Join us  

आपलं ‘ऐकणं’ बंदच झालंय का? कोण काय बोलतंय, आपल्याला कळतच नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 7:07 PM

प्रभात पुष्प -६ कुणी कुणाचं ऐकूनच घ्यायचं नाही, असं का होतंय आपलं?

ठळक मुद्देआपल्याला गरज आहे सुंदर मनाची. ते सुंदर होण्यासाठी आपण काही गोष्टी मुद्दाम शिकायला हव्यात.

अश्विनी बर्वे

आज सगळ्यात जास्त कसली गरज आहे? आजूबाजूला चाललेल्या अनेक घटना आपल्याला सगळ्यांनाच अचंबित करत आहेत. कोणीच कोणाचे जराही बोलणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाही. ‘अरे’ला कधी एकदा ‘कारे’ म्हणतो, याची घाई झाली आहे. असं काय झालं आहे आपल्याला की, आपण इतके हायपर होत आहोत. का कोणाचे ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाही? चर्चा सुद्धा नको आपल्याला? असं म्हणतात की, आजचे युग अधिक उदारीकरणाचे आहे, आधुनिक विचाराचे आहे. मग यात दुसऱ्यांच्या विचाराला काहीच जागा नाही का? असे कसे आपण उदार, आधुनिक, मग जुनी माणसे परवडली ना? ते निदान ऐकून तर घेत होते. अनेकदा आपलं एकमत होणार नाही, पण हे तर मान्य करू, आपली मते भिन्न आहेत, हे स्वीकारू. पण यासाठी आपल्याला गरज आहे सुंदर मनाची.

(Image : Google)

मन सुंदर होण्यासाठी आपण काही गोष्टी मुद्दाम शिकायला हव्यात.

१. सुंदर मनासाठी तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात, त्या व्यक्तीचे कोणते विचार, मत, भावना तुम्हाला मान्य होत आहेत, याचा शोध घ्यायला हवा. हे तर खूप सोप्पं आहे, असे आपल्याला वाटते. पण ते तसं नाही. कारण, आपल्याला पटणारे मुद्दे हे खऱ्या अर्थाने मान्य असायला हवेत, त्यात वरवरची/खोटी मान्यता नको. म्हणजे त्या व्यक्तीसमोर हो हो म्हणायचे, पण मनात मात्र नकारात्मक विचार करायचा.२. एखाद्याचे मत मान्य असणे फार अवघड आहे, याचे मुख्य कारण प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. तुमचे बालपण, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती, तुम्ही राहता ती जागा, शहर, गाव, तुमचे शिक्षण. प्रत्येकाची आपल्या विचारामागे काही पार्श्वभूमी असते.३. काही लोक मतभेद नोंदवतात तर काही लोकांचा सर्व गोष्टी मान्य करण्याचा कल असतो. मग तिथं विचारांची देवाण-घेवाण करता येत नाही.४. आपण समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकायला हवे. मुळातच आपण चांगलं ऐकणारे व्हायला हवं. आपला कान जसा गाण्याच्या बाबत तयार असायला लागतो, तसाच तो संवादासाठी सुद्धा तयार असावा लागतो.५. नेहमी आपलंच कसं बरोबर असेल बरं? मन सुंदर व्हावं, असं वाटत असेल तर समोरच्या व्यक्तीचे नीट लक्षपूर्वक ऐकण्याची कला आपल्याला साध्य करायला हवी.

ashwinibarve2001@gmail.com

टॅग्स :मानसिक आरोग्य