भक्ती चपळगावकर
फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली.
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या टोपडी शेले शाली.
त्यातच आहे घडी करून,जपून ठेवलेली एक पैठणी.
नारळी पदर जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी.
शांता शेळके यांची ही कविता महानगरीय नागर संस्कृतीतही आज फार भावते. ही कविता वाचणाऱ्या प्रत्येकाला आपला भूतकाळ आठवतो. प्रत्येकासाठी ही पैठणी वेगवेगळी असते. कुणासाठी एखादी साडी, कुणासाठी एखादे पेन, कुणासाठी जुने धोतर, कुणासाठी गावाकडच्या अंगणातलं एखादं जुने झाड. कोणती गोष्ट कोणती जुनी आठवण छेडेल काही सांगता येत नाही. काही गोष्टींना मनाच्या तळाशी जाऊन ठेवतो आपण. घरं बदलली, आयुष्य बदलले, वय झाले तरी त्या गोष्टी कुठंतरी जपलेल्या असतात. त्यांच्या स्पर्शाने, उबेने गेलेली कित्येक वर्षे मागे सरतात. आपण पुन्हा एकदा भूतकाळात जातो. हा भूतकाळ आपल्या वर्तमानाला उभारी देतो. भावनांची अशी साठवणूक करणारे आपण कधीकधी सगळं काही साठवायला जातो.
घरातल्या फडताळातल्या एका गाठोड्यात ठेवायच्या गोष्टी इतक्या वाढतात की, घरच एक गाठोडे होऊन जाते. मग वस्तूंच्या गोंधळात भावनाही हरवतात. कोणती गोष्ट महत्त्वाची आणि कोणती फक्त पसारा याचा निर्णय घेणे अवघड जाते. मग दिवाळी येते. मातीच्या दिव्यांची जागा मेणाच्या टी लाइट्सने घेतली. दिवाळीचे स्वरूप बदलले, तरी एक गोष्ट काही बदलली नाही - आपले घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्याची पद्धत. दिवाळीच्या आधी साफसफाई हवीच.
औद्योगिकीकरण ते माहितीयुगाच्या आपल्या संस्कृतीच्या प्रवासात आपल्या गरजा वाढल्या, काही उद्योगांनी वाढवल्या. वस्तू विकत घेऊन आपणही उद्योगांना चालना दिली. आयुष्य सोपे झाले. सगळ्यात चांगली गोष्ट ही झाली की, ज्या गोष्टी मिळवणे, बाळगणे फक्त श्रीमंतांच्या किंवा फार थोड्या लोकांना शक्य होते, त्या अनेकांच्या अख्यत्यारीत आल्या. हे सगळे इतके वेगात झाले की, गेल्या पिढीच्या तुलनेत आज तिशी-चाळिशीत असलेल्या पिढीच्या घरात कितीतरी जास्त प्रमाणात वस्तू आहेत. स्वयंपाकाच्या भांड्यांपासून कपड्यांपर्यंत आणि मुलांच्या खेळण्यांपासून फर्निचरपर्यंत. वस्तूंचा हा भार वाढता-वाढता वाढल्यानंतर गेल्या पाच-दहा वर्षांत हा भार कमी करण्याची गरज काही जणांना वाटू लागली. यातूनच मिनिमलीझमचा प्रचार सुरू झाला.
आवश्यक तेवढ्याच वस्तू आयुष्यात ठेवा, असा संदेश देणारी ही मिनिमलीझमची चळवळ. जुन्या वस्तू कमी करा आणि नव्या वस्तू कमीतकमी प्रमाणात घरात आणा हे मिनिमलीझमचे सार. एकूण अडगळ कमी करा आणि नवी अडगळ निर्माण करू नका, असेच मिनिमलीझम सांगतो. आज आपण मरी काँडोसारख्या मिनिलझीम तज्ज्ञ बाईचे शोज बघतो, पुस्तकं वाचतो, पण खरा प्रश्न पडतो की, आपण सुरुवात कशी करायची?
सुरुवात कुठून करायची?
१. माझ्या मते सुरुवात फार जुन्या वस्तूंनी करायचीच नाही, कारण त्या वस्तू बघताना आपण इतके रमतो की, त्यातल्या काही निवडायच्या आहेत आणि काही टाकून द्यायच्या आहेत, याचे भान राहत नाही आपल्याला.
२. मग सुरुवात करा स्वयंपाकघरापासून. हे वस्तूंचे भांडार आहे. त्यातल्या त्यात तुमचा फ्रीज उघडा आणि मागच्या बाजूला ठेवलेल्या बाटल्या, भाजीच्या कप्प्यातल्या शिळ्या भाज्या बाहेर काढा. ही अडगळ चार-पाच दिवसांचीच आहे, तुम्हाला अजून खूप काही करायचे आहे. मग चमचे, भांडी, प्लास्टिकचे डबे, पापड-कुरड्या, लोणची, पिशव्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा. तुमच्या लक्षात येईल यातल्या नाशवंत गोष्टी खराब व्हायला सुरुवात झाली आहे. प्लास्टिकच्या जुन्या पिशव्यांचा, डब्यांचा काहीही उपयोग नाही. त्या वेगळ्या काढायची हीच वेळ.
३. डेडलाइन ठरवून काम करा. आवराआवरीत वेळ वाया जाण्याची आणि काहीच काम न होण्याची फार शक्यता असते, त्यामुळे आज मला हे काम संपवायचेच आहे, अशी खूणगाठ बांधूनच कामाला सुरुवात करा. आवरता येईल तेवढाच पसारा काढा.
४. मुलांची खोली आवरताना मी हा नियम घालून घेतला आहे. मुलांची प्रत्येक गोष्ट त्यांना आवश्यक वाटते आणि आपल्याला त्यांच्या लहानपणाची आठवण करून देते. त्यामुळे सगळ्यात जास्त पसारा या खोलीत असतो. मग एके दिवशी सगळे सामान बाहेर काढायचे आणि यातल्या दहा गोष्टी किंवा पंधरा खेळणी निवड, तूच निवड असे मुलांना सांगायचे. त्यातून त्यांना आवश्यक त्या गोष्टी राहतील, नको असलेल्या आपोआप सगळ्या बाहेर जातील. मग रेंगाळत बसू नका.
५. आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट. तुमची स्वतःची खोली. सगळी कपाटं उघडून सगळ्या वस्तू डोळ्यासमोर ठेवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा - यातली कुठली गोष्ट मी गेल्या सहा महिन्यांत वापरली नाही. ज्या गोष्टी वापरल्या नाहीत, त्या सगळ्या गोष्टी मग ते कपडे असोत, इमिटेशन दागिने असोत, परफ्यूम्स असोत, घड्याळं असोत. सगळ्या वस्तू बाहेर काढा. त्यातली प्रत्येक गोष्ट हातात घ्या. त्यात तुम्हाला एखादीच अशी गोष्ट मिळेल जी तुमच्या पुढच्या पिढीला सोपवावी असे वाटेल. ती नक्की परत कपाटात ठेवा. काही गोष्टी महाग असतील, पण तुम्ही वापरत नसाल त्या कुणा मित्र-मैत्रिणीला देऊन टाका. अनेक अशा गोष्टी असतील, कारण नसताना विकत घेतलेल्या, वापरून जुन्या झालेल्या, खराब झालेल्या, कधीतरी वापरू म्हणून ठेवलेल्या, त्यातल्या बऱ्या लगेच योग्य व्यक्तींना देऊन टाका. उरलेल्या रिसायकल करायला सफाई कर्मचाऱ्याला देऊन टाका.
६. आता घर लख्ख झाले असेल. दिवाळीसाठी सज्ज झाले असेल. अशा या मोकळ्या जागेत प्रकाश अजून उजळेल. हे करत असताना, तुमच्या मनातली अशी वस्तू जी उद्या तुमच्या नातवंडांसाठी शांताबाईंची पैठणी ठरणार आहे, ती जपून ठेवायला विसरू नका, कारण तीच तुमची खरी साठवण असणार आहे!
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
bhakti bhalwankar