जुळवून घेणं आणि लोटांगण घालत परिस्थिती शरण होणं यात फार बारकी रेषा असते. बदलत्या परिस्थितीत आपण आपलं स्वत्वच विसरुन गेलो आणि वारा आला तशी पाठ फिरवायला लागलं तर त्याला ‘जुळवून घेणं’ न म्हणता त्याला संधीसाधूपणाही म्हणतात. पण आपली मूल्यं, तत्व सगळी टिकवून नव्या गोष्टींशी-माणसांशी जुळवून घेत, नव्या गोष्टी शिकत आनंदानं केलेला नव्याचा स्वीकार म्हणजे ॲडाप्लिबिलिटी स्किल किंवा जुळवून घेण्याचं कौशल्य! वर्कप्लेस सॉफ्टस्किल्सचा विचार करताना ॲडाप्टिबिलिटी हे कौशल्य आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे.
(Image : google)
जुळवून घेणं म्हणजे काय?
मुळात आपण जुळवून घेतांच असतो, तडजोड करतोच मग हे वेगळं कौशल्य म्हणावं असं त्यात काय आहे?
आपण जुळवून घेतो पण मनापासून ते स्वीकारतो का? कुणी आपल्याला काही बदल सांगितला तर आपल्या मनात पहिला विचार येतो की हे कोण मला अक्कल शिकवणार? मला काय गरज आहे नवीन स्किल शिकण्याची? अमूक गोष्ट आपल्याला येत नाही हे मान्य करणंही अनेकांना अवघड जातं. काहीजणांना कळतं की आपण बदललं पाहिजे, जुळवून घेतलं पाहिजे पण ते कळणं कृती करण्यात वळत नाही आणि मग समजूनही काही उमजत नाही. परिणाम म्हणून नव्या कार्यपद्धतीशी जुळवून जमवून घेता येत नाही.
पण मग हे कसं जमवायचं?
१. आपल्या बाजूने संवादाची दारं उघडी हवी. नीट ऐकून घेणं, त्यातून नव्या आयडिया समजतात. आपल्या आयडिया सांगणं आणि त्यावर स्वत: काम करणं.
२. कृतीत बदल करणं. आपण तेच ते काम, त्याच त्या वळणानं करत राहिलो तर नवीन रिझल्ट येणार नाहीत त्यामुळे कृतीत बदल करणं, नव्या स्मार्ट पद्धतीनं काम शिकणं.
३. शिकत राहणं. सतत स्वत:ला अपडेट करत नवनवीन कौशल्य शिकत राहणं अत्यंत आवश्यक आहे.
४. अचिव्हमेण्ट, अर्थात आपली कर्तबगारी, रिझल्ट नीट सांगता येणं, पुन्हा पुन्हा स्वत:ला सिध्द करत राहणं.
५. विचार करणं आणि विचारानं वागणं. आपल्या डोक्यातला मेंदू कसा विचार करतो हे समजून आपल्या कामाशी तडजोड न करता नव्या गोष्टी नव्या प्रकारे करणं. मीच का पुन्हा पुन्हा स्वत:ला सिध्द करु असं न म्हणता रोज नवीन मॅच, नवा स्कोअर असा विचार करत काम करणं.
६. मात्र हे सगळं करताना आपण लोटांगण घातलं, पाठीचा कणाच नसल्यासारखं जगतो असंही होता कामा नये. आपलं काम चोख ठेवून नव्या चांगल्या त्या गोष्टी शिकत सोबतच्या माणसांशी जुळवून घेता आलं पाहिजे.