Join us  

सतत सोशल मीडियात पडीक असता? वर्तनात दिसतात का ८ बदल; मानसिक आणि कौटुंबिक सुखही गमवाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 6:01 PM

सोशल नेटवर्किंग साइट्स दिवसाकाठी खूप काळ वापरणाऱ्या माणसांच्या हे लक्षातही येत नाही की आपल्याही नकळत आपण बदलतो आहोत.

ठळक मुद्देवर्तणुकीचे, भावनांचे आणि पुढे जाऊन नात्यांचे घोळ होण्याआधी स्वतःला सावरले पाहिजे.

-मुक्ता चैतन्य

आजपर्यंत कपडे, दागिने, गाड्या या गोष्टी स्टेटस दाखवण्याच्या गोष्टी होत्या हल्ली सोशल नेटवर्किंग साइट्सवर आपण काय, किती आणि कस बोलतोय हा स्टेटसचा विषय बनला आहे. कुठलाही नवीन ग्रुप तयार झाला की लगेच त्या ग्रुपवर विविध मेसेजेसचा पाउस पडतो. कोण सगळ्यात पहिल्यांदा सुप्रभात करतंय याची चढाओढ चालू होतं. एखाद्या ग्रुपवर सुप्रभात, विनोद, सुविचार किंवा तत्सम मेसेजेस पाठवून नयेत अशा सूचना दिलेल्या असतील तरीही मेसेज टाकण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. अगदी ग्रुपमधून काढून टाकलं तरीही दुसऱ्या एखाद्या ग्रुपवर जाऊन मेसेजेस पाठवण्याचा मोह पूर्ण केला जातो. शिवशिवणाऱ्या बोटांना रोखता येत नाही. मनाला आवर घालता येत नाही. त्यावरून ग्रुपमध्ये भांडणं झाली तरीही चालतात पण अनावश्यक मेसेजेस टाकायचे नाहीत हा नियम पाळणे अनेकांना कठीण होऊन बसते. कारण या सुविचार, सुप्रभात आणि जगभरातल्या माहितीच्या निमित्ताने आपण किती ‘इन्टेलेक्चुअल’ आहोत, हे आपल्या सगळ्या परिचितांना आणि जेवढ्या ग्रुप मध्ये आहोत त्या प्रत्येक ग्रुपमध्ये दाखवण्याचा सोस संपत नाही. एक नव्या व्यसनाच्या जाळ्यात अलगद अडकत जातोय. या व्यसनासाठी बाह्य बदल काही होत नसले तरी वर्तणुकीतले बदल मात्र खूपच त्रासदायक आहेत. या व्यसनापासून स्वतःला वेळीच लांब करणे गरजेचे आहे. आपल्या वर्तणुकीत होणारे बदल सूक्ष्म आहेत पण ते रोजच्या रोज होतायते.

(Image : Google)

आपल्या वर्तणुकीत कोणते बदल होत आहेत?

१. अनेकांना रात्री झोप येत नाही. मग मोबाईलवर सोशल नेटवर्किंग साइट्सवर अपडेट्स बघत बसतात.  किंवा मोबाईलवर गेम्स खेळत बसतात. ते सगळं बघता बघता झोप लागते. झोप येत नाही म्हणून मोबाइल आणि मोबाइल म्हणून झोप या चक्रात अनेक जण अडकले आहेत.उठल्याबरोबर पहिल्यांदा मोबाइल चेक करताना काल केलेल्या स्टेटस अपडेट्सना किती आणि काय काय प्रतिक्रिया आल्या आहेत, लाइक्सची संख्या वाढली आहे का, याकडे लक्ष लागून असते. सकाळी उठल्यावर आजूबाजूची सकारात्मकता मनात शिरण्याआधी बाकीच अनावश्यक गोष्टी डोक्यात शिरतात.२. सोशल नेटवर्किंगचा जगभर चाललेला अभ्यास सांगतो की सोशल नेटवर्किंगमुळे माणसांमधला पेशंस कमी होतोय, नकारात्मक भावना वाढतायेत, ऐकीव माहितीवर विश्वास ठेवण्याचे प्रमाण वाढते आहे, माणसांचे मत आता सोशल नेटवर्किंग साईटवरचे मेसेजेस ठरवतात.३. माणसे खूप बोलतात पण विचार करतातच असे नाही. विचार करून बोलतात असेही नाही.खोटी स्तुती करण्याचे आणि कारण नसताना संतापण्याचे प्रमाण वाढले आहे. माणसांमध्ये भावनेचे तीव्र चढउतार बघायला मिळतात.कालपर्यंत नसलेली असुरक्षिततेची भावना बळावली आहे. लहान सहान गोष्टींमध्ये असुरक्षितता निर्माण होते, ज्यामुळे मत्सर, अकारण स्पर्धेच्या भावना बळावत आहेत. ज्याचा थेट परिणाम म्हणजे मनातील वाढती नकारात्मकता.

(Image : Google)

४. लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी देखील याच माध्यमावर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्यामुळे जोडप्यांच्या नात्यांमध्ये ताण निर्माण होतो आहे. लैंगिक वर्तणुकीत बदल होतो आहे.पालक सतत मोबाइलवर असतात त्यामुळे लहान मुलांनाही मोबाइलची चटक लागली आहे. म्हणजे वर्तणुकीचे बदल फक्त पालक, आजीआजोबा आणि आताच्या पिढीत झाले आहेत असे नाहीत, तर ते पुढच्या पिढ्यांमध्येही होतायेत. तशा शक्यता वाढल्या आहेत. हे अधिकच धोकादायक आहे.५. खोटे बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. आपण खूप वेगळे आहोत, हटके गोष्टी करतो आहोत, आपण जे नाही ते दाखवण्यासाठी जगाला सतत ओरडून ओरडून सांगण्याच्या नादात लोक सर्रास खोटे बोलत आहेत.६. खासगी क्षण शेअर करण्याच्या नादात आपलं आणि खासगी असं काही शिल्लक ठेवायला हवे याचे भान संपते आहे.७. संवाद प्रत्यक्ष नसल्याने अनेक प्रकारचे गैरसमज होताना दिसतात. समोरच्याला काय म्हणायचे आहे हे समजून घेण्याची तयारी कमी होतेय, इतकंच नाही तर, चटकन गैरसमज होणे, त्यातून नात्यात ताण निर्माण होणे या गोष्टी सर्रास होत आहेत.८. या सगळ्याचाच अर्थ असा होतो की संवादाचे हे माध्यम अजून आपल्याला नीट वापरता येत नाही. कारण तो वापरण्याच्या बाबतीत असलेल्या वर्तणुकीच्या गोष्टी आपल्या गावी नाही. त्यातून या माध्यमाची चटकन सवय जडते आणि या सवयीतून बाहेर पडता येत नाही. सतत मोबाइलला नाक चिकटून राहणाऱ्यानी ताबडतोब आपल्या या सवयीचा विचार करायला हवा. वर्तणुकीचे, भावनांचे आणि पुढे जाऊन नात्यांचे घोळ होण्याआधी स्वतःला सावरले पाहिजे. तुम्हाला जर तुमच्या वागण्यात फरक जाणवत असेल, आजूबाजूच्या माणसांनी असा काही बदल तुमच्या स्वभावात नोंदवला असेल तर सावधान!काही सवयींचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

(लेखिका मुक्त पत्रकार आणि समाजमाध्यमाच्या अभ्यासक आहेत.) 

टॅग्स :सोशल मीडियामानसिक आरोग्य