Lokmat Sakhi >Mental Health > काय यार, डोक्याचा चिवडा झाला; असं वाटतं? आज पाडवा, झटकाच मरगळ, हे घ्या उपाय!

काय यार, डोक्याचा चिवडा झाला; असं वाटतं? आज पाडवा, झटकाच मरगळ, हे घ्या उपाय!

दिवाळी आली. घरातली जळमटं काढताना स्वत:ला विचारू की गेली दीड वर्ष आपलं आयुष्य जे निरर्थक घरबंद झालं, त्याचं काय करता येईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2021 10:00 AM2021-11-05T10:00:00+5:302021-11-05T10:00:02+5:30

दिवाळी आली. घरातली जळमटं काढताना स्वत:ला विचारू की गेली दीड वर्ष आपलं आयुष्य जे निरर्थक घरबंद झालं, त्याचं काय करता येईल?

corona, lockdown and boring life, how to get rid of boredom, start new life in this Diwali | काय यार, डोक्याचा चिवडा झाला; असं वाटतं? आज पाडवा, झटकाच मरगळ, हे घ्या उपाय!

काय यार, डोक्याचा चिवडा झाला; असं वाटतं? आज पाडवा, झटकाच मरगळ, हे घ्या उपाय!

Highlightsदिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळी आली. आता नव्यानं उजळून टाकू आपणच आपलं आयुष्य..

प्राची पाठक

कोरोना, लॉकडाऊन, पहिली लाट, दुसरी लाट आणि पुढे येणारी तिसरी लाट... असे सगळे शब्द आपल्या अंगावर धडकून आता जवळपास दीड-पावणेदोन वर्षे झालेली आहेत. तरुण मुलांचं तर जगच बदलून गेलं. कोरोना लाटांमध्ये कोणाच्या नोकऱ्या गेल्यात, कोणाचे पगार कमी झालेत. कुठे जवळची माणसे दगावली आहेत. आर्थिक अडचणी आल्या आहेत. परीक्षा होतील की नाही, झाल्याच तर कधी होतील, कशा होतील, त्या पार पाडून पुढची नोकरी मिळेल की नाही, वगैरे चर्चादेखील झाल्या. त्यावर प्रत्येकाची वेगवेगळी मतं देऊन-घेऊन झाली. जशी चालायची तशी ती सिस्टीम चालली किंवा चालली नाही. त्यावर आपण व्हॉट्सॲप फॉरवर्ड्सपासून ते नेट-टीव्हीवरून सतत कोरोना अपडेट्स घेऊन भरपूर खलदेखील केला. चर्चांचे फड रंगले. फॉरवर्ड्सचा बाजारदेखील भरला. तिसऱ्या लाटेचीही भीती संपलेली नाहीच.. मास्क यापुढे किती दिवस लावायचा, लावायचा की नाही, लस घ्यायची की नाही, कोणती घ्यायची, सगळं बोलून-वाचून-फोनमध्ये ढकलून झालं. घरात राहून राहून एकमेकांचा सहवास एकतर एन्जॉय करून किंवा एकमेकांवर वैतागून नात्यांचे विविध डायमेन्शन्सदेखील समजून घेतले. अगदी सगळं-सगळं पार पडलं...
पण घरबंदीत अडकलेलं, साचलेपण घेऊन थंडावलेलं, कातावलेलं तरुण आयुष्य मात्र जिथं होतं तिथंच आहे.
यात मनाचं काय होतंय नेमकं, ते कळतंय का?

काय झालं नेमकं आपल्या मनाचं?


केवळ चर्चा करून, कोणत्या तरी विचारसरणीच्या दावणीला शंभर टक्के बांधून घेऊन आपलं आयुष्य उभं राहणार आहे का? घरातल्या लोकांवर चिडचिड करून, वैतागून आणि त्यांना चांगलं किंवा वाईट ठरवून आपण मोठे होणार आहोत का? कॉलेजेस कधी सुरू होणार, परीक्षा कशा देणार, त्यापुढे आपल्याला नोकऱ्या लागणार की नाही, आपण एखादा व्यवसाय करायचा का, करायचा तर कसा याबद्दल घरबसल्या मनातच भीती बाळगत आपले प्रश्न सुटणार आहेत का? सगळे प्रश्न आणि सगळ्या समस्या आपल्या मनात आणि आपल्या कल्पनेतच मोठ्या झाल्या आहेत का? मरगळ झटकून कामाला लागण्यात अनेकदा आपण स्वतःच एक फार मोठा अडसर असतो, हे आपल्याला लक्षात येतंय का? हा असं वागला, तिने तसं केलं, माझ्याकडे हे आलं की मी ते करेन, अमुक गोष्ट मला मिळालीच पाहिजे, वगैरे अडथळे कित्येकदा आपणच मोठे केलेले असतात. त्यांना थोडं बाजूला टाकून एक ॲक्शन प्लॅन बनवल्याशिवाय आपल्याला दिशा सापडणारच नाही, हे आधी लक्षात घेऊ. आणि त्यासाठी मरगळ झटकायला हवी; पण ते कसं जमावं?

मरगळ झटकायची म्हणजे नेमकं करायचं काय?

१. कुठून सुरुवात करायची? आपल्या आयुष्यात काहीच समस्या शिल्लक नाहीत, असं म्हणत आपल्या मनाला फसवायचं का? तर तसं नाही.
२. आपल्याला काय करायला आवडेल, हे स्वतःला विचारायचं. अगदी प्रामाणिकपणे. त्यांची एक यादी करायची. या यादीत ताबडतोब करता येतील अशा गोष्टी कोणत्या, ते स्वतःलाच विचारायचं. त्यातलं जे "हे नाही, ते नाही" हे कुरकुर चॅनल असतं, ते पूर्णच स्वीच ऑफ करून ठेवायचं.
३. आपण आता जे काही छोटंसं का होईना करणार आहोत, ते होणारच आहे, ते करायला आपल्याकडे पूर्ण बळ आहे, हे समजूनच ते काम करायला घ्यायचं. भले ते काम अतिशय छोटं का असेना. आपल्याच घरातला एखादा छोटासा कप्पा आवरला की एक काम झाल्याची टिकमार्क करता येते. एखाद्या दिवशी अगदी तीन ते पाच सूर्यनमस्कार घातले तरी आपण थोडासा का होईना व्यायाम सुरू केला, असा दिलासा मिळतो.
४. तसंच करू-करू म्हणत ढकलून दिलेल्या एखाद्या तरी छोट्याशा गोष्टीच्या मागे लागायचं. तिची एक छोटी सक्सेस स्टोरी करायची. आपल्या मनाला त्या सक्सेस स्टोरीची सवय करत जायचं आहे, हे पक्कं लक्षात ठेवायचं.

५. अशाच काही लहान ॲक्टिव्हिटीज, लहान कोर्सेस करत ते पूर्ण केले की एक मस्त टिकमार्क करायचा. आपल्याला या टिकमार्क्समधूनच पुढची सर्व सकारात्मकता आणि ऊर्जा मिळणार आहे, हे पक्कं लक्षात ठेवायचं. घरात साधी भाजी निवडून ठेवली तरी एक टिकमार्क करायची. आपणच दिवसभरात किती कामं नाही-नाही म्हणत पार पाडत असतो, ते आपल्याला कळेल.
६. जे आपण आधीच करत आहोत, त्याचा असा टिकमार्करूपी आनंद घेत जगायला शिकल्याशिवाय मरगळ जाणार नाहीच. त्यात नवीन उर्जेची भर घालायची असेल तर अशाच छोट्या छोट्या पायऱ्या चढत पुढे जावं लागेल. प्रत्येक पायरीवर आनंद, मजा, आव्हान वाढत जाईल, हे मानूनच पुढे जायचं आहे.
तर, कुरकुर बंद करा.
मरगळ झटका आणि कामाला लागा.
दिवाळीच्या शुभेच्छा.
दिवाळी आली. आता नव्यानं उजळून टाकू आपणच आपलं आयुष्य..

(लेखिका मानसशास्त्रासह सूक्ष्मजीवशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक आहेत.)
prachi333@hotmail.com

Web Title: corona, lockdown and boring life, how to get rid of boredom, start new life in this Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.