Join us  

आईबाबा म्हणायला घरात पण सतत Work from home, घरात डांबलेली मुलं चिडचिडी; यावर उपाय काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 2:18 PM

मुलं घरीच, पालक वर्क फ्रॉम होम, घरातली कामं संपत नाहीत, मुलं कंटाळतात, चिडचिडतात, त्यांना कसं रमवायचं? काय केलं तर मुलं आनंदी होतील.   

ठळक मुद्देआनंदाच्या बिया पेरून ठेवूया. आणि फुला फळांची वाट बघूया!

-डॉ.श्रुती पानसे

आपल्या आसपास जेव्हा खूप वाईट परिस्थिती असते तेव्हा पण एक गोष्ट नक्की करू शकतो ते म्हणजे पुढे घडणाऱ्या काही गोष्टींची बेगमी करू शकतो. तसंच कदाचित आपल्याला आता करायचं आहे. यापूर्वी कधीही कल्पनासुद्धा केली नव्हती अशा परिस्थितीला आपल्या सर्वांनाच सध्या तोंड द्यावं लागतं आहे. आत्तापर्यंत खेळ, अभ्यास, मजा, फिरणं या सगळ्या गोष्टी मुलांच्या आयुष्याचा एक भाग होत्या आणि आता अचानकच गेल्या वर्षभरापासून ही सगळी परिस्थिती बदलली आहे. या सगळ्याचा बरा-वाईट परिणाम प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावर, विचारांवर होताना दिसतो आहे. अगदी थोड्या काळापुरती ही परिस्थिती असेल असं वाटत असतानाच उलट ती जास्त बिकट आणि अधिक गंभीर होताना दिसते आहे. हा प्रश्न फक्त तुमच्या माझ्या पुरता मर्यादित नाही . जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था देखील यावर उपाय शोधू बघतायेत.सध्या ज्या काही समस्या निर्माण होत आहेत त्या या दोन्ही गटांमध्ये होतात. त्यातल्या त्यात जो प्रौढ लोकांचा गट आहे, पालकांचा गट आहे, त्यांच्या आयुष्यातल्या समस्या फार वेगळ्या आहेत. ताणही जास्त आणि विविध प्रकारचा आहे. यामध्ये प्रामुख्यानं आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत. एकमेकांशी चोवीस तास जुळवून घेण्यासारख्या नव्यानेच निर्माण झालेल्या समस्या देखील आहेत. या सगळ्यातून लहान मुलांसाठी काही करणं, पूर्ण उर्जेसह आनंदात चोवीस तास त्यांच्याबरोबर वेळ घालवणं ही गोष्ट अवघड होत चालली आहे हे नाकारता येणार नाही. आपल्या लहान मुलांबद्दल कितीही काळजी असली ,त्यांच्या मेंदू विकासाबद्दल, भावनिक विकासाबद्दल आस्था असली तरीसुद्धा मुलांच्या अफाट ऊर्जेसह त्यांच्याशी सतत खेळत राहणं, वेगवेगळे उपक्रम करत राहणं ही गोष्ट निश्चितपणे अवघड आहे हे नाकारून चालणार नाही. पण यातूनही मार्ग तर काढावाच लागेल.

काय होऊ शकतं, काय करता येईल?

१. मुलांना बरोबर घेऊन जर दिनक्रम आखला तर गोष्टी थोड्या सोप्या होतील. उदाहरणार्थ मुलांसाठी स्वतः काही खेळ किंवा ॲक्टिव्हिटीज काढण्यापेक्षा मुलांनाच तो दिनक्रम आखू द्यावा . काय करूया, असं त्यांना विचारलं तर मुलं किती तरी गोष्टी आपणहून सुचवतील.२. स्वयंपाक करणं, स्वयंपाकाशी निगडीत छोट्या-छोट्या गोष्टी करणं, घराची स्वच्छता करणं, अशा सर्व गोष्टी म्हणजे खेळ आणि ॲक्टिव्हिटीज आहेत असा आपला दृष्टिकोन बदलला तर प्रत्येक वेळेला मुलांशी सारखं काय खेळायचं हा प्रश्न थोडा कमी होईल. डाळी वेगवेगळ्या करणं, भाज्या निवडणं, कपड्यांच्या घड्या घालून ठेवणं अशा वरवर क्षुल्लक दिसणाऱ्या कामातून देखील स्नायुंचा विकास होणं, एकाग्रता वाढणं, हे घडून येत.३. या सर्व कामांची ॲक्टिव्हिटी स्वरूपात मांडणी केली तर त्यातली मजा नक्की वाढेल. मुलांशी कोणताही खेळ खेळताना किंवा कोणतीही गोष्ट करताना त्यांच्या पंचेंद्रियांना खाद्य कसं मिळेल हे जर पाहिलं तर मुलांचा वेळही चांगला जाईल आणि त्यातून ठोस गोष्टी घडतील. जे काही तुम्ही कराल त्यातून मुलांचा मेंदू विकास आणि भावनिक विकास नक्कीच चांगल्या पद्धतीनं होईल.४. अर्थातच तुमच्या घरामध्ये मुलांचा जो काही वयोगट आहे तो लक्षात घेऊन खालील प्रमाणे वर्गीकरण करता येईल. दोन ते सहा वर्षातली मुलं घरातलं काम करण्यासाठी अतिशय उत्सुक असतात असं दिसून येतं. त्यामुळे त्यांच्यासाठी दिनक्रम आखणं तुलनेनं सोप्पं आहे . घरातल्या सर्व कामात त्यांना घ्यायचं हा एकच नियम आहे.५. सहा वर्षाच्या पुढच्या मुलांना ज्यांना आता लेखन-वाचन येत आहे अशांसाठी रोज एक पत्रं - रोज एक चित्रं असा उपक्रम राबवायला हरकत नाही. मुलांनी रोज कोणाही एकाला पत्रं लिहायचं. हा माणूस घरातले, नातेवाईक, मित्र असे कोणीही असतील किंवा आपले डॉक्टर्स, पोलीस, दुकानदार, असे कोणीही असू शकतील. अगदी सध्या हयात नसलेल्या पण मुलांच्या आवडत्या अशा व्यक्तींनाही त्यांना पत्र लिहू द्यावी. त्यातून मुलांची कल्पनाशक्ती , शब्दसंग्रह वाढणं, मुलांचा जगातल्या लोकांशी कनेक्ट राहाणं, कोणाला पत्र लिहीत आहेत याच्यावरून मुलांच्या भावविश्वात सध्या काय चालू आहे याचा अंदाजही आपल्याला येईल.६. याशिवाय रोज एक चित्रं काढायचं ही सुद्धा एक फार छान ॲक्टिव्हिटी होऊ शकेल. हे चित्र कागदावर रंगानं काढा किंवा कापडावर एखाद्या रद्दी कागदावर, टेबलवर, कपाटाच्या दारावर, घराच्या दारावर ,कुंडीवर, कशावरही काढण्याचा आनंद मुलांना लुटू द्या. आनंदाच्या बिया पेरून ठेवूया. आणि फुला फळांची वाट बघूया!

( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधक आहेत)ishruti2@gmail.com

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामानसिक आरोग्य