प्राची पाठक
साधं आईस्क्रीमचं उदाहरण घ्या. कधी आपल्याला हवे ते मिळत नाही, पण दुसरे कुठले तरी सहज मिळत असते. एरवी जे आपण चाखले नसते, ते आपण तेंव्हा ट्राय करून बघतो. ते ही काही वाईट नाही किंवा "छे, आपले आधीचेच बरे होते", अशी जाण घेऊन आपण परततो. कधी आपल्याला हवं तेव्हा नाही म्हणजे नाहीच मिळत आईस्क्रीम. मग आपण काढतो मनाची समजूत. चिडतो. वैतागतो. पण नाही मिळत तर नाही हे मान्य करतो.
म्हणजेच काय तर नकार-नसणे आणि कशाचा अभाव आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकवतो. हे नाही बाबा, तर मग काय उपाय? असे मार्ग काढायला शिकवतो. आपल्या आजूबाजूच्या वातावरणात काय वैविध्य आहे, ते आपसुखच बघायची संधी ह्या "नसण्याने" आपल्याला मिळते. सगळेच जर सहजसाध्य असते, तर एरवी आपण एखाद्या गोष्टीची उपलब्धता, तिचे असणे गृहीत धरून टाकतो. पण एक नकार, एक अभाव, नाकारलं जाणं आपल्याला बरंच काही सहजच शिकवून जाऊ शकतं.
आपली होकार-असणे गृहीत धरायची सवय इतकी अंगी मुरते हळूहळू की अभाव-नसणे- नकार आपल्याला मिळूच कसे शकतात, इथेच गाडी अडकते. आपल्याकडे काय काय आहे, ते आपण ह्या गृहीत धरण्याने सहज विसरून जाऊ शकतो. दहातल्या आठ वेळी आपल्याला आईस्क्रीम अगदी सहज मिळालेले असते. एका वेळी जरा जास्त फिरून मिळते आणि एखाद्याच वेळी अजिबात मिळत नाही. साधारण असेच सत्य असायची शक्यता जास्त असते. पण एखाद्याच वेळी एखादी गोष्ट सहज न मिळणे आपल्या मेंदूत जास्तच फिट होऊन जाते. तो अनुभव सतत आठवणीत वर येतो. कधी कधी मनात खूपच जागा व्यापून बसतो. अरे, आठ वेळा चटकन मिळाली ही गोष्ट, हे कोपऱ्यात इवलेसे होऊन बसते! पण एकदा न मिळणे सगळे मन व्यापून टाकते.
हे आपण मुद्दाम देखील करत नसतो. मेंदूचा केमिकल लोचाच असतो तो, नसलेल्याला प्राधान्य द्यायचा. पण आपण त्यावर मात करू शकतो. जुळवून घेऊन, नकार स्वीकारून. हा टप्पा जितका पटकन पार पडेल, तितकं नवं काही चटकन गवसेल. गाडी एकाच जागी थांबून राहणार नाही. वह चल पडेगी. नकारासोबत येणारा स्ट्रेस, भीती, नैराश्य ह्यांच्याशी चार हात करायची दिशा मिळू शकते.
हे सगळे तरी एखाद्या वस्तूच्या उपलब्धतेबद्दल आहे. ती वस्तू काही तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचत नाहीये. पण हीच वस्तू चालती बोलती व्यक्ती असेल, तर ह्याच नकाराला शेकडो वेगवेगळे पैलू जोडले जातात. केवळ असणे, नसणे ह्यावर ते अवलंबून राहत नाही. त्याही व्यक्तीचा चॉईस, समज, परिस्थिती तिथे लक्षात घ्यावी लागते. त्यातले सगळेच बारकावे आपल्याला माहीत असतात असेही नाही. म्हणूनच कोणी एखाद्याने आपल्याला नाही म्हणणे, नाकारणे आपले मन नुसते व्यापून टाकत नाही, तर सगळा मनाचा ताबा घेऊन टाकते. हवालदिल करते. कधी सूड उगवायला बघते. कधी नैराश्यात लोटते. कधी तणाव निर्माण करते. कधी अशाच सर्व मिळत्या जुळत्या गोष्टींची मनात भीती बसते. नव्याने काही बघता येत नाही. मनात तीच टेप रिपीट मोडला सुरू राहते. काय करावे ते तर सुचत नाहीच, पण कुणाशी बोलावे, ते ही कळत नाही. कुठे बोलू आणि कोण कसे अर्थ काढेल, ते ही कळत नाही. तुटून जायला होते.
एक नकार आपल्याला बरंच काही देऊ शकतो, फक्त अट एकच की, आपण त्या नकाराला प्रतिसाद कसा देतो.
कसं स्वीकारतो वास्तव. नकार म्हणजे कायमचा पूर्णविराम नव्हे. नकाराचा स्वीकार आणि त्यावर दिलेला प्रतिसाद यात माणसांची आयुष्य घडवण्याची ताकद असते.
( लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)