Join us  

फार इमोशनल आहात? स्वतःचेच मूड सांभाळून जीव थकतो ? करा ४ गोष्टी, स्ट्रेस होईल लवकर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2023 12:57 PM

How to handle Emotions and mental peace : मनस्थितीवर होणारा नकारात्मक परिणाम हे दुष्टचक्र आपल्या आयुष्यात सतत, नव्हे दररोजच चालू असते

मानसी चांदोरकर 

रोजच्या आयुष्यात आपल्या मानसिकतेवर परिणाम करणारे अनेक घटक आपल्या आजूबाजूला असतात. त्यातील काहींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो, तर काही घटक हे आपल्या नियंत्रण बाहेरचे असतात. ज्यामुळे आपली मानसिकता सतत ढासळत असते. एकप्रकारचे भावनिक किंवा मानसिक ओझे आपण सतत बाळगून राहत असतो. हेच मानसिक ओझे, भावनिक ओझे आपल्या ढासळत्या मनस्थितीला बऱ्याच अंशी कारणीभूत असतात. नात्यांमधील ताणतणाव, कामाच्या ठिकाणी असणारे ताण, स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवण्याचा ताण आणि यात थोडे जरी अपयश आले तरी जाणवणारे मानसिक ओझे. त्याचा मनस्थितीवर होणारा नकारात्मक परिणाम हे दुष्टचक्र आपल्या आयुष्यात सतत, नव्हे दररोजच चालू असते (How to handle Emotions and mental peace).

भावनांचा कल्लोळ झाला की आपली मानसिक स्थिती किंवा मनस्थिती ढासळते. मग  त्याचा परिणाम थेट आपल्या मनावर आणि पर्यायाने शरीरावर होतो. हा परिणाम टाळायचा असेल तर आपल्या मनावरचे भावनिक ओझे दूर करणे अतिशय महत्त्वाचे असते. आपण हे ओझे दूर करु शकलो तर आपली मनस्थिती आपोआपच चांगली राहते. आता यासाठी नेमकं काय करायचं असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. तर आपल्या रोजच्या दिनचर्येत काही गोष्टी आवर्जून केल्यास त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो. 

(Image : Google)

1) यासाठी रोज थोडा वेळ तरी आवर्जून प्राणायाम करायला हवे. दीर्घ श्वसन, श्वसनावर लक्ष केंद्रित करणे यामुळे शरीराचे नकारात्मक भावना निर्माण करणारे स्त्राव कमी स्त्रवतात व मन शांत राहते.

२)  मनावर जर प्रमाणाबाहेर ताण जाणवत असेल तर कोणाशी तरी मोकळेपणाने बोलायला हवं, यामुळे नकळतच आपल्या भावना मोकळ्या होतात आणि मनावरचा ताण हलका होण्यास मदत होते. 

३) आपल्या मनातील कल्लोळ आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलावा असे वाटत नसेल तर आवश्यकता भासल्यास समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ञांची मदत नक्कीच घेऊ शकता. सतत भावनिक ओझे मनावर बाळगत राहिलात आणि ते साठत गेले तर त्यामुळे मन:शांती ढासळत जाईल. अशा परिस्थितीत स्वतःला सक्षम-सुदृढ ठेवणे अवघड जाईल.

(Image : Google)

४) रोज प्राणायाम करा आणि स्वतःला थोडा वेळ द्या, स्वतःचे आवड-छंद जोपासा,  कुटुंबीयांसमवेत आनंदाने वेळ घालवा, आपल्या मनावरील दडपण, ओझे मनमोकळेपणाने कोणाला तरी सांगणे, यातूनच आपली मनस्थिती किंवा मनस्वास्थ्य उत्तम ठेवणे शक्य आहे. त्यामुळे कितीही ताणतणाव असला तरी त्याचे ओझे बाळगण्यापेक्षा तो कसा कमी करता येईल याकडे सतत लक्ष द्या. 

 

(लेखिका समुपदेशक आहेत)

संपर्क - 8888304759   इमेल आयडी - Cmanasib01@gmail.com

टॅग्स :मानसिक आरोग्यलाइफस्टाइल