Join us  

डिप्रेशन आलंय, त्यावर उपाय लाफिंग गॅस, हसू येणारं औषध देऊन खरंच नैराश्य पळेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 2:03 PM

डिप्रेशन अनेकांना छळतं आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करणं त्याविषयी न बोलणं, लपवणं यातच इतका वेळ जातो की आपण उत्तम मानसिक आरोग्य कमवावं याकडे लक्षच जात नाही. त्यावर उपाय काय?

ठळक मुद्देनैराश्य, चिंता, काळजी या गोष्टी फक्त मोठ्यांनाच नाही, तर लहान मुलंही याबाबतीत तितकीच संवेदनशील असतात यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे.

कंटाळा येणं, डाऊन वाटणं, काहीच न करावंसं वाटणं, बसून किंवा झोपून राहावंसं वाटणं, कोणाशीच काहीच बोलू नये असं वाटणं, मूड नसणं... असं फिलिंग आपल्याला कधी ना कधी येतंच. कोणीच त्याला अपवाद नाही. संशोधन तर असं सांगतं, कधीच निराश न वाटलेला माणूस जगात सापडणं मुश्कील आहे. कारण अगदी लहान बाळांमध्येही अशा भावनांचं सावट येतं. पण याचं प्रमाण वाढलं, वारंवार असं वाटायला लागलं की तो धोक्याचा इशारा असतो. आजच्या घडीला जगात कोट्यवधी लोक नैराश्यानं, डिप्रेशनमुळे ग्रस्त आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातही महिलांच्या मानसिक आरोग्याकडे तर सर्रास दुर्लक्ष होतं. ते महिला स्वत:ही करतात, आणि मला काय होतंय म्हणत आजार दडवतात. पण नैराश्य हा जगात सर्वात वेगानं पसरणारा हा आजार आहे. बऱ्याचदा त्या व्यक्तीची मानसिकताच याला कारण असते. नैराश्य हा किचकट आजार मानला जातो. त्यावरचे उपचारही दीर्घ असतात. तुमचं नैराश्य कुठल्या पातळीवर आहे, त्यावर ते अवलंबून असतं. पण या आजारावर संशोधकांना नुकताच एक प्रभावी उपचार सापडला आहे. नायट्रस ऑक्साईड; जो ‘लाफिंग गॅस’ म्हणूनही ओळखला जातो. हा गॅस कमी मात्रेत जर रुग्णाला हुंगवला तर त्याचं डिप्रेशन कमी होऊ शकतं, असा हा महत्त्वपूर्ण शोध आहे. 

नायट्रस ऑक्साईड हा वायू मुख्यत: दातांच्या दवाखान्यात, तोंडाचे आजार झालेल्या रुग्णांना भूल देताना वापरला जातो. तसेच रुग्णाचे ऑपरेशन झाल्यानंतर वेदनाशामक म्हणूनही या गॅसचा उपयोग केला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून संशोधक ‘औषध’ म्हणूनही त्याचा वापर करत आहेत. आता डिप्रेशनवरही तो गुणकारी सिद्ध झाला आहे. सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला असून प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक ‘सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन’मध्ये नुकताच तो प्रसिद्ध झाला आहे. या संशोधनावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अधिक मोठ्या प्रमाणात ट्रायलही घेतली जाणार आहे. रुग्णाला दोन आठवडे नायट्रस ऑक्साईड हा गॅस अल्प मात्रेत हुंगवला तर डिप्रेशनच्या रुग्णांमध्ये चांगली सुधारणा दिसून येते, इतकंच काय, दीर्घ काळापासून हा आजार असलेले रुग्ण; ज्यांच्यावर चिंताप्रतिरोधक औषधांचाही फारसा परिणाम होत नाही, त्यांनाही हा गॅस गुणकारी ठरेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे.या संशोधनात भाग घेतलेले एक संशोधक आणि भूलतज्ज्ञ पीटर नागेले सांगतात, या अभ्यासासाठी नैराश्याचा आजार असलेल्या काही रुग्णांना सुमारे एक तास हा लाफिंग गॅस हुंगवण्यात आला. त्यात दोन गट करण्यात आले. या चाचणीदरम्यान एका गटाला साधारण २५ टक्के तर दुसऱ्या गटाला ५० टक्के कॉन्सन्ट्रेशन असलेला गॅस हुंगवण्यात आला. ज्यांना कमी मात्रेचा गॅस हुंगवण्यात आला, त्या रुग्णांना हा उपाय अधिक उपयुक्त असल्याचं दिसून आलं. इतकंच नाही, रुग्णांवर इतर नेहमीच्या औषधांचे जे दुष्परिणाम किंवा साइड इफेक्ट‌्स दिसून येतात, तेही अत्यंत कमी प्रमाणात आढळून आले. त्यामुळे यावर आता अधिक संशोधन करून ते व्यापक प्रमाणावर वापरलं जाणार आहे. नैराश्यानं त्रस्त असलेल्या रुग्णांना यामुळे मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. नैराश्यानं त्रस्त असलेल्या लोकांचं प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अगदी लहान मुलांवरही त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. महत्त्वाचं म्हणजे वृद्ध, वयस्क, पुरुष, स्त्रिया, तरुण, किशोरवयीन मुलं आणि अगदी लहान मुलं यांच्यावर नैराश्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम दिसून येतात. उदाहरणार्थ महिलांमध्ये चिडचिड, चिंता, मूड स्विंग होणं, थकवा, मोठ्या प्रमाणावर नकारात्मक विचार मनात येणं असे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तर पुरुषांमध्ये तीव्र संताप येणं, कौटुंबिक आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या टाळणं, धोकादायक कृत्य करणं, कुटुंबापासून आणि समाजापासून दूर जाणं, त्यांच्यात न मिसळणं, एकटं राहाणं अशी लक्षणं दिसून येतात. 

अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या मते अमेरिकेत सुमारे दहा टक्के पुरुषांमध्ये डिप्रेशन आढळून येतं. त्यात अतिरिक्त दारू पिण्यामुळे येणाऱ्या नैराश्याचं प्रमाण अधिक आहे. महिलांमध्ये मात्र अशा प्रकारचं डिप्रेशन कमी प्रमाणात आहे. सेंट्रल ऑफ डिसिज कंट्रोल या संस्थेच्या मते टिनेजर्स म्हणजे १३ ते १९ वर्षांपर्यंतची मुलं आणि त्यांच्यापेक्षाही लहान असलेली मुलं यांच्यातही डिप्रेशनचं प्रमाण वाढतं आहे. हे प्रमाण जवळपास चार टक्क्यांच्या आसपास आहे. नैराश्य, चिंता, काळजी या गोष्टी फक्त मोठ्यांनाच नाही, तर लहान मुलंही याबाबतीत तितकीच संवेदनशील असतात यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. १५ टक्के रुग्णांवर औषध निरुपयोगीया अभ्यासात भाग घेतलेले आणखी एक संशोधक चार्लस कॉनवे सांगतात, नैराश्यावर प्रभावी उपचार उपलब्ध असले तरी जवळपास १५ टक्के रुग्णांवर चिंताशामक औषधांचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जगणं त्यांना अवघड होतं. त्यांच्यावर औषधांचा परिणाम का होत नाही, हे मात्र संशोधकांना अजूनही कळलेलं नाही. अशा रुग्णांसाठी कदाचित‘लाफिंग गॅस’ हा प्रभावी उपचार ठरू शकेल.

टॅग्स :मानसिक आरोग्य