समिंदरा हर्डीकर-सावंत
समानता, स्त्री पुरुष समानता, नात्यातली समता हे शब्द आपल्या कानावर येतात. आपणही ते बोलतो सतत.
पण समता म्हणजे नक्की काय, हे थोड्या शब्दात सांगणे कठीणच. कोणत्याही परिस्थिती मध्ये आपला
मानसिक तोल सांभाळून ठेवणे, असाच याचा अगदी साधा अर्थ काढता येईल. आता आपला मानसिक
तोल अनेक कारणांमुळे जाऊ शकतो. सध्याची कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेचीच गोष्ट घ्या.तीतरी गोष्टी आपल्या अवती भोवती घडताहेत. आपण सगळे अस्वस्थ होतो. त्यात घरात आहोत. लॉकडाऊन. आजाराचं भय, आजारपणं, आर्थिक विवंचना असं सगळंच आहे. त्यात आपल्या माणसांशी असलेलं आपलं नातं, त्यातली समानता हे सारं कसं जपायचं. नुसती चिडचिड करुन हे प्रश्न सुटणार नाहीत.
अनेकदा आपल्या आसपास असे लोक असतात, जे सतत नकारात्मक, संतापलेले किंवा वैतागलेले
असतात. काहीही आणि कितीही केले, तरी त्यांचे समाधान होत नाही. त्यांची सतत तक्रार असते -
जगाशी, आपल्याशी, परिस्थितीशी! मग बऱ्याचदा आपणही त्यांच्या हा नकारात्मकतेला बळी पडतो.
आपणही उत्तेजित होतो, चिडतो, वैतागतो, विचलित होतो. त्या भावनेतून बाहेर पडायला वेळ लागतो.
मग अशा वेळी आपल्याला काय करता येईल? जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर त्यांची नकारात्मकता
अक्षरशः लादत असेल, तेव्हा आपण स्वतःला त्या माऱ्यापासून कसे काय सुरक्षित ठेवू शकतो?
हे करुन पहा
१. तुम्ही रिॲक्ट करताय की रिस्पॉण्ड?
समोरच्या व्यक्तीच्या वर्तनाला, शब्दांना, देहबोलीला किंवा भावनिकतेला प्रतिक्रिया देत आहात हे
स्वीकारा. आपल्या स्वतःच्या भावनांची जवाबदारी घ्या. “त्याने मला उदास केले” असे म्हणण्याऐवजी
स्वतःला सांगा, “त्याच्या बोलण्याने मी निराश झालो.” समोरच्या व्यक्तीच्या भावनिक विश्वात
आपण स्वतःला गुरफटवून घेतले आहे, हे ओळखा.
2.दीर्घ श्वास घ्या!
दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा आणि भावना तुमच्या शरीरात सहजतेने वाहू द्या. योग, ध्यान,
विपश्यना, माइंडफुलनेस यासारख्या कोणत्याही औपचारिक श्वासोच्छवासाबद्दल परिचित असल्यास
त्यास प्राधान्य द्या. नसल्यास, फक्त आपले डोळे बंद करा आणि सखोल श्वास घ्या. उश्वास घेताना
शांततेच्या भावनांना आपल्या शरीरात प्रवेष द्या; निःश्वास सोडताना नकारात्मक भावनांना
शरीराबाहेर जाण्याची परवानगी द्या. कमीतकमी ७ वेळा हे करा आणि नंतर आपल्याला कसे वाटते ते
पडताळून पहा. जोपर्यंत आपल्यात उत्पन्न झालेल्या अप्रिय भावनांचा व्यय होत नाही, तोपर्यंत हे
श्वास घेण्याचे कार्य ७ च्या चक्रात करत रहा.
माफ करा..
इतर व्यक्तीने जसे वागले त्याबद्दल क्षमा करा. त्याची वैयक्तिक लढाई काय आहे, आणि तो
कोणत्या दृष्टिकोनातून कार्य करीत आहे, हे आपल्याला माहित नाही. त्याच्या किंवा तिच्याविषयी
विकसित केलेल्या सर्व नकारात्मक भावनांसाठी स्वतःला देखील क्षमा करा. आपण स्वतः परफेक्ट
नाही, आपण नकारात्मकतेसह प्रतिक्रिया देत आहात हे स्वीकारा. क्षमाशीलतेचा सराव करण्याचे बरेच
सुंदर मार्ग आहेत. होओपोनोपोनो ही अशी एक सोपी आणि सुंदर प्रथा आहे. क्षमतेचे सराव करण्याचे हे
प्राचीन हवाईयन तंत्र आहे. तसेच विपश्यना मध्ये सुद्धा, इतरांपर्यंत मेत्ता, किंवा मैत्रीची लाट कशी
पोहोचवावी, हे शिकवते. काहीच नसल्यास, आपल्या जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी
विश्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही क्षण घालवणे हे देखील आपल्याला अधिक क्षमाशील
बनवू शकते.
कामाला लागा.
शेवटी, त्या भावनिक क्षेत्रापासून स्वत: ला बाहेर काढण्यासाठी ठोस प्रयत्न करा. काहीतरी विधायक
आणि सकारात्मक काम हाताशी घ्या. काही काळापासून प्रलंबित असलेल्या एखाद्या कार्यावर प्रारंभ
करा - अगदी घर स्वच्छ करणे, कपाट लावणे, हिशोब करणे, यासारखे किरकोळ काम असले तरीही
हरकत नाही! आपल्या मनाला अशा कार्यांमध्ये गुंतवून घ्या ज्यासाठी खरोखर आपली उर्जा आवश्यक
आहे; याने आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या विचारींकडे आपली ऊर्जा पोहोचू शकणार नाही.
थोडक्यात म्हणजे, इतर लोकांच्या वैय्यक्तिक भावनिक उत्तर चढावांमुळे आपल्याला स्वतःला
विचलित करण्याची अजिबात गरज नाही. आपण आपल्याला त्यापासून कसे वंचित ठेवतो, हे पूर्णपणे
आपल्यावर अवलंबून आहे. दुसरे जर माईंड-गेम्स खेळत असतील, तर त्यात आपल्याला सहभागी
होण्याची गरज नाही. आपले अंतर्गत संतुलन, आपली समता, आणि आपल्या मन:शांतीचा केंद्रबिंदू
आपल्या नियंत्रणात आहे, याचे सतत भान ठेवावे. आपली मानसिक शांती ही आपली प्राथमिकता आहे. नात्यात समतेचा शोध हा सतत चालू राहणारा एक न संपणारा प्रवास आहे!
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ञ असून
दिशा समुपदेशन केंद्रच्याा सह-संस्थापक संचालक आहेत.)
samindara@dishaforu.com |
www.dishaforu.com