Lokmat Sakhi >Mental Health > नैराश्य , स्ट्रेस फार, मन आजारी पण मनाच्या डॉक्टरकडे जायची लाज वाटते, असे का??

नैराश्य , स्ट्रेस फार, मन आजारी पण मनाच्या डॉक्टरकडे जायची लाज वाटते, असे का??

शरीराला दुखलं खुपलं तर आपण डॉक्टरकडे जातो, पण कोरोनाकाळात कळतंय की आपल्या मनालाही उपचारांची गरज आहे तरी मनाच्या डॉक्टरकडे जात नाही, असं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 06:05 PM2021-07-17T18:05:26+5:302021-07-17T18:09:46+5:30

शरीराला दुखलं खुपलं तर आपण डॉक्टरकडे जातो, पण कोरोनाकाळात कळतंय की आपल्या मनालाही उपचारांची गरज आहे तरी मनाच्या डॉक्टरकडे जात नाही, असं का?

Depression, stress, not feeling well, mental health issues but ashamed to go to a psychiatrist ? | नैराश्य , स्ट्रेस फार, मन आजारी पण मनाच्या डॉक्टरकडे जायची लाज वाटते, असे का??

नैराश्य , स्ट्रेस फार, मन आजारी पण मनाच्या डॉक्टरकडे जायची लाज वाटते, असे का??

Highlightsआपल्याला मानसिक आधार हवा आहे, अशी मदत घेणे गरजेचे आहे, ते आपले आपल्या मनात स्पष्ट असावे लागते. अशी मदत घेण्यात काहीही कमीपणा नाही (सर्व छायाचित्रे प्रातिनिधिक- सर्व छायाचित्रं -गुगल)

प्राची पाठक

काऊन्सिलरकडे जा असे हल्ली अनेकदा वरचेवर वाचण्यात येते आपल्या. अनेक लोक बोलू लागले आहेत की केवळ समुपदेशकाकडे किंवा मनाच्या डॉक्टरकडे गेलात म्हणजे काही कोणी लगेच वेडा ठरत नसतो. पूर्वी जितके गूढ वलय ह्या भोवती होते, तितके आता राहिलेले दिसत नाही. अनेक जण अगदी सहज सांगतात देखील की मला समुपदेशकाकडे जावे लागले. काही जण काही काळ सायकिऍस्ट्रिस्टच्या सल्ल्यानुसार काही औषधे सुद्धा घेतात. त्याही विषयी मोकळे बोलतात. 
कोणी कुणाला केवळ समुपदेशकाकडे गेला, म्हणून वेडा ठरवत असेल, तर विरोध करणारे समंजस लोक देखील आहेत. सायकिऍस्ट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट यातला फरक देखील वरचेवर माहित असतो आता लोकांना. तरीही आपल्यावर, आपल्या आजूबाजूला कुणावर वेळ आली की आपण घाबरतोच. "नकोच बाबा तो शिक्का" असा आपला स्टॅन्ड असतो. तो पर्याय सोडून काहीही ट्राय करायला आपण तयार होतो. अगदी ऑनलाईन टेस्ट देतो. लपून छपून किंवा उघड भविष्य वगैरे वाचू लागतो. "सगळे कसे छान होणार आहे", असा आधार आपण कुठेतरी शोधत राहतो. कुणी बाबा-बुवा ट्राय करतात. तरुण मुले अचानक खूप भाविक होतात. देवदर्शनाला पायी जाऊ लागतात. उपास तापास सुरु करतात. स्वतःची पत्रिका घेऊन फिरतात. कुठेतरी नादी लागतात. कुणात मैत्री शोधतात. कोणाला तरी आयडॉल करतात. वरवर आधार देणाऱ्या व्यक्तीला आपले सर्वस्व मानू लागतात. तसा आधार किंवा ऐकून घेणारा कान घरात मिळत नसेल, तर घरातल्यांचा रागराग करतात. कुठेतरी निघून जावेसे वाटणे, कोणीच समजून घेत नाहीत असे वाटणे, जगावेसे न वाटणे, मी आता माझ्या जीवाचे काहीतरी करून घेईन अशा धमकीवजा सूचना कराव्याश्या वाटणे, इतके प्रेशर आहे की मी फुटून जाईन अशी भावना, खूप टेन्शन आहे असे वाटणे, एकटेपणा जाणवणे, झोप उडणे किंवा खूप झोपणे, भूक कमी-जास्त होणे ह्या आणि अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. त्यांचे गांभीर्य आपल्याला कळेलच असे नाही. 

 

(छायाचित्र - गुगल)

नेमके हे का आणि काय होते, ते ही समजेलच असे नाही. कदाचित ही केवळ समुपदेशन करून बदलणारी लक्षणे नसतील देखील. दृष्टिकोन बदलला, समस्यांविषयी योग्य व्यक्तीकडे बोलले तर मार्ग दिसू लागतात. पण काय, कसे, कोणी आणि केंव्हा हे ही आपल्याला नीटसे माहित नसते. आणि म्हणूनच अशा प्रसंगात टाळाटाळ न करता समुपदेशकाकडे लगेच जायला हवेय. मनाचा अलार्म वाजलेला असतो तेंव्हा. त्याला आधार हवा असतो. डागडुजी हवी असते. ब्रेक हवा असतो. ती फट वाढायच्या आत सांधली गेली पाहिजे. शरीर थकले तर आपण आराम करतो. झोप काढतो. मस्त गरम पाण्याने अंघोळ करतो. ताजेतवाने होतो. शरीराची स्वच्छता देखील आपण राखत असतो. त्याला सजवतो. भारीतले कपडे, गॉगल, शूज, महागडी घड्याळे असे सगळे वापरतो. आवडीचे पदार्थ खातो. खिलवतो. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण काय करतो? विचारणार का हा प्रश्न स्वतःला?
मनाची आणि शरीराची दुखणी वेगवेगळी असतात. पण तरीही मनाच्या डॉक्टरकडे, समुपदेशकाकडे जाणेही जाणे इतके सहज-सोपे असायला हवेय.
रस्स्त्यात आपण कुठे धडपडतो. हाता पायाला दुखापती करून घेतो. त्याच्या गांभीर्यानुसार चटकन जवळचा डॉक्टर गाठतोच की नाही? की "हाता पायाचे सौंदर्य कसे राखावे" असे पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीला "कर रे बाबा मला मदत, मला अपघात झालाय रस्त्यात" असे लिहून उत्तराची वाट बघत बसतो? बरे, असे पुस्तक लिहिणारी व्यक्ती डॉक्टर असेल देखील. पण त्याला तुम्हांला मदत करणे शक्य असेल असे नाही. अंतर खूप जास्त असेल. तो प्रॅक्टिस न करणारा तज्ज्ञ असेल. अशावेळी आपल्याला चटकन आपल्या परिसरात कोण मदत करू शकेल, असा विचार करू की नाही आपण?

(छायाचित्र - गुगल)

योग्य समुपदेशक निवडणे हे महत्त्वाचेच आहे. पण आपल्या गरजेनुसार आणि इमर्जन्सीनुसार आपल्याकडे असलेले पर्याय निवडून तातडीचे निर्णय घेणेही आवश्यकच असते. थांबून राहू नका. कोणीतरी मदत करेल, असे खोळंबून बसू नका. समुपदेशकाकडे जाणे टाळू नका. आपण आपल्या आयुष्याची स्टोरी केवळ आपल्या दृष्टीने लिहिणार आणि त्यावर फक्त ती वाचून कोणी रेडिमेड उत्तरे देणार, चटकन आपले प्रश्न सुटणार, असेही होत नसते. प्रश्नांचा गुंता नीट समजून घ्यावा लागतो. मला कोणीच नाही मदतीला, असे असहाय देखील वाटून घेऊ नका. हेल्पलाईन नंबर्स जवळ असू द्यात. आपण फेसबुक-ट्विटर, व्हाट्स अप आणि एकूणच इंटरनेट वापरात आघाडीवर असतो. आणि अशी हेल्पलाईन शोधायची वेळ आली,
तर मला काहीच माहित नाही, माझ्या घराजवळ काही नाही, माझ्याकडे नेट नाही, मला घरातून बोलता येणार नाही... ही आणि अशी सर्व उत्तरे तयार ठेवतो. कोणी एखाद्या हॉस्पिटलची किंवा संस्थेची हेल्पलाईन सुविधा अगदी हातात आणून दिली तरी आपण हजार प्रश्न त्यात उभे करतो. प्रश्न पडणे ही छानच गोष्ट आहे. त्याबद्दल माहिती देखील मिळविता येते. पण आधी तशी धडपड करायची तयारी असावी लागते. आपल्याला मानसिक आधार हवा आहे, अशी मदत घेणे गरजेचे आहे, ते आपले आपल्या मनात स्पष्ट असावे लागते. अशी मदत घेण्यात काहीही कमीपणा नाही आणि त्यासाठी कोणी कोणाला वेडे-विकृत देखील ठरवत नाहीत, ही खात्री बाळगू या. कोणी असे करत असेल, तर त्यांना रोखायची-टोकायची देखील जबाबदारी घेऊ या.

(लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)
 

Web Title: Depression, stress, not feeling well, mental health issues but ashamed to go to a psychiatrist ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.