Join us  

त्याला 'तिचा' आणि तिला 'त्याचा' खूपच राग येतोय..... तुमचंही असंच झालंय का ?

By रुचिका पालोदकर | Published: June 14, 2021 7:30 PM

'तो' आणि 'ती'.... एरवी आपापल्या कामात आपापल्या ऑफिसमध्ये व्यस्त असणारे ते दोघे मागील दिड वर्षापासून वर्क फ्राॅम होमच्या नावाखाली घरात अडकून पडले आहेत. घरूनच ऑफिस आणि कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन यामुळे २४ तास एकमेकांसोबत घालविणे अनेकांना जड जात आहेत. पुर्वी एकमेकांच्या ज्या सवयी लटक्या राग आणणाऱ्या असायच्या, त्या आता संताप आणत आहेत. त्याला 'तिचा' आणि तिला 'त्याचा' खूपच राग येतोय. तुमचंही असंय झालंय का?

ठळक मुद्देमी करेल तेच खरे, अशी सवय काही जणांना असते. अशा व्यक्तीला २४ तास झेलणे आणि कायम तिच्या मनाप्रमाणे वागणे, काही घरांमध्ये भांडणाचे मुळ ठरत आहे. काही घरांमध्ये नवऱ्याचे आई- वडील राहत असल्याने भांडणाला अधिकच खतपाणी मिळत आहे, तर काही घरांमध्ये ज्येष्ठांचा वावर तरूण जोडप्यांमधील तणाव कमी करणारा ठरतो आहे.

ऋचिका सुदामे पालोदकर

कोरोनामुळे अनेकांची जीवनकहाणी पार बदलून गेली आहे. मागची काही वर्षे अशी होती की, नवरा- बायको या दोघांकडेही एकमेकांना देण्यासाठी अजिबातच वेळ नसायचा. यात दोघेही जर नोकरदार असतील, तर विकेंड हाच काय तो एकत्रित घालविण्याचा काळ. पण कोरोना आला आणि जगण्याच्या सगळ्या परिभाषाच बदलून गेल्या. एकमेकांच्या भेटीसाठी आसूसलेली ती दोघे आता वर्क फ्रॉम होमच्या  चौकटीत  घरात अगदी घट्ट  अडकून बसली आहेत. कोरोनाच्या भीतीने तोंड बाहेर काढायलाही जागा उरलेली नाही. त्यामुळे आता हळूहळू त्याला तिचे आणि तिला त्याचे असे २४ तास घरात असणे म्हणजे आपल्या पर्सनल स्पेसवर अतिक्रमण झाल्यासारखे वाटत आहे. कोणतीही लहान-  सहान गोष्ट  खूपच चीड  आणणारी ठरत आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना मानसिक आजार झाले आहेत, तर कित्येकांच्या संसाराची गाडी थेट घटस्फोटापर्यंत जाऊन धडकली आहे. 

 

यातील बहुसंख्य जोडपी ही मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय गटातली आहेत. या क्लासमध्ये असणाऱ्या मंडळींची घरेही फारफार तर टू किंवा थ्री बेडरूम, हॉल आणि किचन. एवढ्याश्या राज्यात नवरा-  बायको, मुले आणि काहींच्या घरात तर आई- वडील असे ५ ते ६ जणं रात्रंदिवस एकत्र राहतात. त्यामुळे पर्सनल स्पेस न मिळून प्रायव्हसीच राहिलेली नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे.

महिलांची चीडचीड का होतेय ?

  •  तो पण ऑफिसचे काम करतो आणि मी पण. मग घरातली सगळी कामे मी एकटीच का करू, असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. आपण घर आणि ऑफिस सगळे सांभाळायचे आणि त्याने मात्र नुसते बसून रहायचे, ही बाब अनेकींना खटकत आहे.
  • मी म्हणते म्हणून तो काम करतो. पण पुरूषप्रधान संस्कृतीमुळे त्याने काम केले की त्याच्या आई- बाबांच्या कपाळावर आठ्या येतात. मग त्याला एवढेच कारण पुरे होते आणि काम टाळायला तो मोकळा होतो.
  • दिवसभर काम करून मुलांनाही काय हवे, काय नको, ते मीच पाहायचे. तो मात्र ऑफिसच्या कामात डोके खूपसून बसणार. असं का?

 

भांडणाची इतर कारणे

  •  आधीच एकमेकांचा राग येतोय आणि त्यात जुनी भांडणं उकरून काढायला पुरेसा वेळही आहे. त्यामुळे मग नव्या भांडणात जुन्या वादांची भर पडते आणि विषय वाढत जातो.
  • कोरोनामुळे कुणाच्या नोकरीवर गदा आली आहे, तर कुणाची मोठ्या प्रमाणावर पगार कपात झाली आहे. अनेकांचे धंदे डबघाईला आले आहेत. त्यामुळे मग आर्थिक चणचण जाणवते  आणि त्याचे रूपांतर  भांडणात होते. 
  • कुणाचा फोन आला, कुणाशी आणि काय बोलणे झाले, किती वेळ बोलला यावर जोडीदार बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे काही जणांना वाटते आणि त्यामुळे ते संतप्त होतात.
  • आपला जोडीदार त्याच्या आई- वडिलांना आपल्या संसारातील अनेक लहान- सहान गोष्टी  सांगतो. त्यामुळे त्यांचा आपल्या संसारातील इंटरफिअर वाढतो आहे, अशी तक्रारही अनेकांची आहे.  
टॅग्स :मानसिक आरोग्यकोरोना वायरस बातम्याघटस्फोट