Join us  

लिहा आणि मोकळे व्हा! स्ट्रेस-भीती-धडधड यावर सोपा उपाय, तुम्ही ठरवा ओझं व्हायचं की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 5:37 PM

आपण कसे आहोत? आपल्यासमोर नेमका प्रश्न काय? त्यावर काय उपाय असू शकतात असा गोंधळ उडालेला असेल, मनावर ताण तणाव असेल, कसलीतरी भीती मनाला छळत असेल तर एकच सोपा उपाय आहे तो म्हणजे जे मनात येतं ते सरळ लिहून काढणं..  मानसिक स्वास्थ्यासाठी रोज लिहिणं ( benefits of journaling) ही चांगली सवय आहे. 

ठळक मुद्देलिहिण्यामुळे मन हलकं होण्यास, आपण कोणाला तरी मनातलं सांगितलं आहे ही जाणीव निर्माण होण्यास मदत होते.आपल्यासमोरील प्रश्न, समस्या, कामं यांचा प्राधान्यक्रम लिहिल्यामुळे लावता येतो. आपल्या मनातील सकारात्मक, नकारात्मक विचार लिहिण्यामुळे समोर येवून स्वत:ची ओळख व्हायला मदत होते. 

लहानपणी शाळेतले शिक्षक, घरी आई बाबा रोज डायरी लिहायला लावायचे. आज दिवसभरात जे काही घडलं, अनुभवलं ते डायरीत लिहून काढण्याचा आग्रह धरायचे. यातूनच अनेकजणांना डायरी लिहिण्याची ( writing diary) सवय लागते आणि पुढे ती आयुष्यभर टिकून राहाते. ही डायरी लिहिण्याची सवय लिखाणाच्या कौशल्यापेक्षाही व्यक्तिमत्व विकासासाठी म्हणून जोपासली जायची. ही डायरी लिहिण्याची सवय व्यक्तिमत्व विकासासोबतच मानसिक स्वास्थ्यासाठी (writing diary for mental health)  उपयुक्त असल्याचं करिअर कोच आणि मेन्टल ॲडव्हायझर ऋषि माथूर सांगतात.  'ओन्ली माय हेल्थ' या आरोग्यविषयक ऑनलाइन साइटवर त्यांनी जर्नलिंग अर्थात लिहिण्याचे मानसिक फायदे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.  या डायरी लिहिण्याच्या सवयीतून आपण आपलं मन हलकं करु शकतो. मनातले नकारत्मक विचार, वेदना, भीती  बाहेर काढून टाकण्यासाठी लिहून काढणे हा उत्तम उपाय (benefits of journaling for mental health)  असल्याचं ते सांगतात. मन मोकळं करण्याची भावना लिहिण्यातून निर्माण होते असं ऋषी माथूर सांगतात. 

Image: Google

लिहिल्यानं काय होतं?

1. चिंता, तणाव, नैराश्य हे मनाला छळणारे आजार लिहिण्याच्या उपायानं कमी होतात. या मानसिक आजारांमध्ये मनात खूप साचलेलं असतं पण कोणाशी बोलावं हे कळत नसतं, कोणी आपल्याला समजून घेईल का अशी साशंकता असते, तर कधी इच्छा असूनही बोलता येत नाही, तशी व्यक्तीच कोणी भेटत नाही तर कधी मनात खूप साचलेलं असलं तरी बोलावंसं वाटत नाही. अशा परिस्थितीत  लिहून काढण्यामुळे मन हलकं होण्यास, आपण कोणाला तरी मनातलं सांगितलं आहे ही जाणीव निर्माण होण्यास मदत होते. 

2. आपल्या मनात विचारांचा, कामांचा गोंधळ उडालेला असतो. काय करावं, कसं करावं हे सूचत नाही. यामुळे कामं होत नाही. या अशा गोंधळामुळे करिअरमध्ये, आयुष्यात मागे पडत चालल्याची भावना निर्माण होते. अपयशी झाल्यासारखं वाटतं. या परिस्थितीत लिहिण्याची सवय आपली मदत करु शकतं. ज्या कामांचा, विचारांचा गोंधळ उडाला आहे ती कामं, ते विचार जर लिहून काढले तर कशाला प्राधान्य द्यायला हवं याची जाणीव होते. ते काम करण्यासाठी आपण, किंवा इतरांनी काय करणं अपेक्षित आहे याची स्पष्ट कल्पना येते. आपल्या समोरचे प्रश्न कोणते याची स्पष्ट जाणीव होते. या प्रश्नांवर मार्ग काय असतात हे देखील आपल्याच लिहिण्यातून समोर येतं. स्वत:च्या ओळखीसोबतच परिस्थितीची कल्पना येण्यास लिहिणं मदत करतं. 

3. अनेकदा आपणच आपल्याला ओळखू शकत नाही. मनात सकारात्मक, नकारात्मक विचारांची गर्दी झालेली असते. अशा गर्दीत आपण नेमकं कसे आहोत, कोण आहोत हेच आपल्याला समजत नाही. लिहिल्यामुळे मनातले नकारात्मक, सकारात्मक विचार कागदावर उमटतात. त्या विचारांकडे आपण डोळसपणे पाहू शकतो. 

4. उदास वाटणं, नैराश्य येणं या समस्यांमध्ये लिहिल्यामुळे खूप फायदा होतो.  आपल्याला नैराश्य/ उदास वाटण्यास, ताण निर्माण करण्यास  कारणीभूत गोष्टीचा, परिस्थितीचा यातून शोध घेता येतो. आपल्याला आनंद कधी वाटतो याचाही यातून शोध लागून आनंद वाटणाऱ्या गोष्टींंकडे मन वळवण्यास लिहिण्यातून प्रेरणा मिळते. आपल्या भाव भावनांचं व्यवस्थापन करण्यास, मन शांत करण्यास लिहिणं आपली मदत करतं. 

Image: Google

लिहिण्याची सवय जोपासताना...

आपल्या आयुष्यात आपली पावलोपावली मदत करणारी ही लिहिण्याची सवय जोपासणं फार अवघड बाब नसल्याचं ऋषी माथूर सांगतात. त्यासाठी सोप्या टिप्स ते सांगतात. 

1.  दिवसभरात जेव्हा केव्हा आपल्याला लिहावंसं वाटेल, वेळ मिळेल तेव्हा लिहावं. यासाठी सोबत डायरी-पेन असावा. किंवा तो नसला तरी आपण मोबाइलमध्येही लिहू शकतो. 

2. लिहायचं कसं, पहिले काय लिहावं असा विचारांचा खल न करता जे जसं मनात येईल ते लिहावं. चांगलं, वाईट, कोणी काय विचार करेल असा विचार न करता जे लिहून व्यक्त करावंसं वाटतं ते लिहावं. 

3. लिहिताना आपण परीक्षेतला निबंध लिहित नाही हे स्पष्ट हवं. नाहीतर शुध्दलेखनाच्या चुकांकडे लक्ष जाऊन जे व्यक्त करायचं आहे त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्याकरणाची भीती न बाळगता स्वत:च्या आनंदासाठी, मोकळं होण्यासाठी मुक्तपणे लिहावं. 

4. स्वत:ला मदत करण्यासाठी म्हणून लिहिण्याची सवय जोपासताना रोज लिहिण्याचा नियम करावा. लिहिण्यामुळे आपल्या व्यक्त झाल्याचा आनंद मिळतो, प्रश्न सोडवण्यास मदत मिळते, स्वत:ल, परिस्थितीला ओळखण्यात मदत होते, मन तणावमुक्त होण्यास, स्वत:ला आनंद मिळण्यास म्हणून लिहिण्याची सवय जोपासताना रोज लिहिणं आवश्यक आहे. 

टॅग्स :मानसिक आरोग्य