Lokmat Sakhi >Mental Health > Diigital Detox :कोरोनाकाळात सतत ऑनलाइन तेच ते वाचताय? मग मनाच्या ओझ्याचं काय होणार?

Diigital Detox :कोरोनाकाळात सतत ऑनलाइन तेच ते वाचताय? मग मनाच्या ओझ्याचं काय होणार?

संवाद, संपर्क यातली पोकळी भरुन काढण्यासाठी म्हणून डिजिटल तंत्रज्ञान आहे. पण ते वापरताना त्याच्या आपण इतके आहारी गेलोत की प्रत्यक्ष आयुष्यात, नातेसंबंधात केवढी मोठी पोकळी निर्माण झाली आहे याची जाणीवही आपल्याला झाली नाही. डिजिटल तंत्रज्ञान आणि डिव्हाइसच्या मागे वाहवत गेलेल्या आपल्या आयुष्याला आपण पुन्हा पूर्वपदावर आणू शकतो. त्यासाठीचे उपाय अगदी सहज करता येण्यासारखे आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 06:54 PM2021-04-22T18:54:37+5:302021-04-23T12:02:01+5:30

संवाद, संपर्क यातली पोकळी भरुन काढण्यासाठी म्हणून डिजिटल तंत्रज्ञान आहे. पण ते वापरताना त्याच्या आपण इतके आहारी गेलोत की प्रत्यक्ष आयुष्यात, नातेसंबंधात केवढी मोठी पोकळी निर्माण झाली आहे याची जाणीवही आपल्याला झाली नाही. डिजिटल तंत्रज्ञान आणि डिव्हाइसच्या मागे वाहवत गेलेल्या आपल्या आयुष्याला आपण पुन्हा पूर्वपदावर आणू शकतो. त्यासाठीचे उपाय अगदी सहज करता येण्यासारखे आहेत.

Do digital devices that connect you to the world 24 hours a day make you feel disconnected from you, your people? | Diigital Detox :कोरोनाकाळात सतत ऑनलाइन तेच ते वाचताय? मग मनाच्या ओझ्याचं काय होणार?

Diigital Detox :कोरोनाकाळात सतत ऑनलाइन तेच ते वाचताय? मग मनाच्या ओझ्याचं काय होणार?

Highlightsडिजिटल डिटॉक्स म्हणजे काही काळ तंत्रज्ञानापासून पूर्ण फारकत घ्यायची. डिव्हाइसपासून शारीरिक आणि मानसिक अंतर राखण्यासाठी आवश्यक स्वयंशिस्त स्वत:मधे यावी यासाठी हे डिजिटल डिटॉक्स आहे.इन्स्टा आणि स्नॅपचॅटवरील मित्र मैत्रिणींमधेच न रमता प्रत्यक्ष आयूष्यातल्या मित्र मैत्रिणींशी बोला, त्यांना संपर्क करा. गरज नसताना जास्त वेळ मोबाइल आणि कम्प्युटरमधे न घालवता आपल्या कुटुंबियांसमवेत जास्त वेळ घालवा.आपला वीकेण्ड फक्त मुलांसोबत घालवण्याचं नियोजन करा. संपूर्ण दिवस मोबाइल, कम्प्यूटर, टीव्ही यापैकी कुठल्याही स्क्रीनची सोबत न घेता मुलांसोबत दिवस घालवा.

- समिंदरा हर्डीकर-सावंत

कोविडमुळे आपण सध्या एका विरोधाभासात जगत आहोत. प्रत्यक्षातल्या सामाजिक आणि आंतरवैयक्तिक संपर्कावर मर्यादा आली आहे. हे खरं आहे की आपण एकमेकांशी बोलू शकत आहोत, एकमेकांना बघू शकत आहोत पण सर्व डिजिटली. त्याचा परिणाम म्हणजे डिव्हाइसच्या आपण खूप जवळ आलो आहोत आणि आपल्या प्रियजनांमधे आणि आपल्यामधे खूप अंतर निर्माण झालं आहे.

कोविड काळातच हे झालं आहे असं नाही. खरंतर याची सुरुवात आपल्या आयुष्यात याआधीच झाली आहे. जी माणसं आपल्यासाठी महत्त्वाची होती त्यांच्यापासून दूर दूर राहायाला आपण याआधीच सुरुवात केली आहे , निर्जिव डिव्हाइसमधे आपण अधिकाधिक गुंतून राहू लागलो आहे एकीकडे फेसबुक, ट्वीटरवरील फ्रेण्डलिस्ट वाढतेच आहे पण दूसऱ्या बाजूला प्रत्यक्ष आयुष्यातल्या जवळच्या मित्र मैत्रिणीसोबत एक कप कॉफी घेण्याएवढाही वेळ आपल्याकडे राहिलेला नाही. आपण सर्वजण डिजिटल युगात वावरत आहोत. इथे प्रत्येकाला आपल्या आपल्या जगात पुढे जायचं आहे, अधिकार संपन्न व्हायचं आहे. पण ही महत्त्वाकांक्षा बाळगणारे वेगाने आपल्याकडील गॅजेटसचे गूलाम होऊ लागले आहेत.

डिजिटल जगातल्या भारंभार माहितीच्या भाराखाली जो तो दबला आहे. इमेल नोटिफिकेशनस, कॅलेंडरवरील रिमाइण्डर्स, व्हॉटस अप ग्रूपवरील मेसेजेस या भाराची यादी न संपणारी आहे. या भाराचा सामना कसा करायचा हा प्रश्न आहे. विशेषत: या कोविड काळात हेच गॅजेटस जेव्हा आपलं जग बनलं आहे. मी काही डिजिटल क्रांतीच्या विरुध्द नाहीये. उलट गॅजेट आणि तंत्रज्ञान वापरण्यात मी माहिर आहे. मला असं वाटतं की हे गॅजेटस आणि डिजिटल तंत्रज्ञान आपल्या जीवनाला परिपूर्ण करणारी साधनं आहेत. त्यांना कसं वापरायचं हे आपण शिकणं महत्त्वाचं आहे. आणि खरी मेख इथेच तर आहे. आपण या डिजिटल डिव्हाइसच्या जाळ्यात इतके सहज अडकून पडतो की आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. आपण खरंतर या डिव्हाइसचे बॉस असायला हवं. आपण त्यांना चालवायला हवं. पण प्रत्यक्षात मात्र होतं उलटंच आहे. आपण या डिव्हाइसचे गुलाम झालो आहोत. आपण आपले अधिकार , आपलं स्वातंत्र्य या डिव्हाइसच्या हाती देऊन टाकलं आहे. हे डिव्हाइस आपल्याला जसं चालवता आहेत तसं आपण चालत आहोत. आणि म्हणूनच प्रत्येक क्षणाला आपला फोन कोणाचातरी व्हॉटसअप मेसेज आलेला आहे याची सूचना देतो, मेल आल्याचं सांगतो. आणि आपल्याला यातलं काहीच चुकवायचं नसतं. आपण हातातलं काम सोडून हे मेसेजेस बघायला, मेलला उत्तरं द्यायला लागतो., आपल्यातले अनेकजण असे डिव्हाइसचे , डिजिटल तंत्रज्ञानाचे गुलाम झाले आहेत. हे सगळं आपण कसं बदलवू शकतो? डिजिटल तंत्रज्ञान आणि डिव्हाइसच्या मागे वाहवत जाणाऱ्या आपल्या आयुष्याला आपण पुन्हा पूर्वपदावर कसं आणू शकतो? अतिशय निरागस दिसणाऱ्या या डिजिटल डिव्हाइसने आपले अधिकार , आपलं स्वातंत्र्य गडप केलं आहे. ते त्यांच्यापासून पुन्हा कसं मिळवायचं? खरंतर यासाठी अगदी सोपे पर्याय आहेत जे आपली या कामी मदत करु शकतात.

डिजिटल डिटॉक्स करा
डिजिटल डिटॉक्स याची सध्या खूप चर्चा आहे. डिजिटल डिटॉक्स म्हणजे काही काळ तंत्रज्ञानापासून पूर्ण फारकत घ्यायची. हे कसं करणार. खरंतर यासाठी अनेक मार्ग आहेत. जसं की आपले डिव्हाइस आणि गॅजेटस घरीच ठेवून कुटुंबासोबत सहलीला जावं. पण सध्याच्या कोविड काळात असं फिरायला जाणं हा पर्याय योग्य ठरणार नाही. पण या डिव्हाइसपासून विशेषत: आपल्या मोबाइलपासून दूर जाण्यासठी दहा दिवसांची विपश्यना किंवा निसर्गोपचाराचा एखादा छोटा कोर्स करु शकता. इथली पहिली अटच मूळी सोबत गॅजेटस नसावेत हीच असते. हिमालयावर ट्रेकला जा जिथे मोबाइलला नेटवर्कच नसतं. डिजिटल डिटॉक्ससाठी तुम्हाला जो आवडेल तो पर्याय तुम्ही निवडू शकता . मुख्य गरज ही या डिव्हाइसपासून शारीरिक आणि मानसिक अंतर राखण्यासाठी आवश्यक स्वयंशिस्त स्वत:मधे यावी ही आहे.

मेसेजेसला प्रतिक्रिया देण्याची व्यवस्था निर्माण करा.
आला व्हॉटसअप मेसेज की बघ, मेल दिसला रे दिसला की कर रिप्लाय, सतत इन्स्टा, फेसबुकवर जा ये कर हे सर्व थांबवण्यासाठी एक आपल्या सोयीची आणि शिस्त असलेली व्यवस्था आपणच लावायला हवी. जसं स्वत:ला सांगा की मी दर एक तासाला फोनवरील मेसेज बघेल,  मेलही सकाळी आणि संध्याकाळी या दोनच वेळेला करेल, दिवसातून एकदाच इन्स्टावर जाईन... जे नियम सोयिस्कर वाटतील ते लावा. एकदमच वापरायचंच नाही असं टोकाचं न वागता हळू हळू कमी मात्र करु शकतो. यामागचा मूळ उद्देश म्हणजे हे डिव्हाइस हाताळण्याबाबतची स्वयंशिस्त स्वत:ला लावता यायला हवी. डिव्हाइस हाताळण्याबाबतची व्यवस्था म्हणजे डिव्हाइस हाताळण्याची एक कला आहे. या कलेतला आनंद घ्यायला आपल्या मनाला शिकवायला हवं.

श्वासाचे व्यायाम करा
डिजिटल डिव्हाइसपासून तोडले जाऊन स्वत:सोबत जोडले जाण्यासाठी श्वासाचे व्यायाम हा उत्तम उपाय आहे. त्यासाठी योग, ध्यान, ब्रहमविद्या, आर्ट ऑफ लिव्हिंग, विपश्यना, सजगता यापैकी तुम्हाला योग्य वाटेल तो पर्याय तुम्ही निवडू शकता. श्वसन क्रियेचे विविध तंत्र आहेत तूम्हाला जे आवडेल ते तुम्ही निवडू शकता. तुमचं कामाचं शेडयूल कितीही व्यस्त असलं तरी दिवसातला एक ठराविक वेळ या श्वासाच्या व्यायामासाठी काढा. तुम्ही लिफ्ट मधे असाल, एखाद्या लांब रांगेत उभा असाल, तेव्हाही तुम्ही हे करु शकता. कारण अशा परिस्थितीत आपण नेहेमीच हातातला फोन घेऊन गरज नसताना फोन बघत बसतो. या काळात मोबाइल न हाताळता श्वसनाचे व्यायाम करावेत. यातून सजगता आणि डिव्हाइसपासूनची अलिप्तता दोन्हीही साधली जाईल.


आभासी जगातून बाहेर या, वास्तव जीवनाचा अनुभव घ्या.
 इन्स्टा आणि स्नॅपचॅटवरील मित्र मैत्रिणींमधेच न रमता प्रत्यक्ष आयुष्यातल्या मित्र मैत्रिणींशी बोला, त्यांना संपर्क करा. गरज नसताना जास्त वेळ मोबाइल आणि कम्प्युटरमधे न घालता आपल्या कुटुंबियांसमवेत जास्त वेळ घालवा. व्हॉटसअ‍ॅपवरुन मित्र मैत्रिणींना वाढदिवसाचे मेसेजेस पाठवण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांना फोन करुन त्यांच्याशी बोला. या अशा कृतीचा परिणाम लगेच दिसून येतो. या अशा कृतीतून मैत्री, नातेसंबंध जास्त दृढ होतात. कुटुंबिय, मित्र-मैत्रिणी यांच्याशी प्रत्यक्ष बोलून मिळणारं समाधान आभासी पध्दतीनं संवाद साधून मिळणाऱ्या समाधानापेक्षा कैकपटीनं जास्त असतं.

तंत्रज्ञान हे  जगाशी जोडण्यासाठी आहे आपल्या लोकांपासून तोडण्यासाठी नाही हे लक्षात ठेवा.

समाजमाध्यमातून व्यक्त होताना, इमेल करताना , फोन हाताळताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा हे सर्व तंत्रज्ञान आपल्याला इतरांशी सहज संपर्क साधता येण्यासाठी आहे. आपल्या इतरांशी संवाद सुकर व्हावा यासाठी ही साधनं आणि तंत्रज्ञान आहे. जी संवाद आणि संपर्क पोकळी निर्माण होते ती भरुन काढण्यासाठी हे तंत्रज्ञान आहे. आपल्या प्रत्यक्ष जीवनातल्या जवळच्या नातेसंबंधांमधे , माणसांमधे या साधनांनी पोकळी निर्माण होणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे.
 

थोडा वेग कमी करा.
रोज वेळेशी स्पर्धा करत जगण्याची काही गरज नाही. आपण किती का महत्त्वाचं काम करत असाल, कितीही मोठ्या पदावर असाल पण रोजच्या कामापलीकडे जाऊन स्वत:साठी वेळ महत्त्वाचाच. प्रत्येक कामाची एक विशिष्ट वेळ असते. ती कामं त्या वेळेत करावी. अर्थात अगदीच एखादं तातडीचं काम असलं तर ते कामाची वेळ नाही म्हणून करायचं राहात नाही. त्याला आपण लगेच प्रतिसाद देतो. पण अशा वेळा अगदी काही रोज येत नाही. घरातल्या, कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर थोडा वेळ स्वत:साठी द्यावा. प्रत्येक प्रश्न, प्रत्येक समस्या ही लगेचच्या लगेच सोडवायला हवी ही हूसहूस कमी करावी. प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट वेळ आणि जागा असते हे स्वत:ला सांगावं. जीवनासोबत वाहात जावं. जीवनात घडणाऱ्या अनेपेक्षित घटनांना सामोरं जाण्यातून आपल्याला जगण्याचं सौंदर्य कळतं. ते अनुभवता यायला हवं. हे अनुभवणं हेच खरं आव्हान आहे. पण त्यासाठी कशात ना कशात जखडून ठेवलेल्या स्वत:ला मोकळं करणं गरजेचं आहे.

घरात स्क्रीन फ्री वीकेण्ड हवा
आपला वीकेण्ड फक्त मुलांसोबत घालवण्याचं नियोजन करा. संपूर्ण दिवस मोबाइल, कम्प्युटर, टीव्ही यापैकी कुठल्याही स्क्रीनची सोबत न घेता मुलांसोबत दिवस घालवा. तूम्हाला हळूहळू आपोआपच लक्षात येईल की करमणुकीसाठी आपण किती स्क्रीनवर अवलंबून होतो ते. पण ह्ळूह्ळू तुम्हाला हे देखील नक्कीच जाणवेल की कुटुंबाबरोबर मजेनं दिवस घालवण्याचे खूप सारे स्कीनशिवायचे पर्यायही आहेत. पत्ते, कॅरम, दम शराज, गप्पा मारणं,एकत्र स्वयंपाक या गोष्टी मनाला आराम आणि आल्हाद देतात.
डिजिटलच्या गुलामीतून स्वत:ची सूटका करुन घेण्यासाठी तुम्ही वरील पर्याय करुन बघायला लागलात की २४ तास तुमच्यावर डिजिटल साधनांमधून आदळणारी माहिती कशी हाताळाची हे आपोआपच तुम्हाला समजायला लागेल. या माहितीत वाहून जाण्याऐवजी त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची हातोटी तुम्हाला साध्य होईल. अन आभासी जगाशी एकरुप होताना प्रत्यक्ष जगापासून तुटण्याच्या विरोधाभासतून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल.

( लेखिका मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ असून, दिशा समुपदेशन केंद्राच्या सह-संस्थापक आहेत.)
samindara@dishaforu.com | www.dishaforu.com

Web Title: Do digital devices that connect you to the world 24 hours a day make you feel disconnected from you, your people?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.