संयोगिता ढमढेरे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा जवळजवळ प्रत्येक घरानं अनुभवला. लॉकडाऊन, शारीरीक अंतर राखण्याच्या नियमामुळे व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनातही अनेक बदल घडवावे लागले. प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष आर्थिक आणि सामजिक परिणाम सर्वानाच सोसावे लागत आहेत. अनेकांचे रोजगार गेले, त्यातून आलेली निराशा आणि ढासळळेले मनस्वास्थ्य, त्यातही महिलांचे मानसिक प्रश्न, ताण हे सारे मोठे आहेत असं आय कॉल हेल्पलाईनच्या माजी समुपदेशक तनुजा बाबरे सांगतात.कोरोना झाला किंवा नाही झाला तरी जगण्यावर त्याचे परिणाम झालेच. वर्तमानातलंच जगणं बदललं असं नाही तर भविष्याचं नियोजन बदलावं लागणं किंवा गृहितकं बदलणं यामुळे झालेली हानी त्यामुळेआयुष्यात खूप नैराश्य आलं आहे. जगताना वेगळं काही अपेक्षित होतं आणि घडलं मात्र भलतंच. बरीच निराशा, दु:ख आणि सर्वत्र औदासिन्य आलं. हा प्रश्न फक्त करिअरशी संबंधित नाही तर मानसिक पातळीवर असुरक्षितता येते. पगारवाढ, बोनस मिळत नाही, आर्थिक परिस्थिती बदलते, अनेक इएमआय कसे भरणार याची चिंता आहे, आर्थिक नियोजन गडगडले यामुळेही वाढलेले ताण मोठे आहे.
तनूजा म्हणतात, आमच्या हेल्पलाइनवर हे सारं लोक फोन करुन सांगतात, तेव्हा त्यांची आर्थिक स्थिती, त्यातून निर्माण झाले प्रश्न, मनावरचे ताण यांची कल्पना येते. शहरात काम करणारे आपल्या गावी परत गेल्याने त्यांचा रोजगार गेला आहे. त्यांना घरातली भांडी, गुरं विकून गुजराण करावी लागली आहे. महिला त्यातही घर चालवणाऱ्या एकल महिला असाल तर रोजगाराचे प्रश्न अधिक गंभीर आहेत. काही टोकाच्या उदाहरणांमध्ये जास्त चिंता करणारे लोक नोकरी जाण्याचा धसका घेतल्याने हतबल होतात आणि आत्महत्या करण्याचं पाऊल उचलतात किंवा स्वत:ला हानी करून घेतात.१. नोकरी गेल्याने अनेक लोकांना नैराश्य आलंय, अस्वस्थ वाटतंय, घरात नातेसंबंध ताणले गेले आहेत असं आढळत. २. अगोदरच असहाय असलेले लोक, आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेले किंवा मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या व्यक्ती याच्यावर त्याचा आणखी तीव्र परिणाम झाला आहे.३. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर पण या अनिश्चिततेचे परिणाम झाले आहेत अशा अनेक विद्यार्थ्यांचे हेल्पलाईनला फोन येतात. मी गेले एक वर्ष शिकते आहे पण या ऑनलाईन कोर्समधून मी नक्की काय शिकले आणि याचं माझ्या बायो डेटामध्ये काय स्थान असणार आहे? या शिक्षणाचा मला नोकरी मिळण्यासाठी किती उपयोग होणार आहे? ही भीती अनाठायी नाही आहे. खरंच नोकरी मिळणार आहे का? किंवा मिळाली तर ती करण्यासाठी त्यांची तयारी झाली आहे का? त्यामुळे त्याच्या आशा, त्यांची स्वप्न, एक विशिष्ट शिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांचं आयुष्य बदलण्याची शाश्वती नाही आहे. खूप जास्त अनिश्चितता असल्याने त्याचा शिकण्याचा उत्साह कमी झाला आहे मन लागत नाही. प्रत्यक्ष शिक्षण होत नसल्याने विषय समजण्यात अडचण येतेय, शिक्षक, वर्गमित्र यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क नसल्याने दुरावा आलेला आहे.
असे प्रश्न सोडवताना, नैराश्य आलं असेल तर आपण एकटेच आहोत असं समजू नका. कौन्सिलिंग करुन घ्या, मदत घ्या, बोला. निराशेत कुढत जगणं हा काही तोडगा होवू शकत नाही.४. आयकॉल ही एक सर्व वय, भाषा, लिंग, लैंगिकतेच्या व्यक्तींच्या भावनिक आणि मानसिक प्रश्नावर फोन आणि इमेलवरून मोफत समुपदेशन देणारी टाटा सामाजिक शास्त्र संस्था (टीस)ची सेवा आहे. ९१५२९८७८२१ या क्रमांकावर सोमवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ८ पर्यंत ही सेवा उपलब्ध आहे.