Join us  

सतत इतरांचा हेवा, दुसऱ्यांशी तुलना? मन इतके इनसिक्युअर का होते? कुठं हरवला जगण्यातला आनंद आणि विश्वास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 1:25 PM

आपण आनंदानं जगतो आहोत का? सतत इतरांच्या हातात काय यात आपलं सुख पाहतो? विचारा स्वत:ला? -प्रभात पुष्प

ठळक मुद्देआपण का इतके इनसिक्युअर होतोय विचारू स्वत:लाच..

अश्विनी बर्वे

लोक व्यायाम करायला लागले. त्यासाठी जॉगिंग ट्रक बांधले गेले. त्यावर चालायचे म्हणजे विशिष्ट कंपनीचे नीटनेटके बूट हवेत. नाहीतर एखादा खडा पायाला टोचला की कायमचे दुखणे! त्यात तुम्ही मधुमेही असाल तर? अरे बापरे. शिवाय पाय व्यवस्थित जमिनीवर टेकायला हवा. नाहीतर कुठेतरी लचक भरायची. मग तुमचे कोण करणार? अरे बापरे! असं सारखे अरे बापरे करत जगणं चालू आहे. कारण असे किती ‘अरे बापरे’ आपल्या आयुष्यात येणार आहेत हे आपल्याला माहिती नाही. जसे आपले श्वास किती राहिले हे आपल्याला माहिती नसतं ना, अगदी तसंच..जोवर आपण जगतोय तोवर छान आनंदानं जगावं. तंदुरुस्त रहावं. व्यायाम तर प्रत्येकानं करायला हवा. सकाळीच करायला हवा असं काही नाही. तुमच्या वेळेनुसार व्यायाम करा. तुमच्याकडे वेळ नसेल तर दिवस थोडा मोठा करा. रात्र लहान करा. सकाळी तोंडावर सुजेसारखं दिसलं तर डॉक्टरकडे जा, गोळ्या खा. सगळं तपासून घ्या. झोप येत असेल तर निवांत झोप नाहीतर जागे रहा. पण मन थाऱ्यावर राहत नाही. मनात हजारो विचार. आता काय होणार कसं होणार? अरे बापरे, आपण कसे जगणार? पुढे काय होणार  या सगळ्याच्या मुळाशी काय आहे?

(Image : google)

तर अगदी खोलवर रुजलेली,आपली ‘असुरक्षितता’.जीवनाला मेट्रोची आणि इंटरनेटची गती आल्यामुळे कामाचा आणि तब्येती वाढण्याचा वेग वाढत आहे. बाहेर दिसणाऱ्या सगळ्या वस्तू मनावर परिणाम करत आहेत. त्यामुळे प्रतिष्ठा वाढत आहे. कोणत्या जिमला जायचे? योगासन केंद्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चालवत असतील तर ते अधिक चांगले. याचाही अभ्यास होत आहे. काळाची गरज आहे,पण त्यातून आपल्याला हवे ते साध्य होत आहे ना? हे तपासून पहायला हवे. आपण असुरक्षित आहोत हे माणसाला कधी कळले असेल? आपण नकारात्मक विचार करत आहोत, हे कधी समजले असेल? खरं तर आपण एकटे जन्माला येतो आणि एकटे जातो, ही स्वीकारार्ह गोष्ट आहे आपल्याकडे. तरीपण आज इतका एकटेपणा कधी डोक्यात आणि डोळ्यास आला नव्हता . कारण आपण वस्तूंमध्ये आनंद शोधत आहोत, तो तर आपल्यात आहे. त्याच्याकडे जरा बघू या. आपण का इतके इनसिक्युअर होतोय विचारू स्वत:लाच..

( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

टॅग्स :मानसिक आरोग्यआरोग्य