Lokmat Sakhi >Mental Health > आषाढी एकादशी स्पेशल : वारीत चालण्याचा आनंद चालण्याचं बळ आणि जगण्याची उमेद देतो तेव्हा..

आषाढी एकादशी स्पेशल : वारीत चालण्याचा आनंद चालण्याचं बळ आणि जगण्याची उमेद देतो तेव्हा..

कोणत्याही तक्रारीशिवाय चालत राहण्याचे बळ वारी आपल्याला देत असते. ऐकावे-पाहावे-चालत राहावे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 06:00 AM2024-07-17T06:00:00+5:302024-07-17T06:00:02+5:30

कोणत्याही तक्रारीशिवाय चालत राहण्याचे बळ वारी आपल्याला देत असते. ऐकावे-पाहावे-चालत राहावे.

Ashadhi Ekadashi Special :wari gives you strength to walk, to know joy of life. | आषाढी एकादशी स्पेशल : वारीत चालण्याचा आनंद चालण्याचं बळ आणि जगण्याची उमेद देतो तेव्हा..

आषाढी एकादशी स्पेशल : वारीत चालण्याचा आनंद चालण्याचं बळ आणि जगण्याची उमेद देतो तेव्हा..

Highlightsजगण्याची वारी चालतानाही संतांनी स्वीकारलेली मानवतेची पताका आपण बरोबर ठेवायला हवी.छायाचित्र : प्रशांत खरोटे

अश्विनी बर्वे

कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ! संत मंडळी सुखी असो !! अहंकाराचा वारा न लागो राजसा ! माझिया विष्णुदासा भाविकांसी !!
नामा म्हणे तया असावे कल्याण ! ज्यामुखी निधान पांडुरंग !!
लहानपणी कीर्तनाला गेले की हा अभंग सर्वात शेवटी म्हटला जायचा. तो ऐकून ऐकून पाठ झाला होता. त्यातल्या कोणत्याही शब्दाचा अर्थ त्यावेळी जाणून घ्यावा असं मला वाटलं नाही. त्यामुळे त्या ओळी मनात तशाच राहिल्या. आज इतक्या वर्षांनंतर वारीला गेल्यावर त्या शब्दांचा अर्थ कळतोय, उमजतोय असं वाटू लागलं आहे.
वारी करायचीच हे माझं पक्क होतं. ज्या ज्यावेळी मी वारीचा विषय काढायचे तेव्हा सगळेचजण तुला कसं जमेल, राहायची सोय, आंघोळीची गैरसोय अशा बऱ्याच गोष्टी मला सांगत होते. अर्थात या सगळ्यांनी वारी कधीच केलेली नव्हती. त्यामुळे ज्यांनी वारी केली आहे आणि जे परत परत जात आहेत त्यांचे अनुभव ऐकून आपण वारी करावी असं मी ठरवलं.
पण त्यातीलही बरेचजण वारी करायची म्हणून करत होते. म्हणजे परत त्यांच्याशी बोलूनही माझ्या हाती काहीच लागत नव्हते.
शेवटी मी ठरवले जे होईल ते होईल वारी करायचीच.
तीही एकटीने कोणत्याही मैत्रिणीला सोबत न घेता.
पूर्णपणे अनोळखी लोकांबरोबर जुळवून घेण्याची संधी मला वारीने दिली.

त्याचमुळे आजही वेगवेगळ्या अनोळखी लोकांमध्ये अनेक प्रकारचे मतभेद असतानादेखील मी गुण्यागोविंदाने राहू शकते. दुसऱ्या व्यक्तीचे मत हे आपल्यापेक्षा वेगळे असू शकते आणि वेगळे आहे म्हणजे ते चुकीचे आहे असे नाही. याची प्रत्यक्ष जाणीव वारीमुळे निर्माण झाली.
आज जेव्हा मी हा लेख लिहायला बसले तेव्हा मला आठवतंय की मी वारीसाठी दिंडीत नाव नोंदवले तेव्हापासूनच मी एका आनंदात होते. मला प्रत्येक गोष्टीत गंमत वाटत होती. म्हणजे कोणी मला म्हटलं की ऊन असेल तर काय कराल हो तुम्ही? मी काही उत्तर द्यायचे नाही.
जणू मला माझं वाटायचं की मी आता चालतेच आहे.
मी कल्पनेने किती वेळा अशी ऊन-पावसात चालली असेल? माहीत नाही.
मला पाठ असलेल्या अभंगाशी मी जोडले जात होते. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी !
कल्पनेची बाधा मला झाली होती. मी सगळ्या प्रकारच्या सकारात्मक अशा कल्पना केल्या होत्या. मला वाटत होतं की मी आजारी पडणार असेल तर वारीला न जाता इथेही पडू शकते, मग तिथं जाऊनही आजारी पडू शकते. पण मला जायचंच आहे.
माझ्या मनात अजिबात शंका नव्हती. मनाची निःशंक अवस्था मला समजत होती. मी वारीच्या अनुभवातला फक्त आनंदच टिपत होती.
आपल्याभोवती आनंद असतोच त्यासाठी आपल्याला सहज व्हायचं असतं. हे वारीने मला शिकवलं.
पण माझ्यात वारकऱ्यांमध्ये असलेला संपूर्ण समर्पणाचा भाव येणार होता का? आणि कसा येईल? याचा शोध मी संपूर्ण वारीत घेत होते, आजही वारी आठवली की मी स्वतःला तपासून बघते. वारी करतांना पांडुरंगाचे दर्शन हे माझे ध्येय ठरवले नव्हते. मला काहीतरी अधिक समजतं आहे याची पुसटशी जाणीवही मला नको होती आणि ती माझ्या आतून निपटून निघणं हीच माझी मनाची वारी होती. ती खूप कठीण होती.
आपणच आपल्याला तपासात राहायचे. सतत स्वतःला पिंजऱ्यात उभे करायचे. यात मी खूप दमत होते. हा विचार आपण कोणाला आणि कसा सांगू शकतो? म्हणजे पायी चालणे ही शारीरिक वारी, मनाला शिस्त लावणे ही मानसिक वारी आणि सतत दुसऱ्याने म्हटलेले अभंग, गवळणी, भारुड आणि इतर सर्व ऐकणे श्रवणाची वारी मी करणार होते. दुसऱ्याचे फक्त दुसऱ्याचेच ऐकायचे हे मी पक्क ठरवलं होतं. त्यामुळे माझे कुठेही मतभेद झाले नाही. मला हे सगळं करताना मजा आली. कुठेही मानसिक त्रास झाला नाही. मला माझ्यात आणि इतरांच्यातही छान राहता आले.
वारी हा आनंद देते.
वारी तुम्ही कितीवेळा करतात यापेक्षाही ती कोणत्या भावनेने आणि विचाराने करतात याला खूप महत्त्व आहे असे मला वाटते. कारण कोणत्याही तक्रारी शिवाय चालत राहण्याचे बळ वारी आपल्याला देत असते. ते बळ एकदा आपल्याला मिळाले की शहाणीव जागी व्हायला वेळ लागणार नाही. आजही वारी बघताना मन भरून येते.
आता पुन्हा गेले तर पहिल्यांदा केलेल्या वारीचाच अनुभव आपल्याला मिळेल याची खात्री वाटत नाही. कारण पहिल्या वारीने घडवलेला बदल अधिक काही समजून घेण्यास मदत करेल असे वाटते. पांडुरंग भेटावा असं वाटत असेल तर जगण्याची वारी चालतानाही संतांनी स्वीकारलेली मानवतेची पताका आपण बरोबर ठेवायला हवी.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
ashwinibarve2001@gmail.com

Web Title: Ashadhi Ekadashi Special :wari gives you strength to walk, to know joy of life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.