डॉ. ऋचा सुळे - खोत
कोरोनाने जगभरात माणसांच्या जगण्याचे अनेक संदर्भच बदलून टाकले. काहींनी जिवाभावाची माणसं गमावली, काहींनी आपल्या कोरोना आजारपणात वेदनांचा अनुभव घेतला. शरीर बरं झालं; पण मन मात्र आजारी, घाबरलेलं असंही घडलं. त्यात अलीकडच्या बातम्या म्हणजे कोरोनात पतीला गमावलं, तर लेकीसह आईनं आत्महत्या केली. कुठं कुणा महिलेनंही असंच स्वत:ला संपवून टाकलं. या घटना धक्कादायक वाटतात. हळहळ वाटते, हसतं-खेळतं घर, माणसं उदध्वस्त होतात आणि मग प्रश्न पडतातच की हे सारं का होतं?
अनेक महिलांना कोरोना होऊन गेल्यावर, कोरोनामुळं जिवाभावाची माणसं गमावल्यावर मानसिक ताणाचा, आजारांचा सामना कमी करावा लागतो आहे.त्यांना मदत कशी मिळणार?
कोरोना काळातल्या या दोन वर्षांत आपण जगाच्या संपर्कात कमी आणि स्वत:च्याच सहवासात जास्त वेळ घालवला. प्रत्येक व्यक्तीने परिस्थितीशी सामना करण्याचा अतोनात प्रयत्न केला; पण प्रत्येकालाच किंवा प्रत्येकीलाच ते योग्य पध्दतीने करता आले, असं नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनिश्चितता आणि भीती जास्त असल्यामुळे आपण काय करावे, हेच समजत नव्हते. समाजमाध्यमांवर येणाऱ्या उलटसुलट बातम्यांचा प्रत्येकाच्या मानसिकतेवर परिणाम झाला. पहिली लाट ओसरली म्हणता म्हणता मनावरचा संयम आणि चेहऱ्यावरचे मास्कही हनुवटीपर्यंत खाली सरकले. बघता-बघता दुसरी लाट आली. आणि अनेकांच्या आयुष्यातून जे काही हाती लागेल ते घेऊन गेली.पहिल्या लाटेपेक्षा ही दुसरी लाट जास्त भयानक होती. त्यासाठी ना प्रशासन तयार होते, ना वैद्यकीय व्यवस्था ना सामान्य माणसं. त्यामुळे जे नुकसान झाले त्याचा प्रत्येकाच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला आहे. आर्थिक नुकसान झालेच; पण ज्यांनी जिवाभावाची व्यक्ती गमावली त्यांचं काय? मुलांच्या डोक्यावरून आई-बाबांचे छत्र गेले, त्यांचं काय?
या साऱ्यांनी मानसिक ताणतणावाला कसे सामोरे जायचे?
प्रत्येक माणसांची ताण सहन करण्याची क्षमता वेगळी असते. काही माणसं कणखरपणे सारं पेलून पुन्हा उभे राहतात.
पण काहीजण कोलमडून जातात. त्यांच्या मनात हळूहळू असहायता (हेल्पलेसनेस), आशाहीनता (होपलेसनेस), निरुपयोगीपण ( वर्थलेसनेस) या भावना निर्माण होतात. या तिन्ही भावना नैराश्याकडे घेऊन जात असतात.या भावनांचा निचरा होणं खूप गरजेचं असतं. निराश, असहाय, आशाहीन, जगण्याला अर्थच नसल्यासारखं वाटतं तेव्हा आधार देणारी, प्रेम देणारी माणसं हवी असतात. काहीजण मुळातच अबोल असतात. ते कुणाला काहीच सांगत नाहीत. त्यांच्याशी संवाद साधणं अधिक गरजेचं असतं. मोठा धक्का सहन केलेल्या व्यक्ती एकाकी होत चालल्या असतील, आप्तांशी संवाद करणं टाळत असतील किंवा त्यांच्या बोलण्यातून आपल्याला हतबलता जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. नैराश्यग्रस्त व्यक्ती अनेकदा मदत घेणंही टाळतात. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांवर कधीकधी त्यांच्या मनाविरुध्ददेखील मानसशास्त्रज्ञांशी संपर्क करण्याची वेळ येऊ शकते. तसे वाटले तर मदत घेण्यास मागे हटू नका..
कारण माणसांच्या मनातल्या आशाहीन-होपलेस भावनेचे रूपांतर आत्महत्येच्या विचारांमध्ये होऊ शकते. जगण्यात काहीच आशा नाही, असं वाटू लागल्यास काहीजण त्यादृष्टीने तयारीही करतात. तसं बोलतात किंवा मग आपल्या वस्तूंची वाटणी, इच्छापत्र तयार करतात. त्यांच्या बोलण्यातही हतबलता जाणवते. निराशा असते. हे विचार कोणत्याही कारणानं तीव्र झाल्यास व्यक्ती त्यावर कृती करण्याची शक्यता असते. तो एक क्षण जेव्हा हे विचार खूप तीव्र असतात, तेव्हा आत्महत्येच्या टोकावर अनेकजण पोहोचतात. त्यावेळी जर योग्य मार्गदर्शन, समुपदेशन मिळालं तर पुढचा अनर्थ टळू शकतो.
त्यामुळे कुणी निराश, हतबल असेल, तर ते उडवून लावू नका. इतके लोक कोरोनातून बरे झाले, त्यात काय एवढं हताश होण्यासारखं असं म्हणत दुर्लक्ष करू नका. जगण्याची आस सोडू नका, मदतीचा हात पुढे करा.. बोला..
कोरोनाकाळ सर्वांसाठीच खूप कठीण आहे..मदत मागा..
पण आपली मानसिकता योग्य असल्यास प्रत्येक परिस्थिती स्वीकारुन आपण त्यातून मार्ग काढू शकतो.त्यासाठी काही गोष्टी स्वत:ही करायला हव्या. आणि इतरांना मदत म्हणूनही करायला हव्यात.मोकळं करणं, वेळोवेळी मदत घेणं, सल्ला घेणं, घरच्या मोठ्यांशी चर्चा करणं, मित्र-मैत्रिणींशी बोलून आपल्या अडचणी सांगणं हे सारं करा.
नैराश्याचे किंवा आत्महत्येचे विचार मनात येत असतील, समोर अंधार आहे, असं वाटत असेल तर मानसरोग तज्ज्ञांसह वैद्यकीय मदत घ्या.कुणी निराशेत दिसलं, तर जवळच्या माणसांनीही पुढाकार घेऊन मदत करायला हवी.
(लेखिका मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)iphmindlabnashik@gmail.com