कधी कधी असं ही होतं की आपलं ऑफिसमधलं काम आपल्या खूप आवडीचं असतं. आपल्याला काम करायला मजा पण येत असते. पण नेमकं ऑफिसमधलं काहीतरी खूप खटकत जातं. इतकं खटकतं की मग ऑफिसमध्ये कुणाशीच बोलावं वाटत नाही. सगळे वेगळ्याच नजरेने आपल्याकडे पाहू लागले आहेत, असं वाटतं. ऑफिसमध्ये एकतर आपण सतत कुणावर तरी संशय घेऊ लागतो किंवा मग आपल्याकडे कुणीतरी संशयाने पाहत आहे, असं वाटू लागतं. तुम्हालाही जर का अशी सारी लक्षणं जाणवत असतील, तर नक्कीच तुम्ही टॉक्सिक वर्कप्लेसमध्ये काम करत आहात, अशी शक्यता आहे.
ऑफिसमध्ये प्रत्येकालाच आपापले वेगवेगळे कामाचे टार्गेट असतात. जर दिलेली टार्गेट पुर्ण करायची असतील, तर तुमचं मन शांत असणं आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या सशक्त असणं खूप गरजेचं आहे. पण टॉक्सिक वर्कप्लेसचा नेमका परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होऊ लागतो आणि त्यामुळे मग तुमची कामाची गती आणि काम करण्याची क्षमता झपाट्याने कमी होऊ लागते. म्हणून उत्तम काम होण्यासाठी आपल्या ऑफिसचं वातावरणही उत्तम असणं खूप गरजेचं आहे.
कसं ओळखणार आपण टॉक्सिक वर्कप्लेसमध्ये काम करतोय ते ?१. संवाद नसणेकाम चांगलं होण्यासाठी आपले सहकारी, ज्युनिअर आणि सिनियर यांच्यात चांगला संवाद असणे गरजेचे आहे. ऑफिसमध्ये आपलं कुणी ऐकूनच घेत नाही किंवा जे काही ऑफिसमध्ये होतं, ते आपल्याला माहितीच नसतं, अशा प्रकारचा अनुभव जर तुम्हाला येत असेल, तर तुमच्या ऑफिसमध्ये संवाद खूप कमी आहे. योग्य संवाद नसेल तर कामेही लांबणीवर पडतात आणि वेळेत टार्गेट पुर्ण न केल्यामुळे वरिष्ठांची नाराजीही ओढवते.
२. नकारात्मक वातावरण आणि आळसतुमच्या अवतीभोवतीचे सहकारी कायम कामाबाबत कुरकुर करत असतील आणि त्यांना जर कामाचा नेहमीच कंटाळा येत असेल, तर तुमच्या आजूबाजूचे वातावरण खूपच नकारात्मक आणि आळशी आहे, हे ओळखून घ्या. कामाचा कधीतरी कंटाळा येणे अगदी साहजिक आहे. पण कायमच कंटाळा आलेला असणे आणि त्याच प्रकारची चर्चा कायम ऑफिसमध्ये होत राहणे आपल्यावरही नकळत नकारात्मक परिणाम करणारी ठरते.
३. बोलण्याची चुकीची भाषाऑफिसमध्ये जर कामात कुणाची काही चुक झाली, तर ती चुक सांगण्याची एक ठराविक पद्धत असते. चुक झाल्यावर बॉस ओरडणारच. पण ते ओरडणे भाषेची मर्यादा सोडून असेल, तर मात्र ते सगळ्याच सहकाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडून जाऊ शकते.
४. सारखी तुलना आणि पार्शलिटी होणेदोन ज्युनिअरमध्ये जर त्यांचा बॉस कायम तुलना करत असेल, तर अशा परिस्थितीतही काम करणे खूपच कठीण होऊन बसते. एका सहकाऱ्याला कायम झुकते माप आणि दुसऱ्या सहकाऱ्याला मात्र नेहमीच दिली जाणारी सवलत ऑफिसमधील वातावरण बिघडवून टाकते.
५. महिलांना त्रासऑफिसमध्ये महिला सहकाऱ्यांना शारीरीक, मानसिक आणि लैंगिक त्रासाला सामाेरे जावे लागू नये, म्हणून काही कायदे आहेत. पण भीतीपोटी अनेक महिला कायद्याची मदत घेणे टाळातात. तुम्ही ज्या कार्यालयात काम करत आहात, तेथील माजी महिला सहकाऱ्यांनी केवळ अशा कारणांमुळे जर ऑफिस सोडले असेल, तर नक्कीच ते एक टॉक्सिक वर्कप्लेस आहे हे लक्षात घ्या.