच्या भावनांबद्दल प्रश्न पडायला सुरुवात होते, अनेक व्यक्ती दीर्घकाळापासून आपली दिशाभूल करतात. एक वेळ अशी येते तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर ओव्हर-रिअॅक्ट करत आहात, असं तुम्हाला वाटेल. त्यामुळे आपल्या मनात चालेल्या गोष्टी सतत कोणाशी तरी शेअर करू नका.
आपण स्वतःच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित कराल. आपण घेतलेला निर्णय चुकीचा तर नाही, असे मनात प्रश्न उपस्थित होतील. यामुळे स्वतःवरील विश्वास उडेल. अशाने स्वतःसाठी कोणताही निर्णय आपण घेऊ शकणार नाही. कारण, तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुमच्यासाठी योग्य नाही, अशी भावना तुमच्या मनात तयार होईल.
स्वतःबद्दल सतत नैराश्याची भावना मनात येईल. तुम्हाला स्वतःबद्दल निराश वाटेल. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही. आपल्याकडे चांगल्या गोष्टी करण्याची क्षमता नाही असे वाटेल. आपली काम करण्याची इच्छा शक्ती कमी होईल. आपण एकाद्या व्यक्तीच्या अधीन होऊन गेलो आहोत याची भावना निर्माण होईल.