प्राची पाठक
कोरोनाच्या आधी आपण एकमेकांना चटकन भेटू शकत होतो. मास्क लावणं, देहदूरीवगैरे प्रकार तेंव्हा नव्हते. तसे दिवस आता आणखीन किती काळाने येतील माहित नाही. आपल्या जुन्या भेटीगाठीत एक गोष्ट आवर्जून असायची. ती म्हणजे मन मोकळं करायला प्रत्यक्ष कुठे जाऊन, समोरासमोर बसून मनातलं काही सांगायची सोय. खासकरून स्त्रिया त्यांच्या हक्काच्या जागांशिवाय मनातलं काहीच चटकन कुठे बोलत नाहीत. त्यांचा एक कम्फर्ट झोन तयार झालेला असतो. त्याच्या पलीकडे नवीन आधार शोधून तिथे मन मोकळं करायची त्यांना सवय नसते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण मनातलं काही बोलून गेलो, तर दुसरी व्यक्ती ते कसं बघेल, याची त्यांना फार भीती असते. शंका असते. दुसऱ्याला आपलं दुःख, आपली परिस्थिती समजेल की नाही, ती महत्वाची वाटेल की नाही, अशी शंका. त्यापलीकडची गोष्ट म्हणजे आपली परिस्थिती समजून उमजून आपल्याला काही आधार मिळणार की नाही? की नुसतंच मन हलकं करायची एक हक्कची जागा असंच त्याचं स्वरूप असणार आहे? हे सगळे प्रश्न मनात येत असतातच. त्याचवेळी आपण म्हणतो, आपल्याला नको कोणाची मदत. किमान आपलं दुःखं, आपली परिस्थिती ऐकून घेणारं तरी कोणी असावं हक्काचं.
जे घरात सांगता येत नाही, त्याचे भलतेच अर्थ काढले जातील अशी शंका असते, असं खूप काही बोलायला अनेक स्त्रियांना एक सेफ झोन हवा असतो. पूर्वी आपण चटकन उठून जरावेळ आपल्या हक्काच्या ठिकाणी जाऊन येऊ शकत होतो. त्यात कोणी भाऊ, बहीण असेल. आईवडील असतील. समवयीन मैत्रीण असेल एखादी. कोणी ऑफिसमधले सहकारी, मित्रमैत्रीण असेल. कोणी सहजच झालेल्या ओळखीतून जवळ आलेलं असेल. स्त्रियांच्या अशा अनेक हक्काच्या शेअरिंगच्या जागा होत्या. त्यांना भेटून बोलायची सोय होती.
आता कोरोना काळात घरातच डांबलं गेल्याने काय झालं..?
आपण फोनवर कितीही बोललो तरी आपल्याला प्रायव्हसी मिळेल की नाही, अशी शंका असते. आपण जे बोलत आहोत, ते घरातल्या लोकांसमोर कदाचित आपल्याला बोलायचं नसेल. पण घराबाहेर पडायची तर सोय नाही. पुन्हा, समोरची व्यक्ती जिच्याशी तुम्ही बोलायचा प्रयत्न करत असतात, ती देखील एकटी असेलच असं नाही. आपल्याला त्या व्यक्तीच्या घरातल्या लोकांपर्यंत आपली सुखदुःखं जावीत असं वाटत नसतं. पुन्हा पंचाईत होते. बोलायचं कधी, कुठे, किती वेळ आणि कसं?! भेटणं तर इतकं सोपं नाही. ह्या गडबडीत कधी आपलं मोबाईलला खिळून राहणं वाढत जातं, ते आपलं आपल्यालाच कळत नाही. कोरोना काळात लोकांचा स्क्रीन टाइम कैक पटीने वाढला आहे. त्याचे बरेवाईट परिणाम होणार आहेत, ते वेगळंच.एरवी आपण अमुक वेळेला झोपत असू, कोरोना काळात घरातच जास्त थांबल्याने रात्रीच तर जरा उसंत मिळते म्हणत आपण रात्री जागून कोणाशी बोलू पाहतो. घरातलं सगळं हवं नको पाहून झालेलं असतं. रात्रीच उशिरा जरा निवांतपणा मिळतो म्हणत अनेक जणी रात्री जागवत आपलं मन कोणाशी तरी मोकळं करायचा एक हक्काचा कोपरा शोधू बघतात. म्हणजे, दिवसभर मिळेल ती घरकामातली मदत घेऊन, न घेऊन आपला ताण संपत नाही, तर मन मोकळं करायच्या नादात रात्री जागणं सुरु होतं.कोणाकडे प्रत्यक्ष जायचं असेल, तर आपण त्यांची सोयीची वेळ विचारून घेतो. आपली देखील काही तयारी, प्लॅनिंग करतो. आवरून सावरून पाच सात गोष्टींचं भान ठेवत आपण उठून कुठे? जातो. मनातलं बोलण्यासाठी जायचं असेल, तर जरा जास्तच खबरदारी घेतो. आपला वेळ मर्यादित असतो. फोनवर बोलणं मात्र असं नसतं. आपल्याला घरातच बसून बोलायचं असतं. घरीच तर आहे, म्हणत आपण आणि समोरची व्यक्ती अगदी कधीही उपलब्ध आहे, असा आपला एक सहजभाव होऊन जातो. कोणाकडे जातांना जितकं काळवेळाचं भान आपण ठेवतो, तितकं घरातच बसून फोनवर बोलण्यासाठी ठेवावं लागत नाही. त्यात आपण बरे कपडे घालून तयार वगैरे होऊन जाण्याची सुद्धा अट नसतेच.
त्यामुळे, कोणतीही विशेष अशी बंधनं नसलेलं, "ऑल ऑप्शन्स आर ओपन" अशी ही अवस्था असते. तिच्यात वेळकाळाचं भान राखणं, शिस्त आणणं हे जास्त अवघड असतं. आपले मेसेज समोरच्याने पाहिले की नाही आणि किती वेळाने पाहून त्याला उत्तर दिलं, त्यावरून त्याला जज करणं वगैरे देखील आपण घरबसल्या करू लागतो. म्हणजे, आपल्याच मनात उगाच गैरसमज सुरु होतात. आधीचं निखळ नातं कलुषित व्हायला लागतं. त्याचवेळी सोशल मीडियावर संवाद साधू पाहणारे अनेक ऑप्शन्स आपल्याला दिसायला लागतात. "तू नहीं तो और सही", असे विचार मनात येतात. एक आधार सोडून आणखीन कुठेतरी नव्याने आधार शोधायला आपल्याला संधी मिळते. तिकडे घट्ट मैत्री होतेय का, अशी चाचपणी आपण करायला लागतो. अशा सगळ्या गिमिक्समधून आपण धड सेटल होत नाही, तोवर इतर काही प्रश्न प्रत्यक्ष आयुष्यात आ वासून उभे राहतातच. मनाचं काय, बघू नंतर असं करत साधं मोकळेपणी बोलण्यासाठी देखील आपण इतके अडथळे पार करत असतो. काही स्वनिर्मित असतात, तर काही परिस्थितीजन्य. अशा सगळ्यातून त्या मनाला वाट मिळणार कधी? कुठे?म्हणूनच शरीर दुखलं की जितकं चटकन आपण? ते असेल त्याच्याशी बोलून त्यातून मदत घेऊन मार्ग काढतो, तसंच मनाचं देखील केलं पाहिजे. मदत घ्यायला अजिबात संकोच करता कामा नये. आपल्या घरातच आपल्यासाठी काही सपोर्ट सिस्टीम उभी राहतेय का, ते बघायला हवं. त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे, आपल्या मनातल्या अनेक शंका कुशंकांना आपणच जास्त खतपाणी घालत असतो, हे समजून घेणं. याने असं केलं म्हणून तसं झालं, ही रडकी टेप किती दिवस वाजवणार आपण? आपण काय केलं, म्हणून अमुक झालं, अशी आपली आणि आपल्या मनाची देखील जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे. कोरोना काळात जो वेळ आपल्या हाताशी आहे, त्यातून आपणच आपले आधार कसे बनू शकतो, ह्यावर विचार करायला ही उत्तम संधी आहे. प्रयत्न तर करा. जमेल..
(लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)prachi333@hotmail.com