डिटॉक्स हा हल्ली परवलीचा शब्द. कुणी बॉडी डिटॉक्सच्या मागे लागतं तर कुणी किडनी-लिव्हर डिटॉक्ससाठी काय काय खातात. डॉक्टर लोक सांगून थकतात की असे डिटॉक्स काही नसते, रोज संतुलीत आहार, व्यायाम, पुरेसं पाणी पिणं, झोप, व्यसनं टाळा हे मोठं डिटॉक्स आहे, शरीर आपलं काम करतंच. पण लक्षात कोण घेतं? पण यासाऱ्यात आपण कधी विचार करतो का की आपल्या मेंदूच्या डिटॉक्सचं काय? आपण किती कचरा मेंदूत भरुन घेतो, अनावश्यक माहिती साठवतो. त्याच्या डिटॉक्सचं काय? आजकाल मानसिक आरोग्य तज्ज्ञ सतत डिजिटल डिटॉक्सची गरज सांगतात पण ते आपण करतो का? चुकून कधी आपल्याला मोबाइल आणि सोशल मीडिया उपवास घडतो का घडवता येईल का?
(Image :google)
होतं काय?
हल्ली कुठलंही सेलिब्रेशन अगदी नवीन पदार्थ केला तरी त्याचा नैवैद्य आधी मोबाइलला दाखवावा लागतो. मग तो फोटो पाच पन्नास व्हॉट्सॲप ग्रुपवर जातो. मग अन्य समाजमाध्यमात. तिथं शेपन्नास लाइक्स, पाच पन्नास वॉव आणि लाल बदामची कमाई झाल्यावरच बरं वाटतं.
२. तेच कुठल्याही सेलिब्रेशनचं. सेलिब्रेशन नंतर, आधी फोटो काढून ते समाजमाध्यमात टाकले की मग खरा आनंद सोहळा सुरु होतो.
३. हे सारं करताना प्रत्यक्षातल्या आनंदापेक्षा इतरांचे फोटो पाहणं, झुरणं, नाक मुरडणं, तुलना करणं आणि लाइक्स मोजणं हाच मनाचा खेळ सुरु राहतो.
४. काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या डीजीटल मार्केटरने एक सर्वेक्षण केलं होतं. त्यानं त्याच्या ब्लॉगवर हा सव्र्हे केला. त्यात त्यानं एकच प्रश्न विचारला होता की, रात्री झोपण्यापूर्वी शेवटचं आणि सकाळी उठल्यावर, डोळे उघडताच पहिला क्षण, तुम्ही काय करता?
५. ८० टक्के लोकांनी सांगितलं की, झोपताना मोबाइल पाहूनच बाजूला ठेवतो. आणि सकाळी जाग आली की, आधी मोबाइल हातात घेतो.
६. श्वासाइतकं वाढलं आहे हे व्यसन हे सगळ्यांनाच मान्य आहे. आणि त्यापासून लांब जायची इच्छा असली तरी कामामुळे आणि सवयीमुळे ते बाजूला ठेवता येत नाही. त्यात आपण मागे पडू, इतरांचं काय चाललं आहे हेच आपल्याला कळणार नाही असंही काहीजणांना वाटतं.
(Image :google)
उपाय काय?
डिजीटल मुक्ती हा तर काही उपाय नाही. पण डिटॉक्स हा उपाय मात्र आहे.
१. सुरुवातीला अगदी १० मीनीटांचा डीजीटल उपवास करायचा. म्हणजे आपण इच्छेनं दहा मिनिटं ठरवायचे आणि तेवढा काळ मोबाइलपासून लांब राहायचं, अगदी कितीही हात शिवशिवले तरीही.
२. नंतर वेळ वाढवत रहायचा. कधी ३० मिनिटं ते २ तास.
३. मग पुढचा टप्पा, एक दिवस १ हा उपवास करायचा.
४. लक्ष्य सोपं असलं तर हे नक्की जमू शकतं.
५. सतत जगभरचा कलकलाट आपल्या डोक्यात कशाला भरुन घ्यायचा, जरा आपल्यालाही ‘सुकून’ हवाच.