अजिबात एकाजागी न बसणारी मुलं, सतत चुळबूळ आणि काही ना काही कारणाने जागेवरुन उठणारी मुलं. हे चित्र आपल्या घरात आणि आजुबाजूला सतत दिसते. एकाग्रता नसणे आणि सततची चलबिचल ही समस्या केवळ लहानग्यांनाच नाही तर काहीवेळा मोठ्यांनाही तीभेडसावते. एका ठराविक काळानंतर आपण करत असलेल्या गोष्टीचा कंटाळा येणे यालाच शास्त्रीय भाषेत अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर (ADD) असे म्हणतात (Bollywood actress alia bhat is suffering from attention deficit disorder know what is it exactly).
तुम्हा-आम्हालाच नाही तर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट हिलाही ही समस्या भेडसावते. नुकतीच तिने एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर या समस्येविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. अल्यूर या अमेरिकन मासिकाशी बोलताना आलिया सांगत होती. तिच्या लग्नाच्या मेकअप करताना आर्टिस्टने तिला दोन तास मागितले होते मात्र त्यासाठी आपण नकार दिल्याचे ती म्हणाली. ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मी खुर्चीवर बसू शकत नाही असं तिने आपल्या आर्टीस्टला सांगितले. मेकअपमध्ये जास्त वेळ घालवायला नको असे तिला वाटते. लग्नाच्या वेळी इतका वेळ घालवणे मला योग्य वाटत नाही असंही आलियाने पुढे सांगितले.
अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर (ADD) म्हणजे नेमकं काय?
आपण करत असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे किंवा एकाग्रतेने ती गोष्ट पूर्ण करणे हे वय वाढेल तसे जमायला लागते. मात्र काही जणांना ते अजिबातच जमत नाही. त्यामुळे अशा लोकांना दिर्घकाळ एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप त्रास होतो. हा त्रास अचानक होतो असे नाही तर तो जन्मत: असतो. त्यामुळे या गोष्टीसाठी एखाद्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला दोष देणे उपयोगाचे नसते. या समस्येमध्ये लक्ष विचलित होत असल्याने आपण करत असलेल्या कामात चुका होण्याची शक्यताही जास्त असते. या समस्येमुळे बऱ्याच जणांना उदासिनता, नैराश्य, जेवण आणि झोपेच्या समस्या, आत्मविश्वासाची कमतरता अशा समस्या उद्भवू शकतात.
उपाय काय?
भारतात बहुतांश जणांना ही समस्या आहे असे वाटतच नाही. मात्र आपले मूल खूप जास्त अॅक्टीव्ह असेल, कशातच लक्ष लागत नसल, चंचल असेल तर पालकांनी त्याकडे लक्ष द्यायला हवे. अशावेळी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उपाययोजना करायला हव्यात. या समस्येवर औषधे आणि बिहेविअरल थेअरी उपयुक्त असून योग्य वेळी उपचार झाल्यास भविष्यात होणारा त्रास नियंत्रणात येऊ शकतो. परंतु या समस्येचा स्वीकार ही महत्त्वाची गोष्ट असल्याचेही मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.